कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लांब पल्ल्याच्या बसेस, ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे की जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर लोकल आणि बेस्टसेवा बंद करण्यात येईल. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून नाट्यगृह, जिम आणि स्विमिंग पूल बंद करण्यात आले आहेत. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे सगळं गर्दी कमी व्हावी आणि लोकांमध्ये अंतर राखलं जावं यासाठी केलं जात आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या COVID-19 आजारावर औषध उपलब्ध नाही. आपल्याला COVID-19 होऊ नये यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. त्याची पहिली सुरुवात होते ती इतरांपासून लांब राहण्यापासून. सध्या या मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आज आपण या संकल्पनेवर सविस्तर माहिती वाचणार आहोत. इथे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.






