कमी पाण्यात आणि तेही मातीशिवाय शेती कशी करता येऊ शकते? या भारतीय तरुणांचा शोध काय आहे?

लिस्टिकल
कमी पाण्यात आणि तेही मातीशिवाय शेती कशी करता येऊ शकते? या भारतीय तरुणांचा शोध काय आहे?

भारत एक कृषिप्रधान देश आहे. आजही देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीत गुंतलेली आहे. शेतीत अनेक कारणांनी होणाऱ्या तोट्यामुळे शेतीपासून अनेक शेतकरी दूर जात आहेत. त्याचवेळी नवनवे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीतकमी शेतीत जास्तीतजास्त उत्पन्न काढणारे पण शेतकरी आहेत. 

आता दोन विद्यार्थ्यांनी एक भन्नाट प्रयोग शेतीसाठी केला आहे. त्यासाठी या दोघांचे सगळीकडून कौतुक होत आहे. TERI School of Advanced Studies येथे शिकणारे दोन विद्यार्थी सौर्यदिप बसक आणि लवकेश बालचंदानी यांनी शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्येवर सोपा उपाय शोधून काढला आहे. सौर्यदिप आणि लवकेश यांनी सौर ऊर्जेवर चालणारी हायड्रोपोनिक फॉडर युनिट बनवले आहे, ज्यामुळे अतिशय कमी पाण्यात आणि मातीशिवाय हिरवागार आणि पोषक तत्वांचा चारा उगवता येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांची उगवणूक क्षमता पटीने वाढवता येणार आहे.

या दोन्ही तरुण शास्त्रज्ञांना आपल्या या अभिनव तंत्रज्ञानासाठी Efficiency for access design challenge स्पर्धेच्या फायनलमध्ये कांस्यपदक मिळाले आहे. ही दोन्ही मुले पर्यावरणाबद्दल झपाटलेली आहेत. सौर्यदिपने आपली PwC india मधील नोकरी सोडली, तर लवकेशने रिन्युअबल एनर्जीचा अभ्यास करण्यासाठी मॅकेनिकल इंजिनियरिंग सोडली. या दोघांनी मग फूड वॉटर एनर्जी डोमेनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. इथे काम करत असतानाच त्यांना हायड्रोपोनिक फॉडर युनिट बनविण्याची कल्पना सुचली. 

भारत कृषिप्रधान देश असून देखील देशात ३२ टक्के पशुखाद्याची कमी आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी पाळीव प्राणी जवळ ठेवणे कमी केले आहे. या दोघांनी भारतीय शेतकऱ्यांची हीच समस्या ओळखून हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. पारंपरिक चारा उगविण्याच्या पद्धतीच्या तुलनेत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ९५ टक्के कमी पाणी लागते. याला तयार व्हायला ८ दिवस लागतात. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही मातीची गरज लागत नाही. अवघ्या ०.५ युनिट दर महिना विजेवर हे सर्व करता येते. 

हे तंत्रज्ञान या दोघांनी कसे तयार केले याबद्दल बोलताना ते सांगतात, 'तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हांला ही पद्धत थोडी सुलभ करता आली. तापमानातले बदल नोंदवू शकणारे सेन्सर्स आणि त्याबदलांनुसार आपोआप चालू होणारी लहानसहान यंत्रं यांचं एक जाळंच आम्ही तयार केलं आणि त्याद्वारे हे सगळं प्रकरण स्वयंचलित होऊ शकलं. यासाठी आम्ही पंखे, स्प्रिंकलर्स आणि इवपोरेटिव्ह म्हणजेच संप्लवनशील कूलिंग हे तीन घटक वापरून स्मार्ट कूलिंग सिस्टिम बनवली. पारा एका विशिष्ट तापमानापेक्षा वर गेला की या स्मार्ट कूलिंग सिस्टिममुळे स्प्रिंकलर्स आणि पंखे आपोआप चालू होतात. पण हे इतकंच नव्हतं. भारतात तापमानानुसार  National Building Code पाच वेगवेगळे विभाग पाडले आहेत. या सर्व ठिकाणी वापरता यावं यासाठी सिम्युलेशन आणि पॅसिव्ह सौरऊर्जा वापरून एक स्टँडर्ड डिजाईन बनविण्यात आले आहे.'

हे दोन्ही तरुण शास्त्रज्ञ फक्त ७५०० रुपयांमध्ये ५० किलो चारा उगविता येईल असा दावा करतात. या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा म्हणजे पुढे जाऊन याच्यावर मश्रुम, फुले, भाज्या पिकविता येऊ शकतात. ज्यामुळे शेतीचे उत्पन्न प्रचंड वाढेल. 

या दोघा पठ्ठ्यांनी तयार केलेले हे तंत्रज्ञान दिसत तर भन्नाट आहे, आता याचा योग्य तो वापर करण्यात आला तर देशातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो.