सौदीचा राजा सलमान (आपले चुलबुल पांडे नाय!) इंडोनेशियाला निघालेत म्हणे. एक महिन्याच्या मुक्कामासाठी. ४५० टन सामान त्यानं संगती घेतलंय. यात दोन मर्सिडीज लिमोझिन गाड्या हायेत, दोन आपोआप खाली-वर होणाऱ्या शिड्या पण हायेत. देखरेखीसाठी १५०० गडी , ५० मंत्री अन लय लय राजपुत्र जोडीनं चालल्यात. (म्हंजी अख्खं गावच संगती घेतलाय पठ्ठ्यानं)
राजा कुठं बी जाऊ. ते मरूदे, पन त्याच्या सामानाचीच मार्केट मंदी लय चर्चा हाय. परवा आमची कमळा म्हणत हुती," राजा असला तरी एवढं ओझं कशापाई घेऊन जायचं? इमानातून खाली पडलं तर हकनाक जीव जाईल कुनाचा तरी."
आपण साधी माणसं कुठं जायचं म्हटलं की काय काय घेतु? दोन तीन शर्टा, पँटा, (स्वतःच्या) बायकोच्या साड्या, तिचे लिपस्टिक, पावडर, मुलांच्या चड्ड्या, बनयान, दात घासायला टूथ ब्रश, कोलगेट, कंगवा... आणि आता एवढ्यानंच ते बोचकं किती वाढतं!!
असो, राजा म्हटलं की थाट आलाच. नाय तर आपल्या इथं पन अशे राजे लय पडल्यात.
