न्यूटनबाबा आणि त्याच्या सफरचंदाची कथा खरी आहे की खोटी....जाणून घ्या !!

न्यूटनबाबा आणि त्याच्या सफरचंदाची कथा खरी आहे की खोटी....जाणून घ्या  !!

न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, हे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. न्यूटनची ही कथा विज्ञान इतिहासातील सर्वात जास्त वेळा सांगितली गेलेली कथा आहे. या कथेनं अनेकांना आकर्षित आणि प्रेरित केलं. पण ही फक्त सांगोवांगीची कथा आहे, की यापाठी खरंच तथ्य आहे ?

यावर बराच शोध घेतल्यानंतर बोभाटाच्या हाती काही महत्वाची माहिती लागलीय...वाचा तर मग...

स्रोत

खरंतर या गोष्टीवर तज्ञांमध्ये एकमत नाही. न्यूटननं स्वतः कधीही याबद्दल लिहिलेलं नाही. पण असं म्हणतात की, न्यूटनही इतरांना ही गोष्ट थोडा मसाला मारूनच सांगायचा.इतिहासात या कथेचे तसे अनेक पुरावे मिळतील.  पण यातील विश्वासार्ह म्हणता येतील असे २ पुरावे आहेत. पहिला पुरावा हा ‘विलियम स्टकली’ या लेखकाने लिहिलेल्या “Memoirs of Sir Isaac Newton's Life” या पुस्तकातून मिळतो, तर दुसरा पुरावा जॉन कॉन्ड्यूट या न्यूटनच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या न्यूटनच्या चरित्रात सापडतो.

‘विलियम स्टकली’ आणि न्यूटन १५ एप्रिल १७२६ रोजी भेटले होते आणि त्यावेळी ते एका गार्डनमध्ये बसले असताना न्यूटनने त्याला हा किस्सा सांगितला होता. याबद्दल पुस्तकात त्याने म्हटलंय,

"After dinner, the weather being warm, we went into the garden and drank tea, under the shade of some apple trees...he told me, he was just in the same situation, as when formerly, the notion of gravitation came into his mind. It was occasion'd by the fall of an apple, as he sat in contemplative mood. Why should that apple always descend perpendicularly to the ground, thought he to himself..."

न्यूटन बागेत बसलेला असताना त्याला एक सफरचंद खाली पडताना दिसलं आणि त्याने विचार केला की हे फळ नेहमी वरून खालीच का पडतं, आजूबाजूला का नाही पडत?  म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या मध्यात नक्कीच आकर्षण शक्ती असणार. इथूनच न्यूटनच्या विचारांना चालना मिळाली आणि त्याने गुरुत्वाकर्षणावर संशोधनास सुरुवात केली.

विलियम स्टकली (स्रोत)

हाच किस्सा ‘विलियम स्टकली’ या न्यूटनच्या सहकाऱ्याने सांगितलाय,  पण इथे थोडे बदल आहेत. केंब्रीज विद्यापीठात शिकत असताना न्यूटन एकदा आपल्या आईला भेटायला ‘लिंकनशायर’ येथे गेला. हे शहर उत्तर इंग्लंडमध्ये आहे. तो तिथल्या एका बागेत फिरत असताना त्याला सफरचंद पडताना दिसलं आणि पुढे काय झालं हे आपल्याला माहितीच आहे.

स्रोत

मंडळी, यातून एक मात्र सिद्ध होतं की न्यूटन बाबाच्या डोक्यावर सफरचंद पडलं नव्हतं, तर त्याला ते पडताना दिसलं होतं. नंतरच्या काळात लोकांना यात भर टाकलेली दिसते.

न्यूटनच्या सफरचंदाचे वंशज पुण्यात :

जाता जाता एक आणखी माहिती द्यावीशी वाटते. ती म्हणजे, ज्या सफरचंदाच्या झाडाखाली बसून न्यूटनला गृत्वाकर्षणाचा शोध लागला त्या झाडाचे आज अनेक वंशज जगभरात विखुरलेले आहेत. त्यातला एक वंशज पुण्यातल्या 'आयुका' या संस्थेत पाहायला मिळतो.

पण काहीही म्हणा, हा इतिहासातील सर्वात महत्वाच्या शोध पैकी एक होता हे मानलंच पाहिजे !!