हा फोटो तुम्ही इंटरनेटवर हजारो वेळा हा फोटो पाहिला असेल. सोबत त्याची कहाणीपण वाचली असेल. खूप दिवस या फोटोची कथा अशी सांगितली जायची की १९१४साली एक दहा-बारा वर्षांचा अमेरिकेतला मुलगा जंगलात सायकल फिरवायला गेला. पण तिथूनच त्याला पहिल्या महायुद्धात भरती करायला नेलं. बिचारा तिथंच सायकल झाडाला टेकवून सोडून गेला. मुलगा कधीच युद्धातून परत आला नाही म्हणून त्याच्या आईबाबांनी त्याची आठवण म्हणून सायकल तिथंच राहू दिली. मग पुढं झाड मोठं झालं आणि सायकल अशीच झाडात अडकून राहिली. हीच गोष्ट वाचली असेल ना तुम्ही?? इंटरनेट अशा खूप विचित्र खर्या आणि खोट्या कथांनी भरलं आहे हो मंडळी..
आपण थोडा आता तर्कशुद्ध विचार करू..
१. गोष्ट म्हणजे १९१७पर्यंत अमेरिकेनं पहिल्या महायुद्धात भाग घेतलाच नव्हता..
२. जरा नीट पाहिलं तर ही सायकल दहाएक वर्षांच्या मुलाची वाटते. इतक्या लहान मुलांचा युद्धात काय उपयोग? आणि अर्थातच एवढ्या लहान मुलांना युद्धात भरती केलं जात नसे.
३. सायकलीचं डिझाईन आणि रेखीवपणा पाहा. नक्कीच २०व्या शतकाच्या सुरवातीची वाटत नाही. हो ना?
४. जरी ही गोष्ट खरी मानायची तरी एवढ्या वयाच्या मुलाचा बाबा युद्धात जायच्या वयाचा हवा. त्यामुळं त्याला पकडून युद्धात लढायला पाठवायला हवं.
५. त्याची आठवण म्हणून त्याचे आईवडील सायकल घरी आणून ठेवतील की तिथंच झाडाला टेकून राहू देतील? त्याकाळी सायकल ही पण चांगली महत्वाची गोष्ट असेल ना?


