सोशल मिडियाचे स्टार: आरजे, युट्युबर ते थेट बॉलिवूड प्रवास करणारी प्राजक्ता कोळी!!

लिस्टिकल
सोशल मिडियाचे स्टार: आरजे, युट्युबर ते थेट बॉलिवूड प्रवास करणारी प्राजक्ता कोळी!!

आजच्या युवा आणि मिलेनियल जनरेशनला लगेच आवडणारे कंटेंट युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाफिन्स्टासारख्या बऱ्याचशा सोशल मिडियावर हिट होत आहेत. याच युवा कंटेंट क्रिएटर्सच्या भन्नाट डोक्यातून आलेलं कंटेंट उचलून धरलं जातं, व्हायरल होतं, फॉलोअर्स-शेअर्स-रिॲक्शन्स वाढतात. याच युट्युबर्समध्ये आघाडीचे नाव आहे ते आपल्या मराठमोळ्या प्राजक्ता माळीचं. मोस्टली सेन नावाचं तिचं युट्यूब चॅनल प्रचंड लोकप्रिय आहे. तुम्हीही पाहिलं असेलच, नसेल तर लवकरच पाहा..

ठाण्याच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्राजक्ता लहानाची मोठी झाली. तिचे वडील हे रियल इस्टेट आणि रेस्टॉरंट या व्यवसायात आहेत. तर तिची आई शिक्षिका आहे. आपल्या आईवडिलांची प्राजक्ता एकुलती एक मुलगी आहे. २८ वर्षांच्या प्राजक्ताने ६ वर्षांपूर्वी स्वतःचं यु ट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. आज प्राजक्ताच्या चॅनेलला ६० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यातही विशेष गोष्ट म्हणजे युट्युबर होण्याआधी प्राजक्ता आर.जे. होती. सहावीत असतानाच तिने ठरवले होते की आपल्याला आरजे म्हणून करिअर करायचे आहे.

पुढे खरोखर आरजे म्हणून काम करू लागल्यावर तिला जाणवू लागले की हे काम आपल्यासाठी योग्य नाही. तिच्या शोला पुरेशी ऑडियन्स आणि व्ह्यूज ही नव्हते. यावेळी तिला तिच्या एका मित्राने युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यावर व्यवस्थित विचार करून २०१५ साली तिने युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ता एका मुलाखतीत सांगते की त्यावेळी तिच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. पण पुढे जाऊन हा निर्णय सर्वात योग्य ठरला. तिला घरातून पण तिच्या कामासाठी मोठा पाठिंबा मिळतो.

कोरोना काळात तिने कोरोनासंबंधी अनेक व्हिडिओ बनवले. सर्वचजण त्या काळात कोरोनावर बोलत होते. पण सोप्या आणि सूत्रबद्ध पद्धतीने या गोष्टी कमी मांडल्या जात होत्या, ही गोष्ट प्राजक्ताने नोटीस केली आणि तिने आपल्या टीमला सोबत घेऊन साध्या-सुलभ आणि सर्वांना समजतील अशा भाषेत फॅक्टस सांगण्यास सुरुवात केली.

प्राजक्ताला गुगलची चॅरिटी संस्था असलेल्या गुगल ऑर्गने मोठी संधी दिली आहे. इम्पॅक्ट चॅलेंज या त्यांच्या प्रकल्पात प्राजक्ता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रकल्पात जगभरातील अनेक मोठी नावे जसे शकिरा, नोबेल विजेत्या रिगोबार्टा मेनचू तुम, नाओमी ओसाका हे काम करणार आहेत.

प्राजक्ताची नेटवर्थ ही ६ कोटींहून अधिक असल्याचे एका वेबसाईटने नोंदवले आहे. तिच्या कमाईचा सर्वात अधिक भाग हा तिच्या युट्यूब चॅनलमधूनच येत असल्याचे या वेबसाईटवर लिहिले आहे

यु ट्यूबपासून सुरुवात केलेल्या प्राजक्ताला आता मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर संधी मिळू लागली आहे. नुकतीच ती नेटफ्लिक्स सिरीज मिसमॅचमध्ये दिसली होती. सध्या तिला धर्मा प्रोडक्शनच्या 'जुग जुग जिओ' या सिनेमात संधी मिळाली आहे. यात ती अनिल कपूर, वरून धवन, कियारा अडवाणी अशा बॉलिवूडच्या बड्या चेहऱ्यांसोबत दिसत आहे.

एका मराठी सर्वसामान्य घरातील मुलीने आरजे, युट्युबर ते थेट बॉलिवूड असा केलेला प्रवास प्रेरणास्पद तितकाच अभिमानास्पद देखील आहे.