आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १०००च्या नोटा होणार बंद

आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १०००च्या नोटा होणार बंद

खोट्या नोटा, भष्ट्राचार आणि काळा पैसा या  तीन समस्यांवर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या रू. ५०० आणि १००० च्या नोटा आज रात्रीपासून बंद केल्या आहेत. म्हणजेच उद्यापासून या नोटा चालणार नाहीत. या जुन्या नोटा बँका आणि पोस्टात १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत बदलून मिळतील. भविष्यात नव्या ५००रूंच्या आणि २०००रूपयांच्या नोटा चलनात येणार आहेत. मोदींच्या भाषणानुसार  हा निर्णय अत्यंत गुप्त होता आणि इतर बँकांना याची कल्पनाही नव्हती. या नोटा बदलण्याच्या कामामुळं रिझर्व्ह बँकेला आणि पोस्ट खात्याला खूप काम लागणार आहे. त्यामुळे उद्या ९ नोव्हेंबर रोजी सर्व बँका सामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. ९ आणि १० नोव्हेंबरला बरेच एटीएम बंद असण्याच्या शक्यताही आहेत. 

११ नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी चालणार जुन्या नोटा-

१. सरकारी हॉस्पीटल्स 

२. प्रिस्क्रिप्शन असल्यास मेडिकल्समध्ये

३. पेट्रोल पंप

५. एअरपोर्टवरती ५०००रूपयांपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जाणार

६. केंद्रिय भांडार

७. तिकिट रिझर्व्हेशन-सार्वजनिक परिवहन बस, रेल्वे आणि विमानसेवा

नागरिकांनी काय करावे-

१. इंटरनेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट, कार्ड्सद्वारे केल्या जाणार्‍या व्यवहारांवरती कसलेच बंधन नाही. 

२. डिसेंबर ३०नंतर म्हणजेच मुदत संपल्यानंतर नागरिकांना नोटा बदलण्यासाठी थेट रिझर्व्ह बँक गाठावी लागेल. तेव्हाही त्यांना त्या रकमेचं डिक्लेरेशन द्यावं लागेल आणि ही सुविधा फक्त ३१ मार्च २०१७पर्यंत उपलब्ध असेल.

३. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्यासाठी नागरिकांना ओळखपत्र म्हणजेच आधारकार्ड किंवा पॅनकार्ड दाखवावं लागणार आहे. त्यामुळं नागरिकांनी फक्त स्वत:च्याच नोटा बदलून घ्याव्यात. आधारकार्डासोबत बँक खातंही जोडलेलं असल्यानं दुसर्‍यांसाठी नोटा बदलून घेतल्यास उगीचच आपल्या नावावर पैसे रेकॉर्डला लागतील. 

४. एका वेळेस जास्तीत जास्त ४०००रूपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील. पंधरा दिवसांनंतर यावर पुनर्विचार केला जाऊ शकेल.

५. नागरिक आपल्या खात्यात कितीही रूपये भरू शकतात. पण जर का त्या खात्याची KYC [Know your customer] प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर ५०,०००रूपयांपर्यंतच पैसे त्या खात्यावर जमा  करता येतील. 

६. नागरिकांना दुसर्‍याच्या खात्यावरही पैसे भरता येतील, मात्र त्यासाठी त्या खातेदाराने पैसे भरणार्‍यास अधिकारपत्र दिलेलं असलं पाहिजे व पैसे भरणार्‍या व्यक्तीकडेही ओळखपत्र असायला हवं. त्या-त्या बँकेच्या नियमाप्रमाणे हे पैसे भरता येतील. 

७. १० नोव्हेंबरपर्यंत आपल्या एटीएममधून  एका दिवसात एका  कार्डावरून फक्त २,०००रूपये काढता येतील. १९ नोव्हेंबरपासून एका दिवसात  एका  कार्डावरून ४,०००रूपये काढता येतील. 

८. पहिल्या काही आठवड्यांत रोज एका दिवसात १०,००० रूपये बँकेच्या खात्यामधून काढता येतील तर एका आठवड्यात जास्तीत जास्त २०,०००रूपये काढता येतील

मोदींच्या मते जास्तीत जास्त भ्रष्ट्राचार हा ५००आणि १०००च्या नोटांच्या रूपात होतो. तसेच पाकिस्तान आणि बांग्लादेशातून या दोन नोटांच्या रूपात खोटं चलन भारतात येण्याचं प्रमाणही अधिक आहे. अर्थातच हा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो. त्यामुळे या दोन नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.  तसेच काळा पैसा जाहिर करण्याची मुदतही संपून गेली असल्यानं लोकांना तो पैसाही पांढरा करता येणार नाहीय.  आज काळा पैसा बाळगून असलेल्यांची झोप चांगलीच उडाली असणार आहे.

नवीन नोटा छापण्यासाठी सरकारला वेळ लागेल. त्यामुळं पैसे काढण्यावरती पहिले काही आठवडे बरीच बंधने असतील.  मोठ्या रकमेच्या नोटा सरकारला नियंत्रणात ठेवायच्या आहेत. या नवीन ठरावामुळे त्यावर काहीसं नियंत्रण होऊ शकतं. अर्थात भविष्यात ते होणार नाही याची खात्री देता येईलच असं नाही. ’अर्थक्रांती’ या संघटनेची ५०० आणि १०००रूपयांच्या नोटा रद्द व्हाव्या ही खूप दिवसांपासूनची मागणी होती. 

काही  असो, उद्यापासून या दोन नोटा म्हणजे फक्त कागद उरणार आहेत.