(शेअर बाजारावरचा हा लेख वाचताना तो ललित साहित्य प्रकारात मोडणारा आहे असे तुमचे मत होण्याची शक्यता आहे.तो समज बाजूला ठेवून हा लेख वाचावा.कठीण संकल्पना सहजसोप्या भाषेत समजाव्यात म्हणून ललित लेखनाची शैली वापरली आहे.)
माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांची ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ह्यांचे व्यक्तीमत्व फार उत्तम.गाठीला चार पैसे बांधूनही होते.समस्या एकच होती.त्यांचं लग्न जमत नव्हतं.लग्न न जमण्याचं एकच कारण होतं.ते मुंबईच्या शेअरबाजारात नोकरीला होते नोकरी करता करता अधून मधून सट्टा पण करायचे.
आता सट्टा करणार्याला मुलगी देणार कोण ? बर्याच वर्षांनंतर त्यांचं लग्न झालं .संसार मार्गी लागला.काल परवा एका लग्नात मला भेटले. मुलगा लग्नाचा आहे वगैरे सांगत होते. मुलगा सीए आहे. एका म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर म्हणून काम करतो आहे. हे सगळं सांगता सांगता हसायला लागले. मी हसण्याचं कारण विचारलं तर म्हणाले
"अहो आमच्याच ओळखीतली पंचवीस स्थळं आलीत सांगून. निर्णय घेणं कठीण झालं आहे. बाप सठीसामाशी सट्टा करायचा तर केव्हढी अडचण लग्नाला आणि मुलगा रोज सट्टा करतो तर ढिगभर स्थळं."
साधारण २००० सालापासून समाजमनात किती फरक पडला आहे हे सांगण्यासाठी हा किस्सा सांगीतला.
शेअर बाजार -सट्टा-असं काही म्हटलं की नुकसान -कर्ज -दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यासमोर उभे राहण्याचे दिवस आता राहीले नाहीत पण अजूनही मराठी माणसाला शेअरबाजाराची आणि त्यातल्या गुंतवणूकीबद्दल जी अढी आहे ती नाहीशी झालेली नाही.योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा नवसागरात बुडून जातो हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली शोकांतीका आहे


