नवरात्र आलं की , "सरडासुद्धा जितक्या झटपट रंग बदलणार नाही, तितक्या झटपट या बायका येत्या नऊ दिवसांत रंग बदलतील" हा बायकांच्या रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसण्यावर कमेंट करणारा जोक येतोच येतो. पण बायका आपल्या महाधीट. असल्या फालतू जोकला मुळीच भीक न घालता तेवढ्यात उत्साहाने ठेवणीतल्या साड्या नेसून ऑफीसला जायला निघतात. काहीजणी आणि काहीजणसुद्धा, हा रंग म्हणजे अगदी जीवापाड पाळतात. कधी त्या निमित्तानं नव्या खरेद्यासुद्धा होतात. काही लोकांची ,"नाहीतरी एवीतेवी कपडे घालायचे असतातच ना, मग घालू आजचा रंग" अशी भावना असते. तात्पर्य काय, मनापासून किंवा गंमत म्हणून महाराष्ट्रात बरीचशी जनता हे रंगांचं फॅड एंजॉय करते.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता..




