एव्हरेस्ट सर करताना मृत्यू आल्यास मृतदेह खाली का आणले जात नाहीत?

लिस्टिकल
एव्हरेस्ट सर करताना मृत्यू आल्यास मृतदेह खाली का आणले जात नाहीत?

एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याची अनेकांची इच्छा असते. खरे तर हिला इच्छा म्हणावे की महत्वाकांक्षा असाही प्रश्न आहेच. तर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच हे जमते असे नाही. काही लोक या बर्फातच कायमचे गाडले जातात. ‘ग्रीन बूट’ प्रमाणेच काही लोकांना यशस्वी होऊनही यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही. एव्हरेस्ट हा आता पूर्वी इतका कौतुकाचा विषय राहिलेला नाही. कारण आतापर्यंत सुमारे ४००० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी ७००० पेक्षा जास्त वेळा हे शिखर सर केले आहे. त्यामुळे एव्हरेस्ट सर करणे ही काही नवी महत्वाकांक्षा आहे किंवा नवे आव्हान आहे असे अजिबात नाही.

मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेला हा प्रदेशही आता बऱ्यापैकी प्रदूषित झाला आहे. लोकांनी टाकून दिलेला कचरा, अनावश्यक वस्तू तर आहेतच, पण या पर्वतावर सुमारे २०० हून अधिक मानवी मृतदेह सुद्धा तसेच पडून आहेत. इतक्या प्रमाणात तिथे मृतदेह पडून आहेत तर ते तिथून हटवण्याचे प्रयत्न का केला जात नाही? कारण मृतदेहांना असे बेवारस टाकून कुणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. हे खरे असले तरी एव्हरेस्टवर ज्यांना मृत्यू येतो त्यांच्या बाबतीत मात्र हे एक दुर्दैवी आणि क्रूर सत्य आहे. यामागची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया या लेखातून.

सध्यातरी एव्हरेस्टवर असे किती मृतदेह पडून आहेत यांचा नेमका आणि अचूक आकडा कुणाला सांगता येणार नसला तरी किमान २०० हून तरी अधिक मृतदेह तिथे असावेत असा अंदाज आहे. गिर्यारोहक आणि त्यांना मार्ग दाखवणारे शेरपा असेच बर्फाखाली, हिमनद्यामध्ये किंवा हिमवृष्टीमध्ये बुजून गेले आहेत. कधी कधी त्यांच्या मृत शरीरावरील बर्फ थोडासा इकडे तिकडे सरकतो आणि त्यांचा एखादा अवयव तेवढा दृष्टीस पडतो. अनेक जण तर अगदी गाढ विश्रांती घेत असल्यासारखे दिसतात. अनेकांचे मृतदेह म्हणजे वाटेवरील मैलाचे दगडच बनले आहेत. जणू ते सांगताहेत तुमचे यश आता इथून फक्त काही अंतर दूर आहे.

या सगळ्यात प्रसिद्ध मृतदेह आहे तो म्हणजे इंडो-तिबेटी पोलीस दालातील जवान शेवांग पल्जोर याचा. १९९६ साली त्यांची अर्धी टीमच बर्फाच्या वादळात गडप झाली होती. त्याच्या पायात नियॉन कंपनीचे हिरव्या रंगाचे बूट आहेत त्यावरून या मृतदेहाचे टोपण नाव ग्रीन बूट्स असे पडले आहे. 

ग्रीन बूट्स- माऊंट एव्हरेस्टवरच्या सर्वात प्रसिद्ध प्रेताची शोकांतिका!! ते तब्बल २० वर्षे तिथेच पडून होते!!

 एव्हरेस्टच्या भुरळ पडणाऱ्या सौंदर्यामागचे हे एक क्रूर सत्य बनले आहे. एव्हरेस्टच्या उत्तर बाजूला गेली वीस वर्षे शेवांग पल्जोरचा मृतदेह आहे त्या स्थितीत पडून आहे. त्याच्या नंतर एव्हरेस्ट सर करू पाहणाऱ्या अनेकांना तो मृतदेह त्याठिकाणी दिसतो, तिथे बसून काही लोकं विश्रांती देखील घेतात. कारण हा मृतदेह शिखरापासून अगदी काही अंतरावर आहे. हा मृतदेह दिसला म्हणजे आपण शिखराच्या जवळ आलेलो आहोत, असा अर्थ होतो.
गिर्यारोहकांसाठी हा मैलाचा दगड असला तरी, त्याच्या कुटुंबियांना ही एक क्रूर थट्टा वाटत नसेल का? आपल्या मुलाच्या मृतदेहाला ग्रीन बूट्ससारख्या टोपण नावाने ओळखले जाते, हे सत्य त्यांना कितपत रुचेल. शेवांगच्या कुटुंबीयात त्याचा छोटा भाऊ सोडल्यास कोणीही फार शिकलेले नाही त्यामुळे इंटरनेटवर आपल्या मुलाच्या मृतदेहाचे फोटो ग्रीन बूट्स म्हणून ओळखले जातात हे सत्य त्यांच्यापासून अजून तरी लपलेलेच आहे, तेच बरे आहे.

ज्या ठिकाणी शेवांगचा हा मृतदेह पडून आहे ते ठिकाण आता ग्रीन बूट्स केव म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी सुमारे दहा वर्षानंतर म्हणजे २००६ साली, डेव्हिड शार्प या ब्रिटीश गिर्यारोहकाचाही मृत्यू झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिवशी डेव्हिड तिथे अडकून पडला होता त्यादिवशी सुमारे ४० गिर्यारोहक त्याच मार्गाने एव्हरेस्टकडे जात होते. त्यांना डेव्हिड दिसला होता, पण त्यांनी मदत करण्याऐवजी आपले मिशन पूर्ण करणे जास्त महत्वाचे समजले. एका वर्षानंतर शार्पच्या आई वडिलांच्या विनंतीला मान देऊन एका वर्षानंतर शार्पचा मृतदेह तिथून हलवण्यात आला. पण पल्जोरच्या बाबतीत अजूनही हे घडलेले नाही. खरे तर पल्जोरसोबत त्या दिवशी इंडो-तिबेट पोलीस दलाची मोठी टीम होती, त्यांनी प्रयत्न केले असते तर ज्या दिवशी पल्जोरच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली त्याच दिवशी त्याचा मृतदेह हलवणे सोपे गेले असते. पण आता तर खूपच उशीर झाला आहे.

मृतदेह तिथून काढता येणार की नाही? या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. तर यातील पहिली बाजू आहे ती म्हणजे स्वतः गिर्यारोहक आणि त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत काही तरतूद केली आहे का? एव्हरेस्टवर चढाई करताना मृत्यू येण्याची शक्यता तर स्पष्टच आहे अशावेळी गिर्यारोहकांनी आपला रीपार्टेशन इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे. या गिर्यारोहकांनी हा इन्शुरन्स काढला असेल तर तुमचा मृत्यू कुठेही झाला असला तरी तुमचा देह तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवला जातो. दुसरी बाब म्हणजे मृत्यूचे ठिकाण. अति उंच ठिकाणचा मृतदेह काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आणखी चार लोकांचा जीव धोक्यात घालणे. शिवाय यासाठी सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंडही इतका मोठा आहे की तो प्रयत्नच न केलेला परवडेल.

एव्हरेस्टची उंची आहे ८८४८ मीटर आणि शेवांगचा देह ८५०० मीटर उंचीवर. शेवांगच नाही, तर १९९८ साली एका अमेरिकन महिलेनेही एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. तिला एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनण्याची महत्वाकांक्षा होती. एव्हरेस्टवर पोहोचण्यात तर तिला यश मिळाले, पण परतत असताना कुठे काय चुकले माहित नाही आणि तिला आपला जीव गमवावा लागला. फ्रान्सि डिस्टेफॅनो-आर्सेंटिव्ह नावाच्या या महिलेचा मृतदेहही ‘स्लीपिंग ब्युटी’ म्हणून ओळखला जात होता. तिच्या मुलाने जेव्हा या नावाने आपल्या आईच्या मृतदेहाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेले पहिले तेव्हा त्याला काय यातना झाल्या असतील याची कल्पनाही करवणार नाही. १९९८ साली फ्रान्सिचा एव्हरेस्टवर मृत्यू झाला होता आणि २००७ मध्ये वूडॉल नावाच्या एका गिर्यारोहकाने तिचा मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. ८८०० फुटावर असताना फ्रान्सि अचानकपणे बर्फाच्या गाळात रुतली गेली. त्यावेळी वूडॉल आणि त्याचा आणखी एक साथीदार यांनी मिळून फ्रान्सिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी ही मदत स्वत:च्याच जीवावर बेतते आहे असे दिसल्यावर त्यांनी बेशुद्ध अवस्थेतील फ्रान्सिला तिथेच आणि त्याच अवस्थेत सोडणे शहाणपणाचे समजले. अर्थात याची बोच लागून राहिल्यानेच त्याने २००७ साली तिला तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याला ७०,००० डॉलर हून जास्त खर्च आला. शिवाय इतक्या उंचावर जाऊन स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालण्याची जोखीम घ्यावी लागली ती वेगळीच. २००७ मध्ये जेव्हा वूडॉल तिथे गेला तेव्हा फ्रान्सिच्या मृतदेहाभोवती चार फुट उंचीचा बर्फ साचला होता. शिवाय तिथली घसरणही तीव्र होती. सुदैवाने त्यांना या प्रयत्नात यश आले. फ्रान्सिचा मृतदेह हटवल्यानंतर शेवांगचा भाऊ थिनलेने त्याला शेवांगचा मृतदेह आणण्याचीही विनंती केली होती. पण आधीच फ्रान्सिचा मृतदेह काढताना वूडॉलला जो खर्च आणि त्रास सहन करावा लागला होता तो पाहता पुन्हा एकदा तीच जोखीम घेण्यात शहाणपण नसल्याचे त्याच्या लक्षात आले होते. तसेही त्याला मिळालेला सगळा निधी एकट्या फ्रान्सिचा मृतदेह काढण्यातच खर्च झाला होता. त्यामुळे त्याच्याकडे पैशाचीही वाणवा होतीच. त्यामुळे वूडॉलने याबाबत आपले हात वर केले.

बर्फाळ ठिकाणी जिथे उतार तीव्र असतो आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते तिथून बर्फ खोडून हे मृतदेह बाहेर काढणे किती जिकीरीचे असू शकते याची कल्पनाही करता येणार नाही. एकदोघांकडून तर हे काम होणे अजिबातच शक्य नाही. यासाठी मोठी टीम असणे आवश्यक आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे त्या टीम मधीलच कुणाचा मृत्यू हाल तर? अशीही यात जोखीम आहे.

शेवांगच्या मृतदेहाबाबत आणखीन एक गोंधळ म्हणजे तो मृतदेह नेमका त्याचाच आहे का याबाबतही कोणी खात्री देत नाही. कोण म्हणते तो एका नेपाळी गिर्यारोहकाचा मृतदेह आहे, कोण म्हणते परदेशी गिर्यारोहकाचा आहे. तर कोणी म्हणते तो भारतीयच आहे, पण तो शेवांग नसून दुसराच कोणी आहे.

अशातच आता नोएल हान नावाच्या एका गिर्यारोहकाच्या मते मे २०१४ पासून ग्रीन बूट केव्हच्या ठिकाणी आता तो मृतदेह दिसत नसल्याचे म्हटले आहे. फक्त ग्रीन बूटच नाही, तर त्या मार्गाने जाताना आधी दहा-बारा मृतदेह पडलेले दिसायचे ज्यावरून त्या नाठिकाणाला ‘रेनबो रिज’ असे नाव पडले होते. पण त्याठिकाणी आता फक्त दोन ते तीन मृतदेह दिसत आहेत. एक तर या सगळ्या मृतदेहावर बर्फ साचलेला असू शकतो किंवा कुणी तरी त्यांना हटवले असावे.

हानच्या मते चायनीज तिबेटन माउंटेनिअरिंग असोसिएशन किंवा चायनीज माउंटेनिअरिंग असोसिएशन या दोन्ही पैकी एकाने कुणीतरी हे मृतदेह हलवण्याचे काम केले असावे. पण याबाबत या संस्थांनी अजूनपर्यंत कुठलाच खुलासा केलेला नाही. पण ज्यांनी कुणी हे काम केले त्यांनी त्या मृत लोकांच्या नातेवाईकांनाही याबद्दल कसलीच कल्पना दिलेली नाही.

अर्थात, असे अजूनही मृतदेह तिथेच पडून आहेत. त्यांना हलवण्यासाठी मोठ्या योजनेची आणि हिमतीची गरज आहे. माउंट एव्हरेस्टवरील हे वाढते मृतदेह, कचरा, गिर्यारोहकांनी फेकून दिलेल्या निरुपयोगी वस्तू यांचा साठा वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर खरोखरच एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या या मोहिमा आखणे इतके महत्वाचे आहे का, हा प्रश्न उभा राहतो.

तुम्हाला याबाबत काय वाटते?

मेघश्री श्रेष्ठी.