भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही शेती ही उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. अनेक शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करून अधिक चांगला नफा कमवत आहेत. सेंद्रिय पद्धत शेतीसाठी वरदानच ठरत आहे. आज आपण अशा एका महिला शेतकऱ्याबद्दल बोलू ज्यांनी आपल्या अनोख्या शेतीपद्धतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ज्या शेतातून साधा लागवडीचा खर्चही काढणे कठीण होते, त्या शेतात या महिलेने आपल्या परिश्रमांनी टोमॅटोचे पीक घेतले. आता त्यांचे टोमॅटो परदेशात जात आहेत.
शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !!


कनकलता यांचं वय ५२ वर्षे आहे. त्या उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात राहतात. विठ्ठलपूर गावात असलेल्या त्यांच्या शेतात त्या टोमॅटोची लागवड करतात. कनकलता यांच्या टोमॅटोला यूके आणि ओमान सारख्या देशांकडून मागणी आहे. पूर्वी त्या लागवड पारंपारिक जुन्या पद्धतींनी करायच्या पण त्यामुळे नफा फारसा व्हायचा नाही. मग एकेदिवशी त्या नाबार्ड आणि कृषी विभागाच्या एक कॅम्पमध्ये गेल्या, तिथे त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याची माहिती मिळाली आणि तेव्हा त्यांनी ठरवले की या पद्धतीने शेती करायची.

कनकलता त्यांच्या दीड एकर शेतात मटार आणि टोमॅटोची लागवड करत. चांगले उत्पादन होत नसल्याने उत्पन्न तुटपुंजे होते, पण जेव्हापासून कनकलता यांनी शेतीची पद्धत बदलली आहे तेव्हापासून उत्पादन वाढू लागले. त्यांनी शेतात सेंद्रिय खताच्या साहाय्याने ठिबक सिंचन व तुतीच्या पालापाचोळा वापरुन टोमॅटोची लागवड केली. या नवीन तंत्राने त्यांचं उत्पन्न वाढलं. आता दररोज दीड ते ७ क्विंटल टोमॅटो त्यांच्या शेतात पिकतात. केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा त्यांनी मिळवला आहे. एवढंच नाही तर त्यांच्या शेतात पिकलेले टोमॅटो परदेशातही जातात. लंडन आणि ओमान सारख्या देशांत त्यांच्या टोमॅटोला खूप मागणी आहे.

कनकलता यांना नवचेतना अॅग्रो सेंटर प्रोड्यूसर लिमिटेड नावाच्या कंपनीकडून या आधुनिक शेतीची माहिती मिळत राहते. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश पांडे म्हणतात की, 'कनकलता यांनी सेंद्रिय खत वापरून नव्या प्रजातींचे टोमॅटो तयार केले आहेत. केवळ साठ हजार रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड करून तिप्पट फायदा मिळवला आहे.'
या टोमॅटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे टोमॅटो काही महिने खराब होत नाही. अशा नवीन प्रजातींमुळे या टोमॅटोची मागणी वाढत आहे. ओमान आणि लंडन येथे त्यांनी टोमॅटो पाठवल्यानंतर टोमॅटोच्या उत्तम दर्जाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. त्या शेतकऱ्यांना आता या नवीन पद्धतीने शेती करण्यास मार्गदर्शनही करत आहेत.

कनकलता यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेतीची ही पद्धत आता त्यांच्या जिल्ह्याची ओळख बनली आहेत. कनकलता यांनी हे दाखवून दिले की शेतात नीट अभ्यास आणि मार्गदर्शन मिळवून लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळवणे सोपे जाते.
लेखिका: शीतल दरंदळे