राणी व्हिक्टोरिया.. तीच ती, तिच्या नावाचा बंदा रूपया तेव्हा हिंदुस्थानात खणखणीतपणे चालायाचा. १८५७च्या बंडानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी खालसा झाली आणि व्हिक्टोरिया हिंदुस्थानाची सम्राज्ञी झाली. तर, या व्हिक्टोरियाचे आधीचे तीन काका आणि चौथ्या नंबरला असलेले बाबा, असे सगळेच वारले. त्यामुळं वयाच्या अठराव्या वर्षीच ती या राजगादीची वारस ठरली आणि १८३७ ते तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १९०१पर्यंत तिनं राज्य केलं. आपल्या भारतात पण तिचं स्मारक आहे बरं. कोलकात्याला कधी गेलात तर व्हिक्टोरिया मेमोरियल म्हणून मोठी वास्तू आहे. एकदा पाहाण्यासारखं नक्की आहे. पण एक लोचा आहे. तिथले पुतळे, नावं आणि शिल्पं बघून शाळेत शिकलेला इतिहास आठवायला लागतो राव.

आता व्हिक्टोरिया कोण हे कळलं, पण त्याच्यावर सिनेमा बनवावा असा हा अब्दुल कोण टिकोजीराव आहे?

तर हाफीझ मोहम्मद अब्दुल करीम असं लांबलचक नांव असलेला हा माणूस राणीचा नोकर होता. राणीच्या कारभाराला ५० वर्षं झाली म्हणून १८८७ला एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. तिथं तिला दोन भारतीय नोकर देण्यात आले होते. त्यातला एक म्हणजे हा अब्दुल. झाशीला जन्मलेला, एका हॉस्पिटलमधल्या सहायकाचा मुलगा, अब्दुल. त्याचं काम राणीला आवडलं. तिनं त्याला मुन्शी म्हणजेच क्लार्क- मराठीतच सांगायचं तर कारकून- हे पद दिलं, त्याला आपला भारतीय सेक्रेटरी बनवला, त्याच्यासाठी खास इंग्रजीची शिकवणी लावली, त्याच्याकडून हिंदी/उर्दू भाषा शिकली, त्याला मानमरातब आणि जमीनही बहाल केली.
सगळं तर ठीक दिसतंय, मग माशी शिंकली कुठं?
म्हणजे आतापर्यंत तरी या गोष्टीत भानगड किंवा प्रकरण म्हणावं असं काही दिसत नाहीय ना? पण घडलं मात्र खरं. तेव्हा ब्रिटिश राजघराण्यातले आणि दरबारातले लोक भारतीयांना जवळ करत नसत. त्यांची उठबस राजे आणि राजकुमार एवढ्याच लेव्हलच्या लोकांपर्यंत. फार फारतर एखाद्या सरदारासोबत खेळ खेळणं किंवा सोबत राहाणं असे. अर्थातच हा कोण कुठला नोकर-कम-कारकून त्यांना थोडाच खपणार? आणि राणीला तर अब्दुलबद्दल खूपच विश्वास. हा बरेचदा राणीच्या सोबत असे. राणी त्याच्याकडून भाषा शिकताशिकता राज्यकारभारात सल्ला घेई. एकीकडं राणी तिच्या पत्रव्यवहारात त्याचं कौतुक करे तर दुसरीकडं त्याचं वाढतं महत्व राजघराण्यातल्या लोकांना खुपू लागलं.

बरं, हा अब्दुलपण कारकून असेल तर आपल्या पायरीनं राहील की नाही? असं म्हणतात की अब्दुल नोकरीवर रूजू झाल्यापासून दोनच वर्षांत म्हणजे १८८९मध्ये राणीच्या मुलानं राणीसाठी मनोरंजनाचा एक कार्यक्रम ठेवला होता. साहजिकच राजघराण्यातल्या लोकांची बसण्याची व्यवस्था वेगळी होती आणि नोकरांची वेगळी. अब्दुलला नोकरांमध्ये बसवण्याची व्यवस्था केली गेली होती. हा बहाद्दर तिथं न बसता रागारागात आपल्या खोलीत निघून गेला. राणीनंही त्याची बाजू घेतली आणि त्याच्यासाठी घरच्या लोकांसोबत बसण्याची व्यवस्था करायला हवी असं सुचवलं. इतकंच नाही, तर त्याच्या पुढच्याच वर्षी ब्रेमर खेळांच्या वेळेस तो राजे आणि राजकुमारांसोबत बसला.

हे इथंच संपत नाही. अब्दुलला राहाण्यासाठी राणीनं तिच्या डॉक्टरांसाठी असलेली खास खोली देऊ केली आणि खाजगी बैठकीची खोलीसुद्धा त्याला वापरायला मिळाली. राणीनं त्याचं खास तैलचित्र बनवून घेतलं होतं. हा मान मिळणारा कदाचित अब्दुल पहिला काळा माणूस असू शकेल. तिला तिच्यामाघारी या मुन्शीची आबाळ होईल हे माहित होतं, त्यामुळं जमीनीचं दानपत्र तर तयार करून घेतलं होतंच. आता राणी एवढं दोन्ही हातांनी भरभरून देतेय म्हटल्यावर हा तरी कसा गप्प बसेल? अब्दुलनं राणीला ’नबाब’ हा किताब आणि ’सर’ ही पदवीदेखील मागितली. झालं! मंत्रीमंडळ चिडलं! त्यांनी फारतर राणीनं त्याचा राणीच्या खास दलात समावेश करावा असं सुचवलं. त्यामुळं त्याला कुठलेही किताब मिळाले नसते आणि भारतीय राजकारणावरही त्याचा काही परिणाम झाला नसता. पण कसलं काय, ८०व्या वाढदिवसाच्या प्रसंगी राणीनं त्याला कमांडर ऑफ द ऑर्डर हे सरदार आणि राजदरबारातला मानकरी यांच्या अधलंमधलं असलेलं पद देऊन टाकलं. आता राणीच त्याला इतकी सामील असेल तर अब्दुलची अरेरावी वाढली नसेल तर नवल.
पण या सगळ्यांत जर काही सर्वात जास्त वादग्रस्त ठरलं असेल तर, राणी आणि अब्दुलचा स्कॉटलंडमधल्या बाल्मोरल इथं राहताना एका दूरच्या इस्टेटीवरचा एका रात्रीचा मुक्काम. तेव्हा राणी होती सत्तर वर्षांची आणि अब्दुल होता सव्वीस वर्षांचा. लोकांना त्यांच्या मैत्रीवर आक्षेप होते तर मग त्यांच्या या मुक्कामावर आक्षेप नसतील असं कसं होईल? तिचं त्याच्यावर पुत्रवत प्रेम होतं असं काहीजणांचं म्हणणं आहे, तर काहीजण त्यांच्यात वेगळंच भावनिक नातं होतं असं म्हणतात. काही असो, लोकांचा अब्दुलवरचा राग दिवसेंदिवस वाढत होता हे नक्की.

अब्दुलचा सर्वात मोठा गुन्हा:
अवघ्या सात महिन्यांत साध्या नोकराचा मुन्शी होणं, राणीशी जवळीक असणं, त्या दोघांची मैत्री, राजघराण्यातल्या लोकांसोबत उठबस आणि लोकांनी तितकाच मान द्यावा अशी अपेक्षा ठेवणं हे जसं लोकांच्या डोळ्यांत खुपलं, तितकाच खुपला त्याचा उद्धटपणा आणि अरेरावी. याहीपेक्षा मोठा त्याचा गुन्हा होता- भारतीय असण्याचा. एका काळ्या माणसानं गोर्यांच्या पंक्तीला बसणं, त्यातही राजघराण्यातल्या लोकांच्या पंक्तीला बसणं, हे ब्रिटिशांना कधीही न मानवणारं होतं.
राणीनंतर अब्दुलचं काय झालं?
राणीच्या नऊ मुलांतला दुसर्या नंबरचा मुलगा एडवर्ड. के ई एम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल्स ज्याच्या स्मरणार्थ काढले गेले, तोच तो. यानं राणीच्या मृत्यूनंतर आधी अब्दुल आणि त्याचे जे कुणी संबंधित होते, त्यांना दरबारातून बडतर्फ केलं आणि परत भारतात पाठवलं. मात्र एडवर्डनं अब्दुलला राणीचं अंत्यदर्शन घेऊ दिलं आणि अंत्यविधींतही सामील होऊ दिलं. त्यानं अब्दुल आणि राणी यांच्यामधला पत्रव्यवहार जप्त करून जाळून टाकला. अब्दुल हुशार होता. त्यानं दानपत्रात मिळालेल्या जमिनीशेजारी आणखी जमीन घेतली होती. अर्थातच राणीचा त्याकडेही कानाडोळा होता. त्यामुळं भारतात आल्यावर तो श्रीमंत माणूस होता. त्याची जमीन आग्र्यात होती. तिथं त्यानं करीम लॉज बांधलं. दोन लग्नं केली. पुन्हा एकदा एडवर्डच्या सांगण्यावरून दिल्लीच्या कमिशनरनं त्याच्या घरावर छापा घातला आणि राणीसोबतची आणखी काही पत्रं हस्तगत केली. इथंच तो अवघ्या ४६व्या वर्षी वारला.

या अब्दुल आणि राणी व्हिक्टोरियाच्या अनोख्या मैत्रीवरती आपल्या भारतीय लेखिका श्रावणी बासू यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकावर आधारित – ’ व्हिक्टोरिया ऍंड अब्दुल’हा सिनेमा २०१७ साली येऊन गेला. या पुस्तकामुळं एका नोकरानं राजघराण्यात काय खळबळ माजवून दिली होती हे कळतंय. सिनेमात अबुदलचं काम केलंय अली फजल याने. थ्री इडियट्समध्ये गिव्ह मी सम सनशाईन म्हणत आत्महत्या केलेला, तोच तो अली फजल. त्याला हा चांगला मोठा ब्रेक मिळालाय. आणि व्हिक्टोरियाची भूमिका केलीय ज्यूडी डेन्चने. ही पण मोठी नावाजलेली ब्रिटिश अभिनेत्री आहे. आता तुम्ही लै ब्रिटिश सिनेमे बघितले नसतील, पण मॅडम एम म्हणून जेम्स बॉन्डच्या सिनेमात हिला नक्कीच पाह्यलं असेल.
माहितीस्त्रोत- विकिपिडिया