तीन मिनिटांची फिल्म बनवायच्या परवानगीसाठी या तरुणास 9 महिने वाट बघावायला लागली. जाणून घेऊया संयोग मोहिते यांचा प्रवास

तीन मिनिटांची फिल्म बनवायच्या परवानगीसाठी या तरुणास 9 महिने वाट बघावायला लागली. जाणून घेऊया संयोग मोहिते यांचा प्रवास

आयुष्यात पॅशन असणे हे खूप गरजेचे असते. त्याच्या आयुष्याची पॅशन आहे एनवायरमेंटल फिल्म मेकिंग, या आधी त्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या फिल्म्स बनविल्या आहेत. पण त्याची लेटेस्ट शॉर्टफिल्म “आर्मर” ही स्पेशल आहे. चक्क भारतीय आर्मीने आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून ही फिल्म रिलीज केली आहे. आणि आतापर्यंत ही फिल्म अडीच लाखाहून अधिकवेळा पाहिली गेली आहे. या लघुपटात  रणगाडे आहेत , इतकेच नव्हे तर   स्वतः आर्मीवाल्यानी या फिल्ममध्ये अभिनय केला आहे.  अशक्य वाटतंय? थोडं अशक्य कोटीतलं आहे खरं.  हे शक्य केले आहे मूळच्या सातार्‍याच्या पण सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या संयोग मोहिते याने. संयोगच्या या प्रवासाबद्दल बोभाटा टीमने त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यातीलच काही अंश या लेखामधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

फिल्ममेकींगची सुरवात-

संयोग खरंतर एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे  आणि नंतर त्याने MMCOE मधून एम. बी. ए.ची पदवी घेतलीय. कॉलेजमध्ये असतानाच National Entrepreneur Networkच्या  सरांनी वर्गात विचारलं, “आपण इथे जे काही करतोय ते लोकांपर्यंत पोचायला हवं.  आपण या सार्‍याचा प्रसार कसा करू शकतो?” यावर संयोगचं उत्तर होतं,“आपण यावर एखादी फिल्म किंवा व्हिडिओ बनवला तर?” तेव्हा सर्व वर्गाला त्याचं उत्तर हास्यास्पद वाटलं होतं. मग प्रयोग म्हणून संयोगने काही मित्रांसोबत  तरूण उद्योजकांचे लहान, म्हणजे अगदी दोन-दोन मिनिटांचे व्हिडिओज तयार केले. तेही मोबाईल कॅमेर्‍याने शूट करून.  आणि मग विंडोज मूव्हीमेकर वापरून ते व्हिडिओज एकत्र केले. त्यांचा तो प्रयोग लोकांना खूप आवडला. आधी मनात फक्त विचार आला होता, पण या अनुभवानंतर संयोगसाठी  या माध्यमाचं महत्व आणखीच अधोरेखित झालं.

 

पहिली फिल्म आणि पर्यावरण संवर्धन-

संयोगने पहिली फिल्म २००८ मध्ये केली- Do You  नावाची. शेजारच्या दोन लहान मुलांना घेऊन. इतक्या लहान मुलांकडून काम करवून घेणंही अवघड असतं. संयोगने त्यांना आधी कुंडीत झाडं लावायला शिकवलं आणि नंतर केतन हेंद्रे नावाच्या मित्राच्या साह्याने त्या मुलांच्या न कळत त्यांचं शूटिंग केलं. Do You ही फिल्म तशी एका मिनिटाचीच आहे पण तिचा संदेश योग्यपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवते.


संयोगचा त्याच्या फिल्ममध्ये लहान मुलांना घेण्याकडे अधिक कल आहे.   लहान मुलं अधिक संवेदनशील असतात. त्यांना पर्यावरण संवर्धनाचं महत्व पटलं तर ते आतून आलेलं आणि अधिक प्रभावी असं सोल्यूशन असेल असं त्याचं मत आहे.  मोठे लोक थोडे सवयीचे गुलाम झालेले असतात. म्हणून त्यानं लहान मुलांनाच पर्यावरणाचं महत्व पटवायला आणि आपल्या प्रयोगांत सामील करून घ्यायला सुरूवात केली. त्याच्या पहिल्याच फिल्मला पुण्यातला इको फेस्टचं प्रथम पारितोषिक मिळालं. अमेरिकेच्या Treeium या संस्थेने Most Influential Five Films मध्ये “Do You”चा समावेश केलाय. त्यानंतर मग त्याने “Now You”, “Have you”,“It’s You” , आणि “Cage”अशा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या शॉर्टफिल्म्स बनवल्या.

 

आर्मरचा प्रवास-

यानंतर मात्र त्याला एक वेगळाच कन्सेप्ट सुचला होता. त्याला नवीन फिल्म बनवायची होती-”Armour”.  म्हणजे आयडिया ३-४वर्षांपूर्वीच सुचली होती आणि काही लोकांना बोलूनही दाखवली होती. आयडिया सगळ्यांना आवडली तर होती पण तिला प्रत्यक्षात उतरवणं अवघड आहे असंच त्यांचं म्हणणं होतं. आता तुम्हीच सांगा ना, जर कुणी म्हटलं की मला एका शॉर्ट फिल्मसाठी रणगाडे आणि फायटर जेट विमानं पाहिजेत, तर तुम्ही पण त्या मनुष्याला वेड्यात काढाल, होय ना? तर होता-होता संयोग पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगला पोचला. तिथे कुणीतरी दिल्लीला संधान सांधण्याचा सल्ला दिला. कुणाला संपर्क करावा हेही माहित नसणार्‍या संयोगने गुगलवरून काही इमेल आयडी मिळवून शक्य त्या सर्वांना इमेल्स केले. संयोगचे एक मित्र मेजर सुनील शर्मा यांनी ADGPI [Additional Directorate of General Public Information] सोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला.   आणि काही दिवसांनी ADGPI कडून उत्तरही आलं. हे ADGPI म्हणजे मिलिटरीचा एकप्रकारे चेहराच. या ADGPI ने संयोगला दिल्लीला भेटायला बोलावलं.

 

आता मिलिटरीचे स्वत:चे नियम , त्यांचे अशा कामासाठी बर्‍यापैकी मोठं मानधन असा सगळा प्रकार असतो. संयोग अर्थातच एक सामाजिक लघुपट आणि तोही स्वत:ची पदरमोड करून करत असल्याने त्याला अर्थातच हा मार्ग अवलंबणं शक्य नव्हतं. तेव्हा तिथल्या एका मेजरनी संयोगची भेट ADGPI च्या संचालकांसोबत घालून दिली. ही भेट थोडी फलदायी ठरली कारण त्यांनी या प्रकरणाची रीतसर फाईल बनवून थेट मिनिस्ट्रीकडूनच  नि:शुल्क परवानगी मिळवण्याचा मार्ग सुचवला.  यासाठी संयोगला दोन-तीन महिने वाट पाहावी लागली. दरम्यान त्याने पुन्हा एकदा मिनिस्ट्रीला संपर्क केला. या सगळ्याचा परिपाक म्हणून एके दिवशी त्याला थेट संरक्षण मंत्र्यांच्या ऑफिसातून भेटीसाठी फोन आला. मा.   मनोहर पर्रीकरांनाही त्याची संकल्पना आवडली आणि त्यांनी त्याच्या लघुपटासाठी मिलिटरीची परवानगी देऊन टाकली. फिल्म बनवण्यातला एक मोठा टप्पा इथे पार पडला होता.

पण प्रकरण इतक्यात आटपायचं नव्हतं. त्याला पुन्हा एकदा दिल्लीहून भेटीसाठी बोलावणं आलं. तिथे त्यांना स्क्रिप्ट आणि इतर बाबी तपशीलात हव्या होत्या. स्क्रीप्ट अप्रूव्हल नंतर लोकेशन्सचा नंबर लागला. त्यांनी दिलेल्या लोकेशन्सवर संयोगला हवे तसे रणगाडे असणं आवश्यक होतं. शूटिंगच्या इतर बाबींसाठीही दिलेलं लोकेशन योग्य असायला हवं होतं. संयोगचा शूटिंग क्रू आणि त्यांना तिथे काम करण्यासाठी परवानग्या, एक ना दोन. सगळ्या गोष्टींसाठी दरवेळेस  संयोगला दिल्लीकडून परवानगी घ्यावी लागत होती. या सगळ्यांची तयारी करत असताना आणि स्थानिक अधिकार्‍यांशी बोलताना संयोगच्या असं लक्षात आलं की कितीही ताकदीचा अभिनेता आणला , तरी त्याच्यात तो लष्करी अधिकार्‍याची ऐट आणि रूबाब काही यायचा नाही. मग अशा एखाद्या अधिकार्‍यानेच त्याच्या फिल्ममध्ये काम केलं तर? त्यासाठी पुन्हा चलो दिल्ली!! अखेर त्या गोष्टीचीही परवानगी मिळाली.

 

आता आर्मीचेच अभिनेते आल्यामुळे ही संयोग मोहितेची फिल्म न राहता ती आर्मीची फिल्म झाली. तेव्हा इंडियन आर्मीच्या प्रतिष्ठेला साजेशी प्रॉडक्शन क्वालिटी पण असायला हवी होती. संयोगने त्यासाठी केदार फडकेंना गाठलं. केदारने शानदार , दबंग अशा फिल्म्समध्ये असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम केलं होतं. केदारलाही ही कल्पना आवडली आणि त्याच्या सुचनेनुसार संयोगने कॅमेरे आणि लेन्सेस इत्यादींची खरेदी केली. रूतेश अरोरांनी प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळली. या अशा फिल्मला म्युझिकची गरज भासतेच. साई-पियुष या संयोगच्या मित्रांनी ती ही कमतरता भरून काढली. अशा प्रकारे एकदाचं फिल्मचं शूटिंग पार पडलं. इथे शूटिंग मॅनेजमेंटची जबाबदारी हर्षद ठिपसेंनी सांभाळली.  पुढचा टप्पा होता-इडिटिंगचा. यासाठी संयोगला मदत झाली त्याच्या पुण्यातल्या एका मित्राची.  दीपक चौधरी नावाच्या या मित्रासोबत संयोगही बसायचा आणि दोघांनी मिळून एडिटिंग पार पाडले. पोस्ट प्रॉडक्शन हा देखील एक महत्वाचा भाग फिल्म शूटिंगमध्ये असतो.  केदारच्या ओळखीने प्राईमफोकसच्या सलील देशपांडेंनी या कामात खूप मदत केली. एकही पैसा न घेता त्यांनी या फिल्मचं एडिटिंग करून दिलं. तर अशा प्रकारे ही फिल्म एकदाची पूर्ण झाली. केलेल्या कामाचा योग्य गाजावाजाही व्हायला लागतो.  फिल्मच्या प्रसिद्धीसाठी पोस्टर्स आणि फोटोग्राफीही गरजेची होती. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर समीर बेलवलकर यांनी ती ही धुरा सांभाळली. त्यांच्या असिस्टंट सुकन्या सप्रेंनी स्टिल फोटोग्राफीचं काम केलं. समीर बेलवलकरांनीही हे काम अगदी विना मोबदला केलं. या प्रवासात संयोगला जशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मदत झाली, तशीच मदत आणि पाठिंबा गिरीराज पै-वेर्णेकरसारख्या मित्रांकडूनही मिळाला.

आता अजून मोठा टप्पा राहिला होता. ही बनवलेली फिल्म पुन्हा दिल्ली आणि मंत्रालयाकडून पास करून घेणं. ADGPI , आर्मी चीफ, व्हाईस चीफ या सर्वांबरोबरच पर्रीकरसाहेब आणि त्यांच्या मिनिस्ट्रीतल्या लोकांनाही ही फिल्म दाखवली गेली. त्यांना संयोगची फिल्म इतकी आवडली की त्यांनी “ही फिल्म आम्हीच रिलीज करतो” असं म्हटलं. अखेर सगळे टप्पे पार करत, परवानग्या-शूटिंग-फिल्मचं पासिंग या गोष्टींत चौदा महिने गेल्यानंतर गेल्या आठवड्यात ही फिल्म रिलीज झाली.  या कामी संयोगला खूप लोकांचं साहाय्य लाभलं हे जितकं खरं आहे, तितकीच मिळालेली मदत हे त्याच्या धडपडीचंच यश आहे हे ही आपण मान्य करायला हवं.  आजवर ही फिल्म साधारण अडीच लाख वेळा पाहिली गेलीय. संयोगला जे करायचं होतं, जो संदेश द्यायचा होता, तो अधिकाअधिक लोकांपर्यंत पोचत आहे.

 

एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर माणूस जिद्दीने त्यातून मार्ग काढतोच. संयोगच्या या प्रवासात अनिश्चितता होती, अडचणी होत्या, पण नाऊमेद न होता त्याने त्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा केला. ही स्टोरी ऐकून आणि संयोगशी गप्पा मारून आम्ही तर इन्स्पायर झालो, तुमचं काय?

 

या आर्मरचा कलाकारवृंद

अधिकारी- लेफ्टनंट कर्नल अनिंद्य मंडल

बालकलाकार- युवल गुलाटी, मितीशा गुलाटी, गालव शर्मा, अनुष्का दाते, आर्यन दाते, सिद्धांत बेलवलकर