शनिवार स्पेशल : ८ वी नापास रिक्षाचालक ते २००० प्रकारच्या इडली तयार करणारा शेफ...वाचा हा अनोखा प्रवास !!

शनिवार स्पेशल : ८ वी नापास रिक्षाचालक ते २००० प्रकारच्या इडली तयार करणारा शेफ...वाचा हा अनोखा प्रवास !!

मंडळी, आज भेटूया चेन्नईच्या एका रिक्षाचालकाला ज्याला इडली हा पदार्थ भयंकर आवडतो. पण खाण्यासाठी नव्हे तर बनवण्यासाठी. ८ वी नापास असलेले एम. एनियावन हे सध्या त्यांच्या इडली प्रयोगासाठी चर्चेत आहेत. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ते तब्बल २००० प्रकारच्या इडली तयार करू शकतात.

स्रोत

राव आपल्याला तर साधी सोप्पी खोबऱ्याची चटणी आणि सांबार असलेली इडली माहित आहे. पण हे काही तरी वेगळंच प्रकरण दिसतंय. चला आणखी जाणून घेऊया.

मंडळी, चेन्नईत राहणारे एम. एनियावन हे एकेकाळी रिक्षा चालक होते. त्यांच्या आयुष्य त्यांच्याच रिक्षात बसलेल्या एका ग्राहकामुळे बदललं. एक दिवस चंद्रा नामक स्त्री त्यांच्या रिक्षात बसली. तिच्याकडे इडलीचं मोठ्या प्रमाणात पीठ होतं. इडलीचं पीठ वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचा तिचा व्यवसाय होता.

स्रोत

चंद्रा काही दिवसातच एम. एनियावन यांची कायमची ग्राहक बनली. तिच्या व्यवसायातून प्रेरणा घेऊन एक दिवस एम. एनियावन यांनी स्वतःचं दुकान थाटायचा विचार केला. आणि अशा पद्धतीने त्यांचं हॉटेल ‘मल्लीपू इडली’ अस्तित्वात आलं.

मंडळी, इडली म्हणजे काय तर एक प्रकारे तांदळाचा केक, त्यावर खोबऱ्याची चटणी आणि सांबार. पण ही झाली साधी सोप्पी पद्धत. ही पद्धत आपण स्वीकारायची नाही असं एम. एनियावन यांनी आधीच ठरवलं होतं. त्यांनी आपल्या हॉटेल मध्ये वेगवेगळे प्रयोग केले. या प्रयोगातून त्यांनी ग्राहकांना नेहमी पेक्षा वेगळ्या तर्हेची इडली खाऊ घातली. आज त्यांच्या हॉटेल मध्ये ३० हून अधिक प्रकारच्या इडली चाखायला मिळतात. शिवाय एम. एनियावन यांना तब्बल २००० प्रकारच्या इडली बनवता येतात. एवढे प्रकार अवगत असलेले ते कदाचित पहिलेच शेफ असतील.

स्रोत

राव, त्यांच्या इडली प्रेमाचे अनेक किस्से सांगितले जातात. एक दिवस त्यांना एका लहान मुलाने पिज्जा मागितला, तर त्यांनी चक्क इडली पिज्जा तयार केला. त्यांना एका इंटरव्हू मध्ये त्यांनी इडलीवर केलेल्या प्रयोगाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘काहींना इडली हा पदार्थ कंटाळवाणा वाटतो, मला त्यांचा हा विचार बदलायचा आहे...’

एम. एनियावन यांनी १२४.८ किलो इडली तयार करून गिनीज वर्ल्ड रेकोर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. त्यांच्या इडलीवरील प्रयोगासाठी त्यांना अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. मंडळी, एका ८ वी नापास रिक्षाचालकाला अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळणं नक्कीच कौतुकास्पद आहे.

स्रोत

मंडळी, नेहमीच्या इडली या पदार्थावर त्यांनी जे प्रयोग केले ते आजवर कोणीही केले नव्हते. त्यांना इडलीचा वैज्ञानिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

आणखी वाचा :

इडली सांबार आहे हजारो वर्षं जुनं...जाणून घ्या इतिहास !!