आपल्या भारतीय समाजात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत काही गोष्टी जराही बदलत नाहीत. बाईचं अंतर्वस्त्र बाहेर दिसलेलं खटकणं ही त्यातलीच एक!! मग ते अंतर्वस्त्र लहान मुलीचा बाहेर दिसणारा पेटिकोट असो किंवा वयात आलेल्या तरूणीची ब्रा. अगदी अनोळखी स्त्रियाही खुणावून, पुरुष नजर वळवून काहीतरी बिघडलंय हे लगेच जाणवून देतात. २००५साली ओ' हेन्रीच्या गिफ्ट ऑफ मॅगी कथेवर आधारित "रेनकोट" हा सर्वांगसुंदर सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं परिक्षण लिहिताना बहुतेकांनी ऐश्वर्या रायच्या पोलक्याच्या बाहेर डोकावणाऱ्या ब्राच्या पट्टयांवर काही ना काही मत नोंदवलेच होते. थोडक्यात काय, लो वेस्ट जीन्स घालणाऱ्या मुलांची किंवा हिरोंची अर्ध्याहून अधिक बाहेर दिसलेली अंडरवेअर चालते, पण बाईच्या अंतर्वस्त्राचे पट्टे बाहेर दिसणे ही वार्डरोब मालफंक्शन म्हणूनच गणले जाते.
या महिला उद्योजिकेने तयार केलेल्या मण्यांचे पट्टे असलेल्या ‘ब्रा’ ठरताहेत ‘स्टार्ट अप’ गेम चेंजर!


म्हणजे पाहा, कल्पना करा, एखादी तरुणी पार्टीसाठी अगदी छान सजूनधजून तयार झालीये. अंगासरशी बसणार्या परफेक्ट मापाच्या ड्रेसने तिचं सौंदर्य अजूनच खुलवलंय. पार्टी हॉलमध्ये ती प्रवेश करते, त्यासरशी लोकांच्या नजरा तिच्याकडे वळतात. त्या कौतुकभरल्या कटाक्षांनी तिच्या गालावर अजूनच लाली पसरते. तेवढ्यात खांद्यावरच्या पर्समुळे की काय, तिच्या ड्रेसची बाही किंचित खाली सरकते आणि जणू बाहेर येण्यासाठी आसुसल्यासारखा ‘तो’ डोकावतो. मग एखादी सखी घाईघाईने पुढे येते आणि त्याला खुबीने बाहीच्या आत सारते. किमान ६०% स्त्रियांनी हा अनुभव कधी ना कधी घेतलेला असतो. हा ‘तो’ म्हणजे ‘ब्रा’चा पट्टा. नको तिथे, नको तेव्हा येणारा. अनाहूत आणि नको असलेल्या पाहुण्यासारखा!

शरीर बांधेसूद दिसावे या हेतूने स्त्रिया ब्रा वापरतात. पण हा कलाकार पडद्यामागचा. शरीराला आवश्यक तो बांधेसूदपणा बहाल करताना तो समोर कधीच येत नाही. किंबहुना त्याला दडवलंच जातं. ब्रा चे पट्टे लपवणं आणि इतरांच्या नजरा त्याकडे जाऊ नये म्हणून जपणं याकडेच महिलांचा कल असतो. ब्रा चे पट्टे दिसणं हे आपल्याकडे अगदी निषिद्ध नाही तरी लाजिरवाणं नक्कीच मानलं गेलं आहे. आणि तरीही इतकी काळजी घेऊन तो बाहेर दिसलाच, तर लगेच कुणी काकू लगबगीने त्याला आत लपवायला सांगतातच. सगळ्यांच्या समोर सांगायचं असेल तर काही कोडवर्डही आहेत. "संडे इज लॉंगर दॅन मंडे", "बाई पार्लमेंटमध्ये आल्या" वगैरे वगैरे.. बरं, हा ब्रा चा पट्टा असतोही कसा? तर प्लॅस्टिकचा किंवा इलॅस्टिकचा. अंतर्वस्त्राचा भाग असल्यामुळे त्याच्याकडे आकर्षकता अशी नाहीच.
मात्र स्नेहा प्रबीन या तरुणीने ‘युवांता बीड वर्क्स’ च्या माध्यमातून ‘ब्रा’च्या पट्ट्याला थोडं वेगळं स्वरूप दिलं आहे. त्यामुळं होतं काय, तो बाहेर दिसला तरी काळजीचं कारण नाही. उलट त्याचं बाहेर दिसणं हे कदाचित सौंदर्यात भरच घालतं. ब्रा चा पट्टा बाहेर दिसणं सुंदर कसं असू शकतं? कारण या स्नेहाने हे पट्टे सुंदर मण्यांपासून तयार केले आहेत. तिच्या ह्या निर्मितीचं महिला वर्गाकडून स्वागत होत आहे.

केरळमधील कालिकत या मूळ गावी स्नेहा यांनी ‘युवांता बीड वर्क्स’ ची सुरुवात जुलै २०१४ मध्ये केली. खरं तर शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीपासूनच ‘युवांता बीड वर्क्स’ सुरू करण्याबाबतचा विचार स्नेहाच्या मनात रुंजी घालत होता. मण्यांचं काम हा तिचा छंद होता आणि त्यातूनच या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातील तिने घरातल्या घरात स्वतःसाठी मण्यांचे दागिने बनवायला सुरुवात केली. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्नेहाने १२ वी नंतर मिळालेल्या शिष्यवृत्तीतले १०,००० रुपये गुंतवून स्वतःच्या ब्रॅण्डची औपचारिकरित्या घोषणा केली. त्यानंतर तिने संपूर्ण दक्षिण भारतात निरनिराळ्या ठिकाणी भरवल्या जाणार्या महोत्सवात व प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. तिथे तिने आपला स्टॉल उभारून स्वतःच्या ब्रँडचे दागिने व इतर अॅक्सेसरीज विक्रीसाठी ठेवायला सुरुवात केली. एक नवी सुरुवात तर झाली, पण त्यात नाविन्यपूर्ण किंवा आव्हानात्मक असं काहीच नव्हतं. मण्यांचे दागिने हे तर त्यांच्यासाठी रुटीन प्रॉडक्ट होतं. त्यांना नवीन, क्रांतिकारी असं काहीतरी करायचं होतं. त्याचवेळी त्यांच्या मनात कल्पना आली, मण्यांच्या साहाय्याने तयार केलेले ब्राचे पट्टे.

मनात कल्पना येताच त्या कामाला लागल्या. सुरुवातीचं काम ट्रायल अँड एरर स्वरूपाचं होतं. पहिला नमुना तयार झाल्यावर त्यांनी तो त्यांच्या काही हितचिंतक मैत्रिणींकडे पाठवून त्यासंदर्भात प्रतिक्रिया मागवल्या. त्याचवेळी फक्त त्यावरच विसंबून न राहता स्वतः बाजारपेठेचा अंदाज घेतला. बंगळुरूमध्ये वर्षातून ५ वेळा भरणार्या विख्यात संडे सोल स्नेटच्या मार्फत त्यांना योग्य ती संधी लाभली. डिसेंबर २०१४ मध्ये स्नेहा यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत मण्यांचा पट्टा असलेल्या ब्रा विक्रीसाठी मांडल्या. त्यांना ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद लाभला आणि पहिल्याच दिवशी बराचसा माल विकला गेला. मग त्यांनी मण्यांच्या पट्ट्याच्या अंतर्वस्त्राचे व्यावसायिक एकस्व अधिकार खरेदी केले. हा उद्योग फक्त ह्यापुरताच मर्यादित न राहता मण्यांचे नेकलेस, कर्णफुलं, मनगटावर खुलून दिसणारी ब्रेसलेट्स, पावलांना नजाकत देणार्या तोरड्या, इतकंच नाही, तर पुस्तकात ठेवण्याच्या खुणा(बुकमार्क्स) अशा अनेक गोष्टींचं उत्पादनही ह्यात केलं जातं. मात्र मण्यांच्या पट्ट्या असलेल्या ब्रा हे त्यांचं सिग्नेचर प्रॉडक्ट आहे.
२०१८ मध्ये अवघ्या दीड महिन्यात ११,००० मण्यांच्या पट्ट्यांचं उत्पादन, इ-कॉमर्सच्या माध्यमातून दिवसाला जवळपास ६० ऑर्डर्सची पूर्तता, आणि ६ वर्षांत २५ लाखांचा टर्नओव्हरचा टप्पा हे ‘युवांता बीडवर्क्स’च्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे. मात्र हा प्रवासही तसा खाचखळग्यांतूनच झाला आहे.

आव्हानं स्वीकारण्यात मजा असली तरी त्यातून तावूनसुलाखून निघताना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कसोटी लागते. जगावेगळं उत्पादन करून लोकांसमोर आणणं, लोकांना त्याची उपयुक्तता पटवणं आणि खरेदीसाठी त्यांना उद्युक्त करणं उद्योजकाचा कस पाहणारं असतं. जोडीला सुरुवातीला त्यांना त्यांच्या नवखेपणाचा फायदा घेणार्या अनेक लोकांशी व्यवहार करावा लागला. प्रारंभीच्या विक्रेत्यांपैकी एकाने पैशांबाबत त्यांना गंडा घातला. व्यावसायिक एकस्व मिळवण्यासाठी ज्या एजन्सीकडे त्यांनी काम दिले होते तिथेही हाच प्रकार! कच्च्या मालाचा पुरवठा करणार्या लोकांनी अवाजवी दरपत्रकं देऊन लुटण्याचा प्रयत्न केला तो वेगळाच. आणि आता महामारीचं आव्हान. पण स्नेहा यांनी न डगमगता आपलं काम नेटाने चालू ठेवलं. गुरु(नवीन) सिनेमात अभिषेक बच्चनच्या तोंडी डायलॉग आहे - “ अरे, इतना डरेंगे तो बिज़नेस कैसे करेंगे?” त्यांचीही अशीच फिलॉसॉफी असणार.

बाकी सगळी उत्पादनं आर्थिकदृष्ट्या हातभार लावत असली तरी हे मण्यांचे पट्टे स्नेहा यांच्यासाठी खास आहेत. मण्यांपासून बनवलेले ब्राचे पट्टे हे केवळ एक उत्पादन नाही; ग्राहक त्याच्याशी भावनिक पातळीवरही जोडले गेले आहेत. "हो, दिसतेय माझी ब्रा. घातलीय म्हणून दिसतेय.", असं म्हणून अशावेळी बिनधास्त उत्तरं देणाऱ्या मुलींची संख्या सध्यातरी लाक्षणिकरित्या कमी आहे. जेव्हा ती वाढेल तेव्हा वाढेल. तोवर तरी अशा ओशाळवाण्या प्रसंगातून सुटका म्हणून किंवा साईझच्या अडचणीमुळे स्ट्रॅपलेस ब्रा वापरु न शकणाऱ्या मुलींचा-स्त्रियांचा प्रश्न तूर्तास सुटला आहे असं म्हणायला हरकत नाही.
लेखिका : स्मिता जोगळेकर