हा फोटो एका दंगलीचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. फोटोत दिसणारा बळी हा कोणत्याही जात, वंश, धर्म, औद्योगिक असंतोष यातून निर्माण झालेल्या दंगलीचा नसून १९८२ साली मुंबईत झालेल्या पोलिसांच्या दंगलीचा आहे. आश्चर्य वाटलं ना ? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या वचनाला जगणारे मुंबईचे पोलीसदल स्वतःच दंगल घडवतील यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे. १९८२ साली मुंबई पोलिसांनी जी दंगल केली होती त्या दंगलीचा हा फोटो आहे.
दंगल का झाली ?
पोलिसांचे आयुष्य अत्यंत तणावपूर्ण असते. एकदा वर्दी अंगावर चढवली की घरी कधी परत येणार या प्रश्नाला उत्तर नसतं. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि पगार अत्यंत तुटपुंजे असतात. १९८२ साली एकूण २२,००० पोलीस मुंबईत तैनात होते. नायगाव आणि वरळी येथील पोलीस वसाहती वगळता बाकीच्या पोलिसांना मिळेल त्या जागेत, अगदी झोपडपट्टीतही आयुष्य काढावे लागायचे. घरभाड्यापोटी मिळणारा भत्ता जेमतेम २५ ते ३० रुपये होता.






