फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप, हाईक, स्नॅपचॅट इत्यादी सोशल मिडिया साईट किंवा अॅप वापरात असताना कधी हे अॅप आपल्याला वापरायला लागतात याचा पत्ताच लागत नाही. रोज सकाळी उठून व्हाट्सअॅप-फेसबुक बघणे हे आपल्यातील बहुतेकांच पहिलं काम असतं. या कामाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.

सोशल मिडियाचं व्यसन लागू शकतं हे काही वर्षापूर्वीच लागलेला शोध आहे. राव, सोशल मिडीयाच्या व्यसनाच्यावरून अनेक मिम्स आणि जोक्स तयार झालेत पण त्याकडे फारसं कोणी गांभीर्याने बघितलेलं नाही. अपवाद आहे तो बंगलोरच्या या हॉस्पिटलचा.
बंगलोरचं ‘निम्हन्स मनोरुग्णालय’ सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या लोकांवर उपचार करण्याचं काम करतं. चार वर्षांपूर्वी या मनोरुग्णालयाची स्थापना झाली. मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे रुग्णालय आज अगदी उत्तमरीत्या चालत आहे. कारण इथला एकही दिवस रुग्णाशिवाय जात नाही. रोज ५ ते ६ रुग्ण रुग्णालयात येत असतात. इथे येणाऱ्या लोकांमध्ये १६ ते २० वयोगटातील तरुणांचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

राव तुम्हाला गम्मत वाटेल; काही रुग्ण तर एवढ्या गंभीर अवस्थेत असतात की त्यांना हॉस्पीटल मध्ये दाखल करण्याची वेळ येते. इथला एक गामितदार किस्सा म्हणजे, एका रुग्णाला दिवसातून तब्बल ५०० वेळा सेल्फी काढण्याची सवय होती.

रुग्ण सुरुवातीच्या स्टेजला असेल तर २१ दिवस उपचार केले जातात. या सर्वांचं मूळ असलेला मोबाईल फोन लगेचच काढून घेणं शक्य नसल्याने वेगवेगळ्या पद्धतीने केस हाताळली जाते. आजवर या रुग्णालयात २५० लोकांवर यशस्वी उपचार झालेत.
मंडळी, सोशल मिडीयाचा नाद लय बेकार. हे तर एकच हॉस्पीटल आहे. भविष्यात असे अनेक हॉस्पिटल तयार होण्याच्या आत सुधरा लेको !!
