वयाच्या सोळाव्या वर्षी अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांची मुले चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी धडपडत असतानाच आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने मात्र स्वत:साठी वेगळी वाट निवडली आहे. बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात धडपडण्यापेक्षा त्याने आपल्यातील एका वेगळ्या गुणाला उजाळा देणे अधिक योग्य समजले.
वेदांत एक राष्ट्रीय जलतरणपटू आहे. यापूर्वी त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव उज्वल केले आहे आणि आता तो २०२६ च्या ऑलंपिकची तयारी करत आहे.
कोरोनामुळे सध्या देशातील मोठमोठे स्विमिंग पूल बंद आहेत. शिवाय ऑलंपिकच्या तयारीसाठी लागणारी इतर साधनसुविधा देशात उपलब्ध नसल्याने त्याने यासाठी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला मुलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या सोबतीसाठी आर. माधवन पत्नी सरिता सोबत दुबईला गेला आहे.
मुंबईतील मोठे पूल कोरोनामुळे बंद आहेत. त्याला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये प्रॅक्टिस करता यावी म्हणून आपण दुबईला जात असल्याचे माधवने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अभिनयाऐवजी माझ्या मुलाने वेगळे क्षेत्र निवडले याबद्दल मला कधीच खेद वाटला नाही आणि वाटणारही नाही असे तो म्हणतो. मुलांना ज्या गोष्टीत रस आहे, त्यांना जे करू वाटते, ते त्यांना करू दिले पाहिजे. त्यांच्या या प्रवासात आपण त्यांच्या सोबत आहोत हा विश्वासही त्यांना देणे गरजेचे आहे, असे माधवनचे मत आहे. अभिनय जसा महत्वाचा आहे, तसाच तो जे काम करतो आहे तेही महत्वाचे आहे. कुठल्याच कामाला मी कमी लेखणार नाही. मुलांना अमुक हेच कर अशी सक्ती करण्यावर मला विश्वास नाही. इतर पालकांनाही त्याने हाच सल्ला दिला आहे.

