गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत उतरल्यानंतर मूठभर लोकांची चळवळ सर्वसामान्यांची झाली. सविनय कायदेभंग आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून देशातला सर्वसामान्य नागरिक स्वातंत्र्य चळवळीत उतरला होता. १९४२ ची चलेजाव चळवळ ही गोऱ्या साहेबांच्या साम्राज्यावर शेवटचा खिळा ठोकणारी ठरली.
दि. ८ ऑगस्ट १९४१ ला मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात गांधीजींनी 'करो या मरो'चा नारा दिला. इंग्रजांना देशातून हाकलून लावल्याशिवाय शांत बसायचे नाही हे ठरवूनच चले जाव आंदोलनाची सुरुवात झाली होती. इंग्रजांनी धोका ओळखून गांधीजी पंडित नेहरू यांच्यासारख्या सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. पण जनतेने आंदोलन स्वतःच्या हातात घेतले होते. प्रसंगी नोकरी-व्यवसाय सोडून सर्वसामान्य भारतीय नागरिक इंग्लिश जुलूमशाही विरुद्ध लढत होता. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी सर्व रस्त्यावर उतरले होते. देशभर भारतमातेचा गजर घुमू लागला होता.




