भारतातील एकमेव 'बाउन्सर्स'चं गाव...वाचा या अनोख्या गावाबद्दल !!

भारतातील एकमेव 'बाउन्सर्स'चं गाव...वाचा या अनोख्या गावाबद्दल !!

बार किंवा क्लबसारख्या ठिकाणी काही हट्टीकट्टी माणसं दरवाजावर उभी दिसतात. ही माणसं शांततेत दारावर किंवा गर्दीच्या ठिकाणी उभी राहून देखरेखीचं काम करत असतात. यांना बाउन्सर म्हटलं जातं. हे एक प्रकारे सिक्युरिटी गार्डचं काम करत असतात. यांच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नसलं, तरी हे लोक एक महत्वाचं काम करत असतात हे आपल्याला बऱ्याचदा माहित नसतं.
मंडळी आज बाउन्सरबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे दिल्लीमधली दोन गावं.. या गावांतून  सर्वात जास्त बाउन्सर तयार होत आहेत. या गावाला बाउन्सर्सचं गाव म्हटलं तर वावगं ठरणार नाही!!

असोला आणि फतेहपुर बेरी असं या गावांची नवे. ही गावे दिल्लीच्या दक्षिण भागात आहेत. मागच्या १६ वर्षांपासून या गावांची ओळख ‘बाउन्सर विलेज’ म्हणून तयार झाली आहे. दिल्लीमधले बहुतेक सर्वच क्लब्स आणि बारमध्ये या गावातून आलेली तरुण मंडळी बाउन्सरचं काम करताना दिसतात.

पण एकाच गावातून एवढे बाउन्सर का? याची सुरुवात कशी झाली ?

स्रोत

१६ वर्षांपूर्वी विजय तन्वर नावाच्या एका तरुणाला ऑलम्पिकमध्ये जायचं होतं, पण काही कारणानं ते शक्य झालं नाही. यामुळे त्याने बाउन्सरचं काम स्वीकारलं. हा विजय या गावचा  पहिला बाउन्सर झाला. त्यानंतर त्याने गावातील इतर तरुणांना या कामासाठी प्रेरित केलं. आता १६ वर्षानंतर विजयची स्वतःची सिक्युरिटी कंपनी देखील आहे. आजतागायत गावातील जवळपास १००० पेक्षा जास्त तरुण दिल्लीत  बाउन्सर म्हणून काम करत आहेत.

बाउन्सर म्हटलं की शरीर सौष्ठव महत्वाचं आहे. यासाठी लागणारी मेहनत आणि व्यायाम हे सगळं गावातील आखाड्यात होतं. २ तास व्यायाम आणि विशेष डायट हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम असतो. भल्या पहाटे उठून दंड बैठका मारणे, सूर्य नमस्कार, कुस्ती इत्यादींमधून ही मंडळी स्वतःला तयार करत असतात, जेणेकरून त्यांची निवड बाउन्सर म्हणून व्हावी.

बाउन्सर आणि त्याचं काम !!

स्रोत

बाउन्सरचं काम हे दिसतं तेवढं सोप्पं नाही. हाताची घडी घालून एकाजागी उभे राहणे एवढ्यापुरते ते मर्यादित नसते. क्लब किंवा बारसारख्या ठिकाणी अनेकदा भांडण-राडे होत राहतात. अश्यावेळी बाउन्सरला झगडे मिटवून इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यात फक्त शरीराने धष्टपुष्ट असून चालत नाही, तर  स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे, परिस्थिती हाताळता येणे अशी कौशल्ये अंगी असावी लागतात.

मंडळी, बाउन्सर बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी या गावातील तरुण तयारी करत असतात. या खडतर तयारीनंतर जी नोकरी मिळते त्यात त्यांना जवळपास ५०,००० पर्यंत वेतन दिले जाते. असं म्हणतात की या गावातील प्रत्येक घरात एक तरी बाउन्सर आहेच. सैन्यात न जाऊ शकलेल्या, अशिक्षित तरुणांना विजय तन्वर ने यामार्फत एका नवीन रोजगाराच्या दिशेने नेलं आहे. आजही यातील अनेक तरुणांचं स्वप्न ऑलम्पिकमध्ये जायचं हेच असलं तरी पोटापाण्यासाठी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो नाही का ?