अचानक एखाद्या ठिकाणी जायचंय, पण स्टेशनवर जाऊन, रांगेत थांबून, अनारक्षित किंवा प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याइतका वेळही नाहीये. अशावेळी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही मंडळी. आपल्या भारतीय रेल्वेनं आपल्यासाठी उपयोगी असं UTS (Unreserved Ticketing System) अॅप उपलब्ध करून दिलंय. ज्यामुळे आपण घरबसल्या अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकतो! हे अगदी अॉनलाईन रिझर्वेशन करण्यासारखंच आहे बरं का...
आधी समजून घेऊ अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट म्हणजे काय..
आपण प्रवासाचं खूप दिवस आधी प्लॅनिंग करून अॉनलाईन रिझर्व्हेशन करतो, ते झालं आरक्षित किंवा रिझर्व्हड तिकीट. पण कधी कधी अचानक निघायचं ठरतं. यावेळी तुम्ही जाऊन तिकीट घेता आणि रेल्वेत जाऊन बसता. ते असतं अनारक्षित तिकीट. दोन-चार तासांच्या प्रवासासाठीही कधी कधी लोक आधीच तिकीट काढून ठेवत नाहीत. ज्यांच्या गावी रेल्वे स्टेशन आहे ते तर सहज कधीही उठून रेल्वेने प्रवास करतात. या साऱ्यांच्या मदतीला येतं ते हेच, अनारक्षित किंवा अनरिझर्व्हड तिकीट.
आणि जर आपल्याला प्रवास करायचा नाहीये, पण रेल्वे स्टेशनवर जायचंय, तर आपल्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असायलाच लागतं. नाहीतर सापडलात तर विनातिकीट समजून दंड केला जाईल बरं..
कसं वापराल हे अॅप...
हे अॅप अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनधारकांसाठी गुगल प्ले स्टोअरवर UTS या नावाने मोफत उपलब्ध आहे. त्याचबरोबर विन्डोज फोन्ससाठीही ते उपलब्ध आहे.
अॅप इन्टॉल केल्यानंतर इथे सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. नाव, मोबाईल नंबर, शहराचं नाव, जन्मतारीख, आणि कोणत्याही एका ओळखपत्राची माहीती दिल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल. जे वापरून तुम्हाला या UTS अॅपमध्ये लॉगीन करावं लागेल.

(स्त्रोत)
अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर तुम्हाला इथं तात्काळ बुकींग, सामान्य बुकींग, प्लॅटफॉर्म तिकिट, सिझन तिकिट म्हणजे महिन्याचा किंवा तीन महिन्यांचा पास असे अनेक पर्याय मिळतील. त्याचबरोबर तिकिट कॅन्सलेशन, आणि पूर्वी बुक केलेली तिकिट हिस्ट्री पाहण्याची सुविधाही मिळेल.
अनारक्षीत तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही इथे थेट अॉनलाईन पेमेन्ट करू शकत नाही. यासाठी अॅपमध्येच तुम्हाला ई-वॉलेट मिळेल. या वॉलेटवरच तुम्हाला 100-5000 रूपयापर्यन्त पैसे लोड करायचे आहेत. ते करण्यासाठी तुम्ही स्टेशनच्या बुकींग अॉफीसमध्ये जाऊ शकता किंवा IRCTC च्या वेबसाईट वर जाऊन डेबिट/क्रेडिट कार्डनेही पैसे भरू शकता.
बुकींग करतेवेळी तुम्हाला दोन्ही स्टेशन्स निवडून प्रवास करणार्यांची संख्या, प्रवास श्रेणी इ. माहीती भरून वॉलेटवरून पेमेन्ट करावं लागेल.

(स्त्रोत)
बुकींग केल्यानंतर तुम्हाला तुमचा बुकींग आयडी क्रमांक मिळेल. जो वापरून तुम्ही स्टेशनवर असलेल्या स्वयंचलित व्हेंडिंग मशिनवरून पेपर तिकीटाची प्रिन्ट मिळवू शकता. ही मशिन्स आता जवळपास सर्व स्टेशन्सवर उपलब्ध आहेत. आणि हेही शक्य नसेल तर सोबत तुम्हाला अॅपमध्येच तिकीटाची सॉफ्टकॉपीही मिळेल. जी तुम्ही प्रवासादरम्यान दाखवू शकता. ही सॉफ्टकॉपी अॉफलाईन मोड मध्ये उपलब्ध असेल. ज्यामुळे प्रवासात इंटरनेट नसलं तरी अडचण होणार नाही. तिकीटाची सॉफ्टकॉपी ही अहस्तांतरणीय आहे, म्हणजेच ज्या माणसासाठी हे तिकीट काढलं असेल, फक्त त्याच व्यक्तीला त्यावर प्रवास करता येईल. त्यामुळे हे तिकीट दुसर्या व्यक्तीला फॉरवर्ड करू नका.
तर चला मंडळी, आता इन्टॉल करा UTS अॅप... आणि बुक करा तुमचं पेपरलेस तिकीट!!
