माणसं कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला का जातात? एलआयसी आणि बँकांमध्ये काम करणारी बरीच मंडळी निव्वळ कर्तव्य म्हणून या सभेला जातात. म्युच्युअल फंडांच्या मॅनेजर्सना थोडंसं चमकायचं असतं म्हणून ते जातात. बर्याच जुन्या भागधारकांना आम्ही किती जुने मेंबर आहोत हे सांगायचं असतं म्हणून जातात. पत्रकारांना सभा संपल्यावर काहीतरी 'खास' मिळणार असतं म्हणून ते जातात. बरीचशी मंडळी सभा संपल्यावर मिळाणार्या 'चहापाना'साठी जातात. तर काहीजण चार नव्या ओळखी होतील म्हणून जातात. बर्याच कंपन्या जमलेल्या मंडळीना काहीतरी गिफ्ट देतात म्हणून काहीजण जातात. एकेकाळी एक साखरेची कंपनी प्रत्येकाला २ किलो साखर भेट द्यायची. नव्याने आलेल्या कंपन्या शेअरहोल्डर्सना त्यांची फॅक्टरी दाखवायला घेऊन जातात. दोन दिवस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, एक दिवस फॅक्टरी आणि दुसर्या दिवशी पर्यटन असं सगळं फुकटात मिळायचं म्हणूनही लोकं सभेला जातात. थोडक्यात प्रत्येकाचा जाता जाता काही तरी घेऊन जाण्याचा उद्देश असतो.
पण काही अभ्यासू लोक कंपनी पुढे काय करणार आहे हे समजण्यासाठी जातात. काही वर्षांपूर्वी 'इन्फोसीस'च्या वार्षिक सभेला जाणारे शेअरहोल्डर केवळ नफ्याचे आकडे ऐकायला नाही, तर नारायणमूर्तींचा 'गायडन्स' ऐकायला जायचे. आता गेली काही वर्षं मुकेश अंबानींचे भाषण 'गायडन्स'पेक्षाही 'गेमप्लॅन' साठी ऐकले जाते. तर यावर्षी मुकेश अंबानी यांनी सादर केलेला रिलायन्सचा 'गेम' उलगडून सांगण्यासाठी हा आजचा लेख आहे.



