भारतीय शास्त्रीय संगीताला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिले असे अनेक अवलिये होऊन गेले. त्यातले एक पंडित जसराज नुकतेच आपल्यातून गेले. काळ जसजसा पुढे सरकत आहे तसतसा या महान आत्म्यांचा विसर होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याच महान परंपरेतील एक नाव म्हणजे विष्णू दिगंबर पलूस्कर!!!
पलूस्कर यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमधल्या बेळगाव येथे झाला होता. घरातच त्यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील नियमित भजन किर्तन करत असत. त्यांचा संगीत क्षेत्रात कसा प्रवेश झाला यामागे मोठी रंजक गोष्ट आहे.
लहानपणी एकदा डोळ्याजवळ फटाका फुटल्याने त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना मिरजेला जावे लागले. इथेच त्यांनी ग्वाल्हेर घराण्यातले गायक पं. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्या देखरेखीखाली संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. १२ वर्षे संगीताचे रीतसर शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी देशभर प्रवास केला. बडोदा, ग्वाल्हेर असा प्रवास करत ते लाहोरला आले आणि इथेच त्यानी पुढील काम करायचं निर्णय घेतला. तिथे त्यांनी १९०१ साली गंधर्व विद्यालयाची स्थापना केली. पलूस्कर यांनी अनेक दिग्गज घडवले. यात पंडित ओंकारनाथ ठाकुर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित नारायण राव तसेच त्यांचे पुत्र डी. व्ही. पलूस्कर यांचा समावेश होता. पुढे जाऊन त्यांनी मुंबई येथे देखील महाविद्यालय स्थापन केले.
त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम केले. त्यावेळी शास्त्रीय संगीत सार्वजनिक ठिकाणी गायले जाणे म्हणजे एक वेगळा प्रयोग होता. गुजरात मधील सौराष्ट्र येथे त्यांनी पहिला कार्यक्रम केला. नंतर महाराष्ट्रभर त्यांनी कार्यक्रम केले. एकाअर्थाने शास्त्रीय गायनाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात त्यांच्यापासून झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मथुरा येथे येऊन त्यांनी ब्रज भाषा अंगीकृत केली. इथेच त्यांनी धृपद शैलीचे गायनाचे देखील शिक्षण घेतले.
भारतीय संगीतासाठी त्यांनी twirling ची एक प्रणाली विकसित केली. नंतर त्यांनी गंधर्व महाविद्यालयासाठी अनेक पाठ्यपुस्तके प्रकाशित केली. पलूस्कर यांनी भारतीय समाजात संगीत आणि संगीतकाराला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे.
पलूस्कर गांधीजींच्या सभांमध्ये देखील गात असत. गांधीजींच्या रघुपती राघव राजाराम या भजनाला सर्वप्रथम संगीत त्यांनीच दिले होते. कित्येक ग्रथांचे लेखन करून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात अनन्यसाधारण योगदान दिले आहे. आज त्यांची जयंती, बोभाटाकडून त्यांना अभिवादन!!
