देशाची सर्वांगीण प्रगती अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे त्या देशातल्या सोयीसुविधा किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत! आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणाच्या सुविधा नाहीत. देशात असूनही अशी 'बेटे' त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पूलांचे मोठे योगदान आहे. या पूलांनी गावे एकमेकांना 'जोडण्याचे' महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसायला मदत केली आहे.
शकुंतला भगत यांचे नाव आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर. भारतातल्या ६९ आणि जगभरातल्या २०० पुलांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला भगत.





