रद्दीसाठी जमा केलेले पेपर, काही काळाने पिवळे पडतात. फक्त वृत्तपत्र नाही जुन्या पुस्तकांचा रंगही पिवळा पडतो. मंडळी कागद पांढरा असला तरी पुढे जाऊन त्याचा रंग का बदलतो ? तुम्हाला माहित आहे का ? माहित नसेल तर चला समजून घेऊया.

मंडळी, आधी कागदाची संरचना कशी असते ते समजून घेऊया. कागद हा दोन घटकांनी तयार होतो. एक असतो सेल्युलोज आणि दुसरा म्हणजे लिग्नीन. हे दोन घटक खरं तर लाकडांमध्ये असतात. याच लाकडांपासून कागद तयार केला जातो, त्यामुळे कागदातही हे घटक असतात.
यातील सेल्युलोजला मुळात रंग नसतोच. तो काळाच्या ओघात फारसा बदलतही नाही. या सेल्युलोजला बांधून ठेवण्याचं काम लिग्नीन करतं. जिथे सेल्युलोजच्या रंगत बदल होत नसतो तिथेच लिग्नीनचा रंग मात्र बदलतो. या रंग बदलण्यामागचं कारण म्हणजे हवेतील ऑक्सिजनच्या संयोगातून लिग्नीनच्या मुळच्या संरचनेत झालेला बदल. ऑक्सिजन आणि त्याच बरोबर सूर्यप्रकाश या दोन गोष्टींमुळे लिग्नीनच्या संरचनेत बदल होऊन त्याचा रंग पिवळसर होतो.

यास भरीस भर म्हणजे आपल्या सतत हाताळण्याने आणि दमट हवामानामुळे पुस्तके पिवळसर होण्यात अधिक मदत होते. त्यामुळे पुस्तके किंवा कोणतेही कागद दमट हवामानात ठेऊ नका आणि त्यांना वारंवार हात लावणं टाळा.
