जगातलं सर्वात घाणेरडं हॉटेल आमचंच आहे असा दावा करणारा हॉटेल मालक पाहिलाय कधी? नाही ना? पण हॅन्स ब्रिनकेर या मालकाला मात्र त्याचं हॉटेल घाणेरडं आहे याचा अभिमान वाटतो. एवढंच नाही...तर हि त्यांची जाहिरात करायची स्टाईल आहे म्हणा की !
आहे कि नाही एकदम प्रामाणिक जाहिरात!
अहो या कलियुगात एवढ्या प्रामाणिक जाहिराती मिळतात कुठं हल्ली? अगदी हुशार अशा ह्या हॉटेल मालकानं मात्र आपल्या स्वस्त हॉटेलची "जगातलं सर्वात घाणेरडं हॉटेल" अशी जाहिरात केलीये!! ऍमस्टरडॅम इथलं हे सर्वात स्वस्त असं हॉटेल आहे. हॅन्स ब्रिकनेरनी "जगातलं सर्वात घाणेरडं हॉटेल" असं पुस्तकही लिहिलंय. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना त्यात हॉटेलातल्या परिस्थितीबद्दल ताकीदही दिलीय!
ते खोटी जाहिरात देत नाहीयेत .मळकट बेडशीट, फसलेली कुलुपं, शेवाळी स्नानगृहं अशा गोष्टींमुळे त्या जाहिरातींना न्याय मिळतो. असं सगळं असूनही हे हॉटेल कधी रिकामं नसतं. ह्याच्या जाहिराती फारच विनोदी वाटतात आणि प्रवाशांचं लक्ष वेधून घेतात. 'आता असेल प्रत्येक खोलीत बेड ' किंवा ' आता असतील खोलीत खिडक्यासुद्धा ' अशा विनोदी पद्धतीने ते जाहिरात करतात.
गंमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलच्या वेबसाईटवर त्यांनी चक्क लीगल नोटीस दिलीये . 'तुमच्या तब्येतीची खात्री आम्ही घेऊ शकत नाही, स्वतःच्या रिस्कवर या हॉटेलात यावं' असं ते वेबसाईटवर बजावतात. या हॉटेलचे जास्त गिऱ्हाईक हे विद्यार्थी असतात. कमी पैशांत हे विचित्र हॉटेल त्यांच्या खिशाला परवडण्यासारखं असतं. ही जागा विशीतल्या तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट आहे असंच इथं राहिलेल्या एका विद्यार्थ्याचं मत आहे. जाहिरात बघून एक वेगळा अनुभव म्हणून या हॉटेलला भेट देण्यात येते.
अहो मग वाट कसली बघताय, एकदाचं जाऊन या कि ह्या हॉटेलात....हो पण तुमच्या स्वतःच्या रिस्कवर बरं का!
लेखिका : संयुक्ता पेनुरकर


