आपण बाळाला नेहमी डाव्या बाजूलाच का घेतो ? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण !!

आपण बाळाला नेहमी डाव्या बाजूलाच का घेतो ? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण !!

लहान बाळ दिसलं की पटकन उचलून घ्यायचा मोह होतो ना ? बाळ जर मोठं असेल तर आपण त्याला कडेवर घेतो, पण त्यातून लहान असेल तर त्याला आडवं घ्यावं लागतं. गंमत माहीत आहे का, बाळाला तुम्ही कडेवर घ्या किंवा आडवं दोन्ही हातांवर घ्या.. बाळ नेहमी तुम्ही तुमच्या डाव्या बाजूलाच घेता !!!

आता हे वाचताना तुम्ही पण आठवून पाहात असाल ना ,की कोणत्या बाजूला तुम्ही नेहमी बाळाला घेता ते ! यावर टास्मानियाच्या एका युनिव्हर्सिटीनं रिसर्च पण केलाय.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही उजव्या हातानं सगळी कामं करता की डावखुरे आहात, याचा यावर काही परिणाम होत नाही.. आणि हे फक्त माणूसच नाही, तर इतर सस्तन प्राण्यांनाही लागू पडतं..

स्रोत

सगळेच सस्तन प्राणी असं करतात म्हटल्यावर तुम्हांला आश्चर्य वाटलं असेल ना? संशोधनाअंती असं दिसून आलंय की लहान मुलीही लहान बाळांना डाव्या बाजूला घेतात, पण मुलं आणि पुरुष असं करताना दिसत नाही. पण एकदा का हे पुरुष बाबा झाले, की ते पण मुलांना डाव्या बाजूला घ्यायला सुरुवात करतात. याहीपुढची गंमत म्हणजे, बाळांनाही आईबाबांच्या डाव्या बाजूला असणं जास्त सुरक्षित वाटतं.

जेव्हा मुलं आईबाबांकडे जातात, तेव्हा ती नेहमी उजव्या बाजूनं आईबाबांना खेटतात, म्हणजेच त्यांची काळजी घेणारी माणसं त्यांना डाव्या बाजूला हवी असतात. आता इथं काळजी घेणाऱ्या माणसांत फक्त आईबाबांच येत नाहीत, पण आम्ही एक उदाहरण म्हणून आईबाबांचं नांव घेत आहोत. टास्मानियाच्या संशोधक जनीन इंग्राम आणि त्यांच्या टीमनं जगभर प्रवास केला आणि 11 नंतर सस्तन प्राण्यांचा याकामी अभ्यास केला. मग यात घोडे, रेनडीअर, मेंढ्या, तीन प्रकारचे व्हेल मासे, दोन प्रकारचे कांगारू, वॉलरस, हरीण, बैल या सगळ्या प्राण्यांचा त्यात त्यांनी अभ्यास केला. या सगळ्या प्राण्यांच्या बाळांनी आपली आई डाव्या बाजूला असणं आवडतं हे या अभ्यासात दिसून आलं. पण जेव्हा कधी संकटाची चाहूल लागली, या आयांनी बाळांना आपल्या डाव्या बाजूला घेतलं.
 

या सगळ्याचं कारण काय आहे ??


स्रोत

आपल्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. असं म्हटलं जातं की डावा डोळा मेंदूच्या उजव्या भागाकडे संदेश पाठवतो. मेंदूच्या दोन्ही भागांकडे काही कामं विभागून दिलेली असतात. आपल्या मेंदूच्या उजव्या भागाचं मुख्य काम आहे सामाजिक संदेश समजून घेणं, त्यांची मीमांसा करणं आणि त्यातून भावभावना समजून घेणं. म्हणजेच बाळ रडत असेल तर त्या वेदना समजून घेणं किंवा फक्त चेहऱ्यावरून आता बाळाला भूक लागलीय हे समजून घेणं हे काम मेंदूच्या डाव्या भागाचं आहे. ही माहिती उजव्या डोळ्यापेक्षा डावा डोळा अधिक अचूकपणे आपल्या मेंदूपर्यंत पोचवतो.

आहे ना गंमत? आता पुढच्या वेळेस जेव्हा एखाद्या बाळाला उचलून घ्याल तेव्हा नक्की कुठल्या बाजूस बाळाला यायचंय ते पाहाच..