अधून मधून आपण एक वाक्य नेहमी ऐकत असतो मंडळी ते म्हणजे ‘तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळेच होईल’. काही जण तर अगदी ठासून सांगतात. सध्याची परिस्थिती बघता ते खरेही वाटते. दुष्काळ, हवामान, पर्यावरण ऱ्हास अशी गोंडस करणं देऊन चर्चा झडतात, पण या सर्वांना आपणच कारणीभूत आहोत हे मात्र आपण विसरतो.
मंडळी हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा की पाण्याची समस्या वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून 'पाणी फाउंडेशन' सारख्या संस्था कामही करत आहेत. पण व्यक्तिगत स्वरुपात आपणही यावर मात करू शकतो हे एका स्त्रीने दाखवून दिलंय.
उत्तर कन्नडमधल्या सिरसी गावातल्या ‘गौरी नायक’ या महिलेने अवघ्या ३ महिन्यात तब्बल ६० फूट खोल विहीर खणली आहे मंडळी. शेवटच्या दिवसात फक्त तीन महिलांना त्यांनी मदतीला घेतले. बाकी पूर्ण विहीर त्यांनी एकटीने खोदली आहे.
झालं असं की, गौरी यांच्या नारळाच्या आणि पोफळीच्या झाडांना पाणी हवे म्हणून त्यांनी विहीर खोदायचं ठरवली. पण पैसे नसल्याने ते शक्य नव्हते. शेवटी त्यांनी स्वतःहून विहीर खोदायचं काम हाती घेतलं आणि बघता बघता ३ महिन्यात विहीर खोदून पूर्णही झाली. अंगदुखीची तक्रार असूनसुद्धा त्यांचं काम काही थांबलं नाही.
गौरी यांच्या रोजच्या ५ ते ६ तास मेहनतीने आज त्यांच्यासाठी आणि गावकऱ्यांसाठी पाण्याचा भक्कम स्रोत उपलब्ध झाला आहे. कौतुकाची बाब म्हणजे या कामगिरीला अनुसरून त्यांना एक योग्य नावही देण्यात आले. ते म्हणजे ‘लेडी भगीरथ’ ! आहे ना योग्य नाव ?

वेठबिगारी करणाऱ्या एक सामान्य महिलेने समाजापुढे ठेवलेला हा एक मोठा आदर्श आहे असंच म्हणावं लागेल. अश्या या लेडी भगीरथला बोभाटाचं साष्टांग दंडवत !!!

