जगभरात काही माणसं बहुतेक वेळा उपहासाची शिकार होतात. त्यापैकीच एक जमात म्हणजे पर्यावरणवादी. आपल्याकडे तर या लोकांचा सहजपणे 'लोकांना शहाणपणा शिकवणारे' म्हणत उद्धार केला जातो. विकासाच्या आड येणारा घटक म्हणजेच पर्यावरण अशी सरधोपट समजूत बहुसंख्य लोकांची असते. पण पर्यावरण हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित नाही. त्याला अनेक पैलू आहेत. आणि आपल्या रोजच्या जगण्याशी ते गुंतागुंतीच्या स्वरूपात बांधलेले आहेत. आपल्या नकळत कितीतरी गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला कारणीभूत ठरत आहेत. ५ जून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यावर एक नजर टाकूया...
कल्पना करा, तुम्ही सुट्टीची मौजमजा करायला एखाद्या शांत, निवांत, माणसांची अजिबात गर्दी नसलेल्या समुद्रकिनारी गेला आहात. सूर्यास्ताची वेळ आहे. किनाऱ्याच्या मऊशार वाळूतून तुम्ही निवांत फिरत आहात आणि अचानक तुमच्या पायाला कशामुळे तरी गुदगुल्या होतात. काय ते पाहण्यासाठी तुम्ही खाली वाकता, तेव्हा खालच्या वाळूत काहीतरी चमकताना दिसतं. हातात घेतल्यावर लक्षात येतं, की ही चकाकणारी गोष्ट म्हणजे गोटी किंवा सुंदरसा शंख नाही, तर तो प्लॅस्टिकचा एक तुकडा आहे.




