इतिहासातील काही व्यक्तिमत्वं अशी आहेत की, त्यांच्याबद्दलचे कुतूहल कधीच शमत नाही. असेच एक व्यक्तित्व म्हणजे इजिप्तची राणी क्लिओपात्रा! आपले सौंदर्य आणि कपटीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या या राणीच्या कित्येक कथा आजही चर्चिलच्या जातात. अगदी शेक्सपिअर पासून बर्नाड शॉपर्यंत कित्येक नाटककार आणि कवीदेखील तिच्या मोहिनीतून मुक्त होऊ शकले नाहीत. अशा या क्लिओपात्राने इजिप्तसह आजूबाजूच्या प्रदेशावर सुमारे तीन दशके राज्य केले. एकहाती सत्ता सांभाळत असताना तिने कधी शत्रूशी लढा देऊन, तर कधी गुप्तरीत्या काटा काढून आपले स्थान अबाधित राखले. क्लिओपात्रा ही मॅकडोनियन वंशातील शेवटची शासनकर्ती होती असे मानले जाते.
क्लिओपात्राचे वडील ती चौदा वर्षांची असतानाच वारले. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या पश्चात हे राज्य त्यांचा मुलगा (सातवा) टॉलेमी आणि क्लिओपात्रा अशा दोघांच्याही हवाले केले होते. पण टॉलेमीचे सल्लागार क्लिओपात्राच्या विरोधात होते. इजिप्तच्या जनतेतही क्लिओपात्राला आपली शासक म्हणून स्वीकारण्याविषयी थोडी सांशकताच होती. तिच्या विरोधात राज्यातील वातावरण तापत आहे असे लक्षात येताच क्लिओपात्रा स्वतःचेच राज्य सोडून परांगदा झाली. स्वतःचे राज्य सोडून ती काही काळ सिरीयामध्ये शरण गेली.
त्याकाळी रोमवर ज्युलियस सीझरची सत्ता होती. क्लिओपात्राने ज्युलियस सीझरला आपल्याला मदत करण्याची विनंती केली. क्लिओपात्राच्या सौंदर्याने घायाळ झालेला सीझर क्लिओपात्रासाठी टॉलेमीशी युद्ध करण्यास तयार झाला. ज्युलियस आणि टॉलेमीच्या युद्धात टॉलेमीचा मृत्यू झाला आणि इजिप्तच्या गादीवर क्लिओपात्रा विराजमान झाली.


