सहज सोपे अर्थसूत्र:सोप्या भाषेत समजून घ्या स्पेशल पर्पज व्हेइकलची संकल्पना !

लिस्टिकल
सहज सोपे अर्थसूत्र:सोप्या भाषेत समजून घ्या स्पेशल पर्पज व्हेइकलची संकल्पना  !

एअर इंडीया पुन्हा एकदा टाटांच्या हातात आली  ही बातमी आता थोडी शिळी झाली आहे.आता यानंतर एअर इंडीयाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी भारत सरकार स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही)ची स्थापना करणार आहे. साहजिकच हा विषय वारंवार चर्चेत येणार आहे.आर्थिक क्षेत्रात नसणार्‍या सर्वसामान्यांना 'स्पेशल पर्पज व्हेइकल'  म्हणजे काय हे एक कोडंच आहे. सहज सोपे अर्थसूत्र या मालिकेच्या आजच्या भागात ही संकल्पना समजून घेऊ या !- बोभाटा

मोठमोठ्या कंत्राटांची वैशिष्ट्ये अशी असतात-

मोठमोठ्या कंत्राटांची वैशिष्ट्ये अशी असतात-

१) ती पूर्ण करण्यासाठी खूप मोठी आर्थिक क्षमता लागते.
२) ती पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागतात.
३) ती करण्यासाठी विशेष तांत्रिक ज्ञानाची गरज असते.
५) यात मोठ्या प्रमाणावर नफा जसा संभवतो तसे नुकसानही मोठ्या प्रमाणावर संभवते आणि प्रत्यक्षात तसे नुकसान झाले तर कंत्राट घेणारा पार बुडून जाऊ शकतो.
म्हणूनच अशी कंत्राटे अनेक कंपन्या एकत्र येऊन घेतात.या एकत्र येण्याला कोलॅबोरेशन किंवा कन्सॉर्टियम असे म्हणतात.यासाठी  एक स्वतंत्र लिमिटेड कंपनी स्थापना केली जाते.

एका विशिष्ट उद्दिष्टाने स्थापन केलेली कंपनी म्हणून तिला स्पेशल पर्पज व्हेइकल असे संबोधिले जाते.एसपीव्ही ही कायद्याने निश्चित केलेली संज्ञा नाही. कंपनीला एसपीव्ही असे संबोधिल्याने सर्व संबंधितांना हे ज्ञात होते, की ती एका विशिष्ट कामासाठी स्थापित केली गेली आहे आणि ते काम संपल्यावर ती अस्तित्वात न राहण्याची शक्यता आहे.जे त्या एसपीव्हीला कर्ज देणार्‍यांना ही बाब ज्ञात असणे गरजेचे असते.

एसपीव्ही स्थापन करण्याचे महत्त्वाचे फायदे असे
१) ज्या कंपन्या एसपीव्ही स्थापन करतात, त्याच तिचे भागधारक बनतात. कंत्राटे एसपीव्हीच्या नावाने घेतल्यामुळे त्यापासून होणारा नफा वा नुकसान एसपीव्हीचेच असते. आणि कंपनी कायद्यानुसार भागधारकांचे जास्तीत जास्त नुकसान हे त्यांनी घेतलेल्या भागांच्या रकमेइतकेच असू शकते. म्हणजेच एसपीव्ही स्थापन करून ती स्थापन करणार्या कंपन्या आपले संभावित नुकसान मर्यादित करू शकतात.
२) प्रकल्पपूर्तीसाठी त्या व्यवस्था आणि तंत्र विकसित करू शकतात.
३) विविध तज्ज्ञांची नियुक्ती करू शकतात.
४) एखाद्या प्रकल्पपूर्तीच्या अनुभवाचा फायदा तसाच अन्य प्रकल्प हाती घेण्यासाठी घेऊ शकतात.

पण एसपीव्हीच्या मर्यादाही असतात.त्या नव्याने स्थापन झाल्या असल्यामुळे त्यांची कर्ज मिळवण्याची क्षमता कमी असते.अनेक वेळा त्यांच्याकडे तारण ठेवण्यायोग्य मालमत्ता नसते.अशा परिस्थितीत ज्या कंपन्या एसपीव्ही स्थापन करतात त्यांना आपल्या मालमत्तेच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून द्यावे लागते वा कर्जाची हमी द्यावी लागते.
काही वेळा कंपन्या आपल्या मुख्य धंद्यातील काही भाग चालवण्यासाठी एसपीव्ही स्थापन करतात. हे, विशेषकरून तेल शोधणाऱ्या कंपन्या करतात. तेल शोधणे हे तेल शुद्धीकरण आणि विक्रीपेक्षा जास्त खर्चिक असते आणि तेल न सापडल्याने नुकसानही त्यात जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून तेल शोधण्यासाठी अनेक तेल कंपन्या एसपीव्हीची स्थापना करतात.