नेहमीच मनासारखं किंवा योजल्यासारखं होतं असं नाही. सामान्य माणसासोबत असं झालं तरी ते वाईटच, मग ते बऱ्याच लोकांचा आधार असणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत झालं तर? अशावेळी काहीजण खचून जातात, पण काहीजण त्याचंही सोनं करतात. आजची गोष्ट अशाच कंपन्यांची आहे. आज या कंपन्यांकडे पाह्यलं तर सध्याच्या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्या वेगळ्याच व्यवसायात होत्या हे सांगूनही पटणार नाही. अशा काही कंपन्यांची यादीच तुम्हाला देतो.
१) कोलगेट
टूथपेस्ट न मागता माणूस कोलगेट द्या म्हणतो ही झेप या कंपनीने घेतली आहे. टूथपेस्टच्या मार्केटमध्ये या कंपनीला तोड नाही. ही कंपनी १९०६ साली विल्यम कोलगेट यांनी सुरू केली होती. त्यावेळी साबण आणि अगरबत्ती विकून हे गृहस्थ आपला व्यवसाय करत होते. १८७३ मध्ये यांनी थोडा बदल केला आणि ते टूथपेस्ट विकू लागले. गियर बदलला आणि गाडीने वेग पकडला असे झाले नाही. यांनी थेट रस्ताच बदलला.



