चहाविक्रेता,वेटर ते चप्पलदुकानात सेल्समन म्हणून काम केले, पण शिक्षण सोडलं नाही. आज हा युवक काय करतो पाहा!!

लिस्टिकल
चहाविक्रेता,वेटर ते चप्पलदुकानात सेल्समन म्हणून काम केले, पण शिक्षण सोडलं नाही. आज हा युवक काय करतो पाहा!!

"Follow your Dream and never give up!!" एक ध्येय ठरवले, त्याचा ध्यास घेतला की कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो. आज अशाच एका तरुणाच्या यशाची सत्यकथा सांगत आहोत. या युवकाने खूप कष्टाने शिक्षण पूर्ण केले आणि नुकताच तो शिक्षणक्षेत्रात मोठ्या पदावर रुजू झाला आहे.

केरळच्या पनाराम पंचायतीच्या इकोम येथे राहणाऱ्या रफिक इब्राहिमची ही कहाणी आहे. त्याचे गाव इतके दुर्गम आहे की जगात काय चालले आहे याच्याशी यांचा संबंध नाही. इथली मुलं तर शिक्षण जेमतेम घेतात. कारण घरात आणि शेतात काम करायला त्यांना जावे लागते.

रफिकचेही तेच झाले. त्याचे वडील चहा विकत. डोक्यावर खूप मोठे कर्ज होते. त्यातून कसेबसे पैसे मिळत. पुढे वाढत्या कर्जामुळे रफिकच्या वडिलांना चहाचे दुकान विकावे लागले आणि कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन संपले. रफिकचे शिक्षण सुटायची वेळ आली. त्याने चहा विकला, लोकांची वाहने साफ केली आणि हॉटेल्समध्येही काम केले. पण त्याने कधीही पुस्तकांची संगत सोडली नाही. त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला. दिवसभर काम करायचा पण रात्री पुस्तकं वाचून अभ्यास पूर्ण करायचा. त्याने नेहमी चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहिले.

रफिक शाळेतून फर्स्ट क्लास पास झाला. पण पुढे काही शिकायचे तर पैसे नव्हते. मग त्याने शेतात काहीतरी काम मिळावे म्हणून प्रयत्न केला. रफिकच्या गावातील मित्र शाळा सुटल्यानंतर ड्रायव्हर किंवा क्लिनर होण्याचे काम करतात. पण रफिकला शिकायचे होते. त्यासाठी तो मार्ग शोधत होता. वयाच्या १९ व्या वर्षी एका मित्रासोबत म्हैसूरला गेल्यावर तिथे चहा विक्रेता म्हणून काम करू लागला. तो तेव्हा B.Sc करत होता. चहा विकण्याचे काम करत असतानाच त्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा दिल्या. पण त्याला टायफॉइड झाला आणि त्याला घरी परतावे लागले. नंतर तो मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर येथे राहायला गेला आणि तिथे बसस्थानकातील एका हॉटेलमध्ये काम केले.

फावल्या वेळात रफिक तिथल्या पुस्तकांच्या दुकानात पुस्तके आणि मासिके वाचू लागला. ही पुस्तके वाचताना रफिकला आनंद मिळत असे. थोर लेखकांनी लिहिलेल्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. नंतर हॉटेल बंद पडले आणि रफिक घरी परतला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नवीन काम शोधायला लागले. रफिकने चपलांच्या दुकानात २ वर्षे सेल्समन म्हणूनही काम केले. त्याच्या बहिणीलाही शिकवणीची नोकरी लागली. त्यामुळे घरच्या परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली. यानंतर रफिकने आपले शिक्षण सुरू ठेवले. रफिकने पदवीनंतर एमफिल पूर्ण केले आणि 'लिटररी फॉर्म अँड कल्चरल हिस्ट्री' या विषयात डॉक्टरेट मिळवली.

नुकतेच ६ नोव्हेंबरपासून रफिक मल्याळम विभाग, निलेश्वर कॅम्पस, कुन्नूर विद्यापीठात साहायक प्राध्यापक पदावर रुजू झाला आहे. इतक्या कष्टाने शिकून आज तो आज मानाने जगत आहे. परिस्थितीशी झुंज देत रफिक आणि त्याची बहीण बुशरा यांनी एसएसएलसी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रफिकच्या आईवडिलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही, पण रफिक आपल्या मेहनती आणि आधुनिक विचारांच्या जोरावर प्रतिष्ठेच्या पदावर पोहोचला आहे. संपूर्ण गावाला आज त्याचा अभिमान आहे. पुढेही त्याची खूप स्वप्नं आहेत.

एक चहा विकणारा मुलगा जीवनातील अडचणींशी लढा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आज यशस्वी होतो हे नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

शीतल दरंदळे