मंडळी, कर्नाटकातील नागरहोल नॅशनल पार्क मध्ये विनय कुमार आणि त्याचे साथीदार श्रीकांत राव जंगलातले कॅमरांची पाहणी करत होते. हे कॅमेरा जंगलाचं निरीक्षण करण्यासाठी लपवलेले होते. हे काम करत असताना त्यांना एक अजब दृश्य दिसलं. एक हत्ती चक्क धुम्रपान करत होता.
आता हत्तीला जंगलात सिगरेट वगैरे कोणी दिली ? असले प्रश्न विचारू नका राव. हत्ती ज्या गोष्टीने धुम्रपान करत होता ती गोष्ट होती कोळसा. हत्ती आपल्या सोंडेने कोळशाचे गरम तुकडे तोंडात टाकत होता आणि त्यातून धूर बाहेर सोडत होता.
हत्ती स्मोकिंग मध्ये व्यस्त असताना विनय कुमारने हा व्हिडीओ टिपला. खरं तर ही घटना आहे २०१६ ची. हत्तीच्या या वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर व्हिडीओ ला नुकतंच व्हायरल करण्यात आलं आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हत्तीला पण तोच आनंद येत आहे का जो आनंद सिगरेटमुळे मनुष्य प्राण्याला येतो ? तर तसं नाहीये, अभ्यासावरून असं समजतं की कोळशात असलेल्या काही नैसर्गिक गुणधर्मांमुळे पोटात गेलेले विष शोषले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत ‘adsorption Quality of activated carbon’ असे म्हटले जाते. खरं म्हणजे activated carbon च्या या गुणधर्माचा उपयोग आपणही एकेकाळी करत होतो. आठवते का तुम्हाला माकड छाप काळे दंत मंजन ? ज्या मंजनातल्या कोळशामुळे तोंडाला येणारा घाणेरडा वास नाहीसा व्हायचा ते !
पोटातील विषारी वायू, विष शोषून घेण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये कार्बनच्या गोळ्या दिल्या जातात. आता हे सगळे कसे त्या हत्तीला कळले ? हे आपल्याला कळणार नाही. आपल्याला विषबाधा झाली तर डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते पण प्राण्यांसाठी डॉक्टर म्हणजे निसर्गच असं म्हणावं लागेल.
शेवटी एक सांगायचं राहीलंच....हा हत्ती नसून हत्तीण आहे बरं का.
