इन्स्टा रील्स बघण्यात तासंतास कसे जातात कळत नाही ना? सोशल मिडियाच्या या जमान्यात इंस्टाग्रामने एक वेगळाच ठसा उमटवला आहे. अल्पावधीत अब्जावधी युजर्सचा आकडा पार करणाऱ्या या ॲपची जन्मकथाही तितकीच रोमांचक आहे. गुगलमधून बाहेर पडलेल्या एका तरुण प्रोग्रॅमरने आपल्या व्हिस्की आणि बर्बनच्या वेडापोटी एक ॲप तयार करण्याचे ठरवले. ज्या ॲपवर चांगली व्हिस्की कुठे मिळते याची माहिती, त्या ठिकाणचा फोटो पोस्ट करून मित्रांना आपल्या प्लॅनची माहिती देता येईल अशा उद्देशाने त्याने बर्बन नावाचे एक ॲप सुरू केले. याच ॲपवर एकमेकांशी चॅट करण्याची सुविधाही सुरुवातीपासूनच होती. २००९ साली लॉंच झालेले बर्बनच पुढे जाऊन इंस्टाग्राम बनले.
सत्तावीस वर्षाच्या केविन सिस्ट्रोमने बर्बन हे ॲप तयार केले. बर्बनवर फोटो टाकताना तो विविध फीचर्ससह एडीट करण्याची सोय होती. त्यामुळे युजर्सना हे ॲप खूपच भावले होते. केविनचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला होता की एकाच वर्षात या ॲपला आणखी डेव्हलप करण्यासाठी गुंतवणूकदार स्वतःहून त्याच्या मागे लागले. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१० साली केविनने ५००,०००डॉलर्स इतका निधी जमवला. बर्बनला नवे रूप देण्यासाठी त्याने पंचवीस वर्षाच्या माईक क्रीगरचीही मदत घेतली. दोघेही एकाच युनिव्हर्सिटीत शिकले असल्याने एकमेकांना चांगले ओळखत होते. दोघांच्या कल्पनेतून इंस्टाग्रामचा जन्म झाला. इस्टंट आणि टेलिग्राम अशा दोन शब्दांपासून इंस्टाग्राम हे नवा शब्द तयार झाला.


