हे ७ देश आहेत आर्थिक संकटाच्या खाईत !!

लिस्टिकल
हे ७ देश आहेत आर्थिक संकटाच्या खाईत !!

जागतिक स्थरावर काही देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती बघता २०१८ पूर्ण होई पर्यंत या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असेल असाच अंदाज व्यक्त होतोय. आजच्या घडीला या अर्थ संकटात ७ देश अडकलेत. मंडळी सुदैवाने यात आपला देश नाही. पण ही बाब चिंताजनक असून त्यातून वेळीस योग्य धडा घ्यायला हवा.

चला तर बघुयात ते ७ देश आहेत तरी कोणते आणि त्यांच्या आर्थिक मंदीचं नक्की कारण काय आहे !!

१. इक्वेटोरीयल गयाना

१. इक्वेटोरीयल गयाना

गयाना (Guinea) देशाचं अर्थकारण तेलावर निर्भर आहे. या देशाकडे तेलाचे मुबलक साठे असून सुद्धा त्यांना त्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नाही. हा देश अजूनही तेलाच्या योग्य किमतीसाठी झगडतोय. याचाच परिणाम म्हणजे दरडोई उत्पन्न आणि दरडोई कर्ज यात बरीच मोठी तफावत निर्माण झाली आहे. या मंदीची झळ २०१३ पासून गयानाला बसत आहे. पण आता तिने आपली पातळी ओलांडली असल्याने २०१८ संपे पर्यंत देश दिवाळखोर होईल असाच अंदाज बांधला जातोय.

२. व्हेनेझुएला

२. व्हेनेझुएला

पेट्रोलियम वर ज्या देशांची अर्थव्यवस्था आहे त्या देशांमधील एक प्रमुख देश म्हणजे व्हेनेझुएला. तेल उत्पादक देशांमधला सर्व मोठ्या देशात व्हेनेझुएलाचा समावेश होते. पण हे सर्व काही मागील काही वर्षांपर्यंतच होतं. सध्या तेलातून येणारं उत्पन्न इतकं कमी झालं आहे की प्रती बॅरल १०० डॉलर असलेली किंमत घसरून फक्त ३० डॉलर इतकी उरली आहे. हे कमी होतं म्हणून की काय राजकीय अस्थिरतेने सुद्धा यात आपला हातभार लावला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे देशावर कर्जाचा डोंगर आणि दरडोई उत्पन्न कमी. इथली एकेकाळची भक्कम अर्थव्यवस्था आता डबघाईला पोहोचलेली दिसत आहे.

३. झिंबाब्वे

३. झिंबाब्वे

२००० साला पासून झिम्बाब्वे आर्थिक संकटातून जात आहे. तिथली अर्थव्यवस्था अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. काही वर्षांपासून इथल्या चलना बद्दल एक पोस्ट तुम्ही पहिली असेल. यात माणसं नोटांच्या थप्प्या घेऊन जाताना दिसतात. पण या झिम्बाब्वेच्या चलनाची बाजारात काहीच किंमत नाही. म्हणजे एक ‘मॅगी’ विकत घेण्यासाठी त्यांना हजारो रुपये मोजावे लागतात.

९५ टक्के बेरोजगारीच्या संकटात हा देश अडकला आहे. काही काळापूर्वी अध्यक्ष रोबर्ट मुगाबे यांना पदावरून हटवणे आणि त्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्या पर्यंत इथलं राजकीय वातावरण अजूनही तापलेलं आहे. अश्या अवस्थेत असताना या देशाचं टिकून राहणं कठीण दिसतंय.

४. येमेन

४. येमेन

येमेन देशाची आर्थिक परिस्थिती खालावण्याचं मुख्य कारण तिथल्या यादवी युद्धात आहे. युद्धाचा परिणाम तेल उत्पादनातून येणाऱ्या ७० टक्क्यापेक्षा जास्त नफ्यावर झाला असल्याने सगळी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेती व्यवसाय आणि इतर उत्पन्नाचे स्रोत ठप्प पडलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळली तर या देशाला पुन्हा उठून उभं राहायला मदत होईल. पण ते कधी होणार या बद्दल मोठा प्रश्न चिन्ह आहे.

५. हैती

५. हैती

हैतीची समस्या निसर्गानेच निर्माण केली आहे. सप्टेंबर २०१७ च्या दरम्यान या देशात २ वादळं आली ज्यामुळे इथलं जीवन विस्कळीत झालं. निसर्गाचा कहर अधून मधून इथे होत असतो. त्यामुळे इथली अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या देशाला एकच गोष्ट वाचवू शकते ती म्हणजे इथे सध्या सुरु असलेली विकासाची कामं. शेती, व्यवसाय, उद्योगधंदे याची सांगड अजून बसलेली दिसत नाही. यात भरीसभर म्हणजे हैती मधलं राजकीय वातावरण देखील अस्थिर आहे.

६. मोझांबिक

६. मोझांबिक

मोझांबिक देशावर कर्जाचा डोंगर आहे. या देशाचं कर्ज अनेकदा माफ होऊन सुद्धा अर्थव्यवस्थेत सुधारणा आलेली नाही. अर्थव्यवस्थेतला कर्जबाजारीपणा आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे विदेशी गुंतवणूक पूर्णपणे थांबलेली आहे. अश्या अस्थिर वातावरणात देश कधी पर्यंत टिकेल याबद्दल शंकाच आहे.

७. दक्षिण सुदान

७. दक्षिण सुदान

या देशाची स्थिती आपल्या विदर्भासारखी झाली आहे राव. भयानक दुष्काळ आणि त्यामुळे शेतीवर झालेला घातक परिणाम आज देश भोगतोय. या देशाचे तेल उत्पादनातून येणारा नफा सुद्धा बंद पडला आहे. स्वच्छ पाणी, वीज, रस्ते या सारख्या मुलभूत गरजांसाठी हा देश आज झगडताना दिसतोय.

 

मंडळी, या देशांची जशी आज परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आपल्यावर ९० च्या दशकात ओढवली होती. पण आपण योग्यवेळी जागतीकरणाच्या दिशेने वळल्यामुळे आपल्यावर आलेलं संकट दूर झालं आणि आपली अर्थव्यवस्था बुडण्यापासून वाचली !!