भारतात शेवटचा श्वास घेतलेल्या आयरिश ॲनी बेझंटनी होमरुल लीगपलिकडे भारतासाठी काय काय केलंय हे तुम्ही वाचायलाच हवं!!

लिस्टिकल
भारतात शेवटचा श्वास घेतलेल्या आयरिश ॲनी बेझंटनी होमरुल लीगपलिकडे भारतासाठी काय काय केलंय हे तुम्ही वाचायलाच हवं!!

परदेशातून भारतात येऊन भारताला लुटणाऱ्या अनेक युद्धपिपासू राजांची आणि सत्ताधीशांची तुम्हाला माहिती असेलच, पण बाहेरून येऊन भारताला आपली कर्मभूमी बनवणाऱ्या आणि भारतीयांच्या राजकीय स्वातंत्र्यासोबत त्याच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या ॲनी बेझंट या आयरिश महिलेबाबत मात्र फार कमी लोकांना माहिती असेल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या ॲनी बेझंट या एक पुरोगामी स्त्री कार्यकर्त्या होत्या. नंतर मात्र त्यांना ईश्वराचा शोध घेण्याऱ्या भारतीय तत्वज्ञानाची गोडी लागली आणि त्या मानाने संपूर्ण भारतीय बनल्या.

"मी जन्माने आयरिश असले तरी मनाने भारतीय आहे", अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या ॲनी बेझंट. ज्यांनी भारतीयांना स्वशासनाचा अधिकार मिळवा म्हणून होमरूल लीगसारखी चळवळ भारतात सुरु केली, ज्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी हयातभर आपली लेखणी झिजवली त्या ॲनी बेझंट भारतीय नव्हत्या हे कुणाला पटणारही नाही. भारतात येऊन बौद्ध आणि हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या, भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात पहिल्या महिला अध्यक्षाची भूमिका बजावणाऱ्या ॲनी बेझंट यांचे भारतीयांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. आपल्या काळात एक विद्रोही स्त्री म्हणून ख्याती मिळवणाऱ्या ॲनी बेझंट यांचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यही बरेच वादळी होते.

१ ऑक्टोबर १८४७ रोजी लंडनमध्ये आयरिश आई-वडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जन्माने त्या ॲनी वूड, पुढे लग्नानंतर त्यांचं आडनाव बेझंट झालं. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील हे जग सोडून गेले. त्यांच्या आईने सुरुवातीला एका होस्टेलमध्ये राहून नोकरी करून दोघींचा खर्च चालवण्याचा प्रयत्न केला. पण पुढे ॲनीच्या शिक्षणाचा खर्च पेलेवानसा झाला तेव्हा तिला त्यांनी आपली मैत्रीण एलन मॅरीएट हिच्याकडे पाठवले. एलन मॅरीएट या श्रीमंत अविवाहित स्त्री होत्या. त्यांच्यासोबत राहून ॲनीने धार्मिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या सतराव्या वर्षी त्या पुन्हा आपल्या आईसोबत राहू लागल्या. एकोणिसाव्या वर्षी त्यांनी रेव्हरंड फ्रॅंक बेझंट यांच्याशी विवाह केला.

रेव्हरंड फ्रॅंक खूपच कर्मठ होते. ॲनी विविध वर्तमानपत्रातून लेखन करून चार पैसे कमवत होत्या. पण धर्मशास्त्रानुसार पत्नीने कमावलेल्या पैशावरही पतीचाच अधिकार असतो असे फ्रॅंक म्हणत. आधीच्या दोन मुली असताना तिसऱ्या गर्भधारणेची अपेक्षा केली जात असल्याचे पाहून तर ॲनी हादरूनच गेल्या. शिवाय त्यांना वर्तमानपत्रातून त्यांचे मुक्त विचार मांडता येणार नाहीत अशीही अट ॲनीवर लादण्यात आली. तेव्हा मात्र ॲनींनी या नात्यातून कायदेशीररित्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाला तेव्हा त्यांच्याकडे मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीचाच काय तो आधार होता. आपल्या मुलीसह त्या आईकडे राहायला आल्या.

याच काळात ॲनींनी स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ सुरु केली. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या सारख्या विचारांनी त्या भारल्या होत्या. ब्रिटनमधील नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या त्या एक प्रभावी व्यक्ती होत्या. संपूर्ण ब्रिटनमध्ये आपल्या वक्तृत्वाने त्यांनी आपला ठसा उमटवला होता. नॅशनल रीफॉर्मर या वृत्तपत्रात त्या पत्रकार म्हणून ॲनी काम करू लागल्या.
फ्रीथॉटसारख्या वर्तमानपत्रातून ॲनी गर्भप्रतिबंधक साधनांविषयी लिहू लागल्या तेव्हा त्यांच्यावर अश्लीलता पसरवत असल्याचा गुन्हाही नोंद झाला. आयर्लंड आणि इंग्लंड अगदी आता-आतापर्यंत गर्भापाताच्याही विरोधात होते, तिथे १०० वर्षांपूर्वीची कथा ती काय सांगावी? तरी या खटल्याचा सर्वासमक्ष ॲनींनी पाठपुरावा केला. लोकसंख्या नियंत्रणात राहिल्याने दारिद्र्य-दैन्य कमी होईल असे त्यांचे ठाम मत होते. या खटल्यातून त्या निर्दोष सुटल्या. पुढे त्यांनी ‘द लॉ ऑफ पॉप्युलेशन’ नावाचा एक शोधनिबंध प्रकाशित केला.

यानंतर १८८९च्या दरम्यान ॲनी पेट्रोव्हना ब्लावस्की या रशियन महिलेच्या संपर्कात आल्या. तिच्या सहवासाने ॲनी थिऑसॉफीकल सोसायटीच्या प्रभावाखाली आल्या. त्यांनी आपली धार्मिक मते आणि गर्भधारणेविषयीच्या मतातही बदल केला. १८९१ मध्ये ॲनी या थिऑसॉफीकल सोसायटीची प्रमुख झाल्या. याच विचारांनी त्या भारतीय दार्शनिक आणि विचारवंताकडे आकृष्ट झाल्या. १८९३ मध्ये याचाच पाठपुरावा करत ॲनी भारतात आल्या आणि कायमच्य इथल्या बनून गेल्या. त्यांने हिंदू कॉलेजची स्थापना केली. भारतात राहून ॲनींनी भारतीय पोशाख स्वीकारला. भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर करून ते प्रकाशितही केले. यावरून ॲनी हिंदू विचारांनी किती प्रेरित झाल्या होत्या याची कल्पना येईल.

 

ब्रिटिशकालीन भारताची दयनीय अवस्था ॲनींनी आंतरराष्ट्रीय पटलावर उघड केली. १९१३ साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१७ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा बहुमानही पटकावला. भारतातील बालविवाह, जातीव्यवस्था, विधवा विवाह, सतीप्रथा अशा अनेक प्रथांविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि त्याविरोधात समाजात जागृती घडवून आणण्याचाही प्रयत्न केला. या सगळ्या सामाजिक समस्यांविरोधात लढण्यासाठी ॲनींनी ‘ब्रदर्स ऑफ सर्व्हिस’ ही संस्था स्थापन केली होती.

१९१५ सालीच त्यांनी होमरूल चळवळीची कल्पना मांडली आणि त्यासाठी प्रयत्न सुरु केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना भारतीय सैनिकांची मोठी मदत झाली होती. याबदल्यात इंग्रजांनी भारतीयांना स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी लो. टिळकांनी केली होती. त्यांनी १९१६ साली बेळगाव येथे पहिली होमरूल चळवळ स्थापन केली आणि ॲनी बेझंट यांनी अड्यार मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली. लो. टिळक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रांत आणि वऱ्हाड या परिसरात होमरूलचे नेतृत्व करीत होते, तर उर्वरित भारतात या चळवळीचा प्रसार करण्याची जबाबदारी ॲनी बेझंट यांची होती. संपूर्ण भारतात त्यांनी या चळवळीच्या २०० शाखा उभारल्या होत्या. ब्रिटिशांनी ही चळवळ चिरडून टाकण्यासाठी नेहमीप्रमाणेच दडपशाहीचा मार्ग अवलंबला. त्यांनी मद्रास न्यायालयातून ॲनी बेझंट यांच्यावर खटला दाखल केला. त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले. १५ जून १९१७ रोजी त्यांना अटक करण्यात आली. बेझंट यांच्या अटकेने संपूर्ण भारतात प्रक्षोभ उसळला होता. शेवटी लो. टिळकांनी त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे इंग्रजांनी बेझंट यांची सुटका केली.

ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने भारतातील सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते. विशेष म्हणजे मुस्लीम लीग आणि कॉंग्रेस यांच्यातील मनभेद आणि मतभेद मिटवण्यातही ॲनी बेझंट यांना यश आले होते.

२० सप्टेंबर १९३३ रोजी अड्यार येथेच त्यांचे निधन झाले. भारतीयांच्या उन्नतीसाठी धगधगणारी एक मशाल कायमची शांत झाली!!!

--मेघश्री श्रेष्ठी