बांगलादेश निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युध्दाची ठिणगी एका पाकिस्तानी पत्रकाराच्या लेखामुळं पडली होती !!

लिस्टिकल
बांगलादेश निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युध्दाची ठिणगी एका पाकिस्तानी पत्रकाराच्या लेखामुळं पडली होती !!

१९७१ साली भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेले युद्ध भारतासाठी प्रचंड मोठा विजय होता. पाकिस्तानचे दोन तुकडे पाडत भारतासाठी असलेली मोठी डोकेदुखी पूर्वपाकिस्तान आता बांगलादेश झाला. या युद्धाने जगभर भारताचा डंका वाजला. पण आशिया खंडाचा नकाशा बदलणारा आणि युद्धासारखी मोठी घटना घडण्यास कारणीभूत ठरणारी व्यक्ती हा खुद्द एक पाकिस्तानी पत्रकार होता. पत्रकार काय करू शकतो याचे सर्वात मोठे उदाहरण आज तुम्ही वाचणार आहात. त्याच्या एका रिपोर्टने भारत-पाकिस्तान युद्धास तोंड फोडले होते.

तो काळ शीतयुद्धाचा होता. भारताची जवळीक रशियासोबत, तर पाकिस्तान अमेरिकेच्या निकट होता. यात चीन-पाकिस्तानच्या नेहमीच बाजूने राहिलेला अजून एक देश. तर असा सर्व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा डाव तेव्हा मांडलेला होता. अमेरिका चीनवर पाकिस्तानला साथ देण्यासाठी दबाव आणत होता. सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेला भारत मात्र चीन युद्धात उतरला तर कसे सामोरे जायचे यासाठीही तयार होता. पुढे युद्ध झाले, युद्धात काय झाले, हे पूर्ण जगाने बघितले. तर आता थोडे मागे वळून त्या पत्रकाराने निभावलेल्या भूमिकेवर येऊया.

युद्धकाळात भारताला घाबरण्यासाठी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात मोठी युद्धसामग्री उभी केली होती. पण अमेरिका व्हिएतनाम युद्धात अडकला आहे आणि तो परत एका देशाशी युद्ध करण्याचा आगाऊपणा करणार नाही हे भारत जाणून होता. तरीही सुरक्षित पाऊल म्हणून सध्याचा रशिया आणि तत्कालीन सोव्हिएत संघ भारताच्या बाजूने उतरला. अमेरिकेन सामग्रीला टक्कर म्हणून सोव्हिएतने आपली सामग्री बंगालच्या उपसागरात उतरवली, तसेच संयुक्त राष्ट्रात भारताच्या बाजूने वेटो वापरला. पण सोव्हिएत भारताला मदत करत होता तो विनाकारण नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ६ महिने आधीच सोव्हएतला रशियाला यासाठी तयार केले होते.

युद्ध झाल्यावर संडे टाइम्स नावाच्या प्रसिद्ध वृत्तपत्रात इंदिरा गांधी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. यात इंदिरा गांधी म्हणतात, "संडे टाइम्समध्ये छापून आलेला एक लेख वाचूनच आपण भविष्याच्या दृष्टीने रशियाला भेट देऊन आलो होतो". आता तो लेख नेमका काय होता?

तर पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश, इथे लोकांवर पाकिस्तानी सैन्य प्रचंड अत्याचार करत होते. पण या बातम्या बाहेर येत नव्हत्या कारण सर्व पत्रकारांना त्या भागांतून हाकलून लावण्यात आले होते. पाकिस्तानी सैन्य अत्याचार करत असल्याने मोठ्या प्रमाणावर लोक भारतात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू लागले. या लोकांचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. त्यापेक्षा पूर्व पाकिस्तानला वेगळा देश करणे हा त्यामानाने सोपा उपाय होता.

 

पाकिस्तान करत असलेले कृत्य भारताला माहीत असले तरी पत्रकारांना हाकलून लावल्याने जगाला हे सर्व माहीत होण्याचा विषयच नव्हता. पण याच काळात संडे टाइम्समध्ये या सर्व नरसंहाराचे चित्रण करणारा मोठा लेख छापून आला. पाकिस्तानी दुष्कर्म जगासमोर आणणारा पत्रकार हा मूळ पाकिस्तानी होता. 'जेनोसाईड' नावाचा हा लेख लिहिणारा पत्रकार होता, अँथनी मस्करेनीस. नाव इंग्रजी वाटत असले तरी हा पत्रकार शुद्ध पाकिस्तानी होता. पण त्याने जे तिथे पाहिले ते जसेच्या तसे संडे टाइम्स मध्ये लिहिले आणि जगाला पाकिस्तानी अत्याचारांची माहिती झाली. याच लेखामुळे भारताने रशिया आणि इतर देशांना पाकिस्तान किती नृशंस कामे करत आहे याचा पुरावा देऊन आपल्याकडे वळवले. त्याचसोबत पाकिस्तान-बांग्लादेश दरम्यानच्या कुरबुरीत भारताच्या 'सशस्त्र हस्तक्षेपाची' गरज आहे हे ही तेव्हा अधोरेखित झाले होते. या सर्वांची परिणिती १९७१च्या युद्धात झाली.

अँथनी मस्करेनीस १० जुलै १९२८ला बेळगावात एका गोवन कॅथलिक कुटुंबात जन्मले. तेव्हा हे बेळगांव पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि ते गोवा राज्यात यायचं. हे अँथनी पुढे पाकिस्तानात कराचीत जाऊन राहिले. त्यांचं शिक्षण वगैरे तिथेच झाले. १९७१चा लेख: द रेप ऑफ बांग्लादेश आणि बांग्लादेश: अ लेगसी ऑफ ब्लडब हा १९८६चा लेख हे त्यांचे आणखी दोन महत्त्वाचे लेख. 'जेनोसाईड' प्रकाशित झाल्यावर पाकिस्तान सरकार करेल याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच ते कुटुंबासह ब्रिटनला निघून गेले. त्यांच्या लेखामुळे बांग्लादेश पाकिस्तानपासून आणि परिणामी त्या साऱ्या अत्याचारांपासून मुक्त झाला. याबद्दलची कृतज्ञता म्हणून बांग्लादेश सरकारने त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील असलेल्या लोकांच्या यादीत अँथनी मस्करेनीस यांचं नाव नोंदवलं आहे.

जाता जाता: या युद्धाच्या वेळेसच आपण आण्विक शस्त्रे आणि एकूणातच अणूसंशोधनात कमी पडत आहोत हे लक्षात येऊन भारताच्या अणूसंशोधनाची मेढ रोवली गेली. त्याबद्दल इथे वाचा.. 

आणि बुद्ध हसला.. जाणून घ्या भारताच्या पहिल्या यशस्वी अणूचाचणीविषयी काही गोष्टी.