प्रत्येक ट्रकच्या मागे 'Horn Ok Please' का लिहिलेलं असतं ? माहित आहे का भाऊ ?

लिस्टिकल
प्रत्येक ट्रकच्या मागे 'Horn Ok Please' का लिहिलेलं असतं ? माहित आहे का भाऊ ?

भारतात ट्रकवर ‘मेरा भारत महान’ लिहिण्याची जुनी परंपरा आहे. अशीच एक परंपरा आहे शायरी लिहिण्याची. त्याही पुढे जात काही लोक  ‘बुरी नजरवाले तेरा मुंह काला’ सारखी
स्लोगन लिहितात. बाकी, ट्रकच्या मागे यातलं काहीही लिहिलेलं नसलं तरी ‘Horn Ok Please’ हे वाक्य नक्कीच असतं. या हॉर्न-ओके-प्लीजचा अर्थ काय हे त्या ट्रक चालकाला देखील माहित नसतं, पण वाक्य लिहिलेलं असलंच पाहिजे.

महाराष्ट्र राज्य सरकारने ट्रकच्या पाठी Horn Ok Please लिहायला बंदी आणली होती कारण त्यांच्या मताप्रमाणे Horn Ok Please लिहिणं म्हणजे हॉर्न वाजवण्यास प्रोत्साहन देणं. ट्रक चालकांना यामुळे हॉर्न वाजवण्याचा पूर्ण हक्कच मिळतो.

मंडळी, यावरून काही प्रश्न पडले: हे वाक्य ट्रकच्या किंवा अन्य काही वाहनांच्या मागे का लिहिलेलं असतं ? हॉर्न वाजवण्याशी याचा थेट संबंध आहे का? या वाक्याच्या मागील अर्थ काय?
राव, उत्तर माहित नसेल तर चला, आम्हीच तुम्हाला सांगतो...

खरं तर हे वाक्य गाडीच्या मागे का लिहितात याचं निश्चित असं कारण माहित नाही पण याबाबत काही थियरी मांडल्या जातात त्या अशा:

थियरी १

थियरी १

असं म्हणतात की Horn Ok Please दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी लिहायला सुरुवात केली. याची गोष्ट अशी  सांगितली जाते की  त्याकाळात डिझेलच्या कमतरतेमुळे ट्रक्समध्ये केरोसीन भरावं लागत असे. केरोसीनने भरलेला ट्रक थोड्याशा अपघाताने पेट घेऊन त्याचा स्फोट होऊ शकत होता. अशावेळी ट्रकच्या मागे “Horn Please, On Kerosene,” लिहिलं जायचं. जेणेकरून मागच्या वाहनाला सुरक्षित अंतर ठेवण्यास इशारा मिळू शकेल.

थियरी २

ही दुसरी थियरी थोडी वास्तववादी वाटते. फोर्ब्सच्या एका अंकात आलेल्या लेखात Kenneth Rapoza  यांनी म्हटलं होतं की भारतीय ड्राईव्हर्स त्यांच्या ‘साईड मिरर’चा क्वचितच वापर करतात. त्यांना जर मागच्या वाहनाला इशारा द्यायचा असेल तर ते सरळ हॉर्न वाजवतात. काहीवेळा तर ट्रक्सना साईड मिरर लावलेलाच नसतो, म्हणून  मागच्या गाड्यांना  ट्रकवाल्याला जर इशारा द्यायचा असेल, तर हॉर्न वाजवणे गरजेचे आहे. म्हणून ट्रकच्या मागेच Horn Ok Please लिहिलेलं असतं.

तसं बघायला गेलं तर इंग्रजी व्याकरणाप्रमाणे Horn Ok Please हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे जर कोणाला हॉर्न वाजवण्यासाठी इशारा द्यायचा झाला तर तो फक्त Horn Please असंही म्हणू शकतो. मग हा ok मध्येच कुठून आला ? याचं उत्तर पुढच्या थियरी मध्ये मिळेल.

थियरी ३

थियरी ३

मंडळी, याला काही लोक मार्केटिंगसाठी केलेला जुगाड म्हणतात. झालं असं की, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळात टाटा ही एकच मोठी कंपनी होती जी ट्रक्स बनवायची. पुढे टाटा कंपनीने इतर उद्योगधंद्यांमध्ये हात पाय पसरवले. यातच टाटा ऑईल मिल्सचा नवा डिटर्जंट लाँच करण्यात आला ज्याचं नाव होतं ‘ओके’. असं म्हटलं जातं की या डिटर्जंटच्या जाहिरातीसाठीच टाटा कंपनीने ट्रक्सवर ओके लिहायला सुरुवात केली. पुढे जाऊन हा डिटर्जंट इतिहास जमा झाला पण लोकांनी ‘ओके’ला त्याचं जागी राहू दिलं.

थियरी ४

ही थियरी हॉर्न-ओके-प्लीज या तिन्ही शब्दांना एकत्र बांधते.

हॉर्न हा शब्द पहिल्यांदा येतो, आणि तो लिहिला जातो उजव्या बाजूला. म्हणजेच, जर मागचं वाहन उजव्या बाजूने पुढे जायचा प्रयत्न करत असेल, तर त्याने हॉर्न द्यायचा. ओके मध्ये लिहिलेलं असतं, म्हणजेच मागचं वाहन बरोबर पाठीमागे असेल, तरच ते नीट दिसेल. याचा अर्थ असा मानला जातो की तुम्ही मागे असाल तर ते ओके आहे. प्लीज असतं एकदम डाव्या बाजूला. म्हणजे जर मागच्या वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याइतपत जागा असेल, तर  त्याने अवश्य ओव्हरटेक करावं. प्लीज जा असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो.

 

मंडळी कारणं अनेक आहेत, शक्यता अनेक आहेत. हा Horn-Ok-Please कुठूनही आला असला तरी तो आता आपल्या भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे एवढं मात्र नक्की.

 

आणखी वाचा :

भारतातली सर्वाधिक शिकलेली ट्रक ड्रायव्हर नंदुरबारची योगिता

ट्रकच्या मागे लिहिलेले १५ अतरंगी स्लोगन !!