या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंद पंजीरी हा एक ख़ास प्रसाद बनवू या! 

या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंद पंजीरी हा एक ख़ास प्रसाद बनवू या! 

 

पंजीरी किंवा सुंद पंजीरी म्हणजे खिरापत! आपल्या मराठी घरात फारशी परिचित नसलेली ही खिरापत आहे. उत्तर भारतात पंजीरीचे विशेष महत्त्व जन्माष्टमीला असते.  चरणामृत आणि पंजीरी हे दोन्ही पदार्थ अगदी ख़ास असतात.

एरवी येता जाता खाण्यासाठी पंजीरी हिवाळ्याच्या दिवसात बनवली जाते किंवा पंजीरीचे लाडू बनवले जातात. 

आज पंजीरीची रेसीपी ख़ास तुमच्यासाठी..

१ वाटी गव्हाचे पीठ

१/२ वाटी गव्हाचा रवा 

१ वाटी साखर , पाव वाटी खडीसाखर

१ वाटी काजू तुकडा, बदाम अर्धे केलेले तुकडे आणि चारोळी

१ वाटी  मखाणे

१/४ वाटी डिंक (छोटे खडे )

एक वाटी तूप (वनस्पती तूप नाही)

खरबूजाच्या बिया किंवा त्या मिळाल्या नाहीत तर कलिंगडाच्या बिया

गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या चुरडून एक चमचा.

कृती : कढई गरम करून त्यात चमचाभर तूप घाला. तूप गरम झाले की त्यात मखाणे परतून घ्यावेत. मखाण्याचा रंग बदलून सुगंध आल्यावर ते बाहेर काढून घ्यावेत. आता पुन्हा चार चमचे तूप कढईत गरम करून डिंक तळून घ्यावा.

त्यानंतर याच पध्दतीने सुकामेवा तळून घ्यावा. फ़क्त या मिश्रणात बिया शेवटी घालाव्यात.

आतापर्यंत परतलेले सर्व पदार्थ बाजूला ठेवून गरम कढईत उरलेले सगळे तूप टाकून त्यावर गव्हाचा रवा आणि पीठ परतायला सुरुवात करावी. हे परतत असताना झारा सतत फिरला पाहीजे. तसे न केल्यास मिश्रण करपण्याची शक्यता असते. गुलाबी रंग चढून घरभर दरवळ पोहचला की साखर घालून शेवटचा हात फिरवावा. गॅस बंद करून आधी तळलेले सर्व पदार्थ मिसळून एक सारखे करावे.पूर्ण थंड झाल्यावर खडी साखर -गुलाबाच्या पाकळ्या मिसळून घ्याव्यात.

झाली तयार सुंद पंजीरी !!