आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत अशी अनेक क्षेत्रं आहेत. पण पूर्वी असं नव्हतं. आणि एक क्षेत्र तर असं होतं जिथे पुरुषी चुकारपणाला उत्तर म्हणून महिला नेमल्या गेल्या होत्या. हे क्षेत्र होतं टेलिफोन ऑपरेटर्सचं!!!

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत अशी अनेक क्षेत्रं आहेत. पण पूर्वी असं नव्हतं. आणि एक क्षेत्र तर असं होतं जिथे पुरुषी चुकारपणाला उत्तर म्हणून महिला नेमल्या गेल्या होत्या. हे क्षेत्र होतं टेलिफोन ऑपरेटर्सचं!!!

टेलिफोनच्या सुरुवातीच्या काळात लोक एकमेकांशी थेट बोलत नसत. त्यासाठी त्यांना एका मध्यस्थाची म्हणजेच टेलिफोन ऑपरेटरची गरज होती. हे ऑपरेटर्स एका व्यक्तीकडून आलेला कॉल योग्य त्या व्यक्तीच्या नंबरला जोडून देत. त्यासाठी सेंट्रल स्विच बोर्ड या प्रणालीचा वापर करत. ही प्रणाली अतिशय गुंतागुंतीची होती. ही कल्पना अलेक्झांडर ग्राहम बेल यांचं व्याख्यान ऐकणाऱ्या जॉर्ज डब्ल्यू कॉय या ४० वर्षीय माणसाची होती. या व्याख्यानादरम्यान बेलने आपण २७ मैल आणि ३८ मैल अंतरांवर असलेल्या दोन सहकाऱ्यांशी कसा संवाद साधू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यासाठी त्याने टेलिफोन नावाचं एक उपकरण वापरलं होतं. वर्षभर आधी त्याने या उपकरणाचं पेटंट मिळवलं होतं.

हे व्याख्यान ऐकल्यावर काही दिवसांनी कॉयने अमेरिकेत पहिलं टेलिफोन एक्सचेंज उभारण्यासंदर्भात बेलशी करार केला. या टेलिफोन एक्स्चेंजमध्ये फोन असलेल्या कोणालाही कॉल करण्याची किंवा ज्यांच्याकडे फोन होता त्यांना कॉल घेण्याची परवानगी देणारा सेंट्रल स्विच बोर्ड होता. १८७८ मध्ये अमेरिकेतील न्यू हेवन, कनेक्टिकट या शहरांत कॉयचं टेलिफोन एक्सचेंज सुरू झालं. त्याचे सुरुवातीचे ग्राहक होते स्थानिक पोलीस, टपाल कार्यालय, आणि मेडिकल स्टोअर. आज कॉय जगातील पहिला टेलिफोन ऑपरेटर म्हणून ओळखला जातो, पण एक्सचेंज कार्यान्वित करण्यासाठी त्याने दोन मुलांना कामावर ठेवले होते. कॉयने आपल्या स्विचबोर्डमध्ये काही सुधारणा करण्यासाठी बायकांच्या बसल्स मधील तारांचा वापर केला होता. बसल्स हा त्या काळात विशेषतः युरोपातील स्त्रियांच्या पोशाखाचा एक भाग होता. यात धातूच्या तारांचा वापर करून एक सांगाडा तयार करून तो स्कर्टच्या आतून कंबरेभोवती गुंडाळला जाई. यामुळे स्कर्टचा विशिष्ट आकार कायम राहात असे.

पुढे जाऊन महिलाही टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करू लागल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांनी या क्षेत्रात ठसा उमटवणं सुरू केलं. जसजशी त्यांची संख्या वाढायला लागली तसतशी त्यांची ताकदही वाढू लागली. स्वतःच्या हक्कांसाठी त्यांनी संघटनेत प्रवेश केला. प्रसंगी पगारवाढीसाठी संपही पुकारला. परंतु महिला ऑपरेटर्सनी या क्षेत्रात यायला पुरुषांचा कामचुकारपणा कारण ठरला.
पुरुष स्विचबोर्ड ऑपरेटर्समुळे अनेक समस्या निर्माण होत. टीनएजमधील मुलांची प्रवृत्ती मस्ती करण्याची असे. त्यामुळे बरेचदा ते कॉल अटेंड न करता इतर टाईमपास करत बसत. त्यामुळे आपली ड्युटी कोण लक्षपूर्वक करेल? ग्राहकांना कोण चांगलं वागवेल? या हेतूने स्थानिक फोन कंपन्यांनी मुली आणि महिलांची नियुक्ती सुरू केली. यासाठी त्यांना अनेकांच्या घरी जाऊन टेलिफोन ऑपरेटर हा त्यांच्या मुलींसाठी चांगला जॉब आहे हे त्यांच्या पालकांना समजवावं लागलं. अमेरिकेत फोनची संख्या वाढू लागताच ऑपरेटरची मागणीही वाढू लागली.

तर एखाद्या विशिष्ट भागातून आलेला प्रत्येक फोन हा सेंट्रल एक्सचेंजला वायरमार्गे जोडला जाई. फोन करणारा एक्सचेंजला कॉल करत असे आणि स्विचबोर्ड ऑपरेटर उत्तर देत. कॉल करणारा ऑपरेटरला ज्यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्याचं नाव सांगत असे. ज्या व्यक्तीला म्हणजेच नंबरला कॉल करायचा त्या नंबरसाठी स्विचबोर्डशी जोडलेलं सॉकेट असे. यानंतर ऑपरेटर या सॉकेटमध्ये एक कॉर्ड घालत असे. तिला पॅच कॉर्ड म्हणत. अशाप्रकारे दोन्ही व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जात. लांब पल्ल्याच्या कॉलसाठी स्थानिक एक्सचेंज केबल्सच्या मालिकेने अधिक लांब एक्सचेंजला जोडून कॉल ट्रान्सफर करत. पुढे ग्राहक व फोन नंबर यांची संख्या वाढत गेली आणि फोन करणारे याप्रकारे जोडून द्या अशी विनंती करू लागले.

सुरुवातीला टेलिफोन ऑपरेटर्स छोट्या ग्रामीण एक्सचेंजेस मध्ये काम करत, तर त्यांचे स्विच बोर्ड स्थानिक रेलरोड स्टेशन किंवा जनरल स्टोरची पाठीमागची बाजू अशा ठिकाणी असत. शहरांमध्ये प्रचंड मोठ्या अशा स्विचबोर्डसाठी दाटीवाटीने बसणाऱ्या ऑपरेटर्सच्या लांबच लांब रांगा असत. एखाद्या अत्यंत बिझी असणाऱ्या बोर्डवरचं काम कधीतरी वेडपिसं करून सोडायचं. या ऑपरेटर्सना स्वतःच्या मर्जीनं फार काही करता येत नसे. काही ऑपरेटर्स स्केट घालून यायचे. अन्यथा त्यांचा ड्रेस कोड हा अतिशय कडक होता. यात फक्त लांब काळ्या रंगाचा ड्रेस घालण्याची परवानगी होती. कोणतेही दागदागिने घालण्यास सक्त मनाई होती. हे ऑपरेटर्स इतरही अनेक जाचक नियमांच्या दडपणाखाली होते. क्वचित प्रसंगी गुप्तहेर त्यांच्या लिसनिंग बोर्ड नामक उपकरणाच्या मदतीनं कॉल्सवर देखरेख करत. ऑपरेटर्सच्या खाजगी आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जाई. कामाची गती आणि ऑपरेटर्सना मानावे लागणारे दडपशाहीचे नियम यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.

एप्रिल १९१९ मध्ये न्यू इंग्लंड टेलिफोन कंपनीतील सुमारे आठ हजार कर्मचारी तडकाफडकी नोकरी सोडून गेले. त्यामुळे मेन, मॅसेच्युसेट्स, न्यू हेमेस्फिअर, ऱ्होड आयलंड आणि व्हरमॉंट या ठिकाणच्या सेवा बंद पडल्या. पाच दिवसांनी कंपनीने त्यांची जास्त पगाराची आणि एकत्रितपणा यासंबंधी सौदा करण्याची मागणी मान्य केली. महिलांच्या बाबतीत आपण दडपशाही करू शकत नाही, ही गोष्ट टेलिफोन कंपन्यांच्या लक्षात आली. १९३० च्या दशकात या क्षेत्राला उतरती कळा लागली. ह्या काळात प्रगत तंत्रज्ञानामुळे फोनचा वापर करणाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधताना मध्यस्थांची गरज उरली नाही. याचा फायदा उचलत फोन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात केली आणि हजारो ऑपरेटर्सनी त्यांची नोकरी गमावली.

लोकांनी फोन जोडण्याची यंत्रणा बदलण्याची सुरुवातही बरीच गंमतीशीर आहे. स्ट्रोजर(Strowger) नावाचा एक अंडरटेकर म्हणजेच मर्तिकाची कामे करणारा मनुष्य होता. दुर्दैवाने दुसऱ्या एका अंडरटेकरची बायको टेलिफोन एक्सचेंजमध्ये नोकरी करत होती. मर्तिकासाठी आलेले सगळे कॉल्स ही बाई नवऱ्याला धाडत असे आणि या स्ट्रोजरबाबांना काम मिळेनासे झाले. मानवी हस्तक्षेपामुळे हे होत आहे, ऑटोमॅटिक यंत्रणा असेल तर अशी वशीलेबाजी होणार नाही असं मत मांडून या स्ट्रोजरने १८८८पासून अशी यंत्रणा बनवायला सुरुवात केली. १९९१मध्ये ती तयारही झाली. त्यात हळूहळू बदल झाले, १९१९मध्ये स्ट्रोजरने या कामाचं पेटंटही घेतलं. साधारणत: १९२०पर्यंत सगळीकडे मानवी टेलिफोन एक्सचेंज बदलून अशा स्वयंचलित यंत्रणा आल्या होत्या.

तंत्रज्ञानातल्या प्रगतीने रोजगार हिरावून घेतल्याचं आज आपण सर्रास बघतो. पण इतिहासातपण हे घडलंय. थेट कम्युनिकेशन सुरू झाल्यावर गरजच न उरल्याने हजारो टेलिफोन ऑपरेटर्स अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले. तरीही स्त्री टेलिफोन ऑपरेटर्सनी आपल्या कामाप्रती दाखवलेली निष्ठा विसरता येत नाही.
हे तर एक झालंच, पण आधी अकुशल समजलं गेलेलं प्रोग्रॅमिंगचं क्षेत्र नंतर 'बौद्धिक' असल्याचा साक्षात्कार(!) झाल्याने पुरुषांनी स्त्रियांकडचे प्रोग्रॅमिंग क्षेत्र हिरावल्याची गोष्ट तुम्ही वाचली आहे ना?
जगातलया पहिल्या कम्प्युटर प्रोग्रामर्स महिला होत्या, पण मग नंतर हे क्षेत्र पुरूषप्रधान कसं काय झालं?
स्मिता जोगळेकर