मॉरिशसच्या भूमीवर भारताचा गुप्त नाविक तळ आहे? त्यामुळे जागतिक राजकारणात भारताचा काय फायदा होईल?

लिस्टिकल
मॉरिशसच्या भूमीवर भारताचा गुप्त नाविक तळ आहे? त्यामुळे जागतिक राजकारणात भारताचा काय फायदा होईल?

युद्ध सुरू नसेल तरी कोणतेही राष्ट्र स्वस्थ बसू शकत नाही. शांततेच्या काळातही सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन सुरूच असते. आपले राष्ट्र लष्करीदृष्ट्या मजबूत असावे, कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी समर्थ असावे, किंवा विशिष्ट प्रदेशात आपल्या सामर्थ्याचा दबदबा निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रे सतत प्रयत्नशील असतात. अर्थातच हे 'उद्योग' शत्रूसमोर उघडउघडपणे केले जात नाहीत. मात्र कधीकधी 'जो न देखे दुनिया, वो देखे मीडिया' याचा प्रत्यय येतो, काही उचापतखोर माध्यमे बरोब्बर अशा गोष्टी टिपतात आणि पुराव्यानिशी ती गुप्त गोष्ट सर्व जगासमोर आणतात. असाच एक उपद्व्याप अल ज़जिरा या वृत्तसंस्थेने केला आहे. त्याचीच ही गोष्ट.

हिंदी महासागरात भारताच्या नैऋत्य दिशेला मॉरिशिस हे बेट आहे. या मॉरिशिअसच्या मुख्य बेटापासून जवळपास १,१०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अगालेगा नावाच्या बेटावर भारत एक लष्करी तळ उभारत असल्याचा दावा कतारची मीडिया संघटना 'अल ज़जिरा'ने केला आहे. त्यासाठी त्यांनी काही सॅटेलाईट फोटो, फायनान्शिल डाटा आणि इतर काही पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे सादर करताना अल ज़जिराने जवळपास एक डझन कॅरियर्स ट्रॅक केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या कॅरियर्समधून भारतीय बंदरांपासून अगालेगापर्यंत बांधकामाचे साहित्य वाहून नेले जात होते. काही फोटो आणि डेटा यावरून गेल्या दोन वर्षांमध्ये या बेटावर शेकडो बांधकाम मजूर तात्पुरते निवारे बांधून राहत आहेत. पश्चिम आफ्रिकेपर्यंतच्या टापूत आपला प्रभाव वाढविण्यासाठी भारत हा तळ उभारत असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे! ‘सुरक्षा आणि विकास’ हे ध्येय गाठण्यासाठी भारताच्या ‘सागर’ मोहिमेअंतर्गत हे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता.

 

सुमारे तीनशे लोकवस्तीचे अगालेगा हे बेट जवळपास १२ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रुंद आहे. अल ज़जिराच्या दाव्यानुसार हे बेट म्हणजे भारत वापरत असलेला एक गुप्त तळ आहे. या तळावरूनच भारत दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर आणि मोझांबिक खाडी यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवत आहे. अल ज़जिराच्या पुराव्यांचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते भारतीय नौदल अगालेगा बेटावरील एक अर्धवट बांधलेली धावपट्टी समुद्रावर गस्त घालण्यासाठी वापरत आहे.
यापूर्वी २०१८ मध्येही असाच दावा करण्यात आला होता, पण तेव्हा भारत आणि मॉरिशिस या दोघांनीही तो खोडून काढला होता. वर अगालेगा बेटावर सुरू असलेले बांधकाम तेथील रहिवाशांच्या सोयीसाठी करण्यात येत आहे असेही स्पष्ट केले होते. त्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये भारत आणि मॉरिशिस यांच्यात झालेल्या कराराचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानुसार दोन्ही देशांनी मॉरिशिसला जगाशी हवाई आणि सागरी मार्गाने अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी आणि तेथील सीमा सुरक्षा दल वापरत असलेल्या सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी काही पायाभूत सुविधा उभारण्याचे मान्य केले होते. अल ज़जिराच्या छायाचित्रांवरून येथे दोन मोठ्या जेट्टी आणि जवळपास तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी यांचे बांधकाम सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते हा तळ मुख्यतः नौदलाच्या जहाजांसाठी धक्का म्हणून वापरला जाईल आणि धावपट्टी P 8I (पी एट आय) या विमानांसाठी वापरली जाईल. P 8I हे विमान समुद्रावर गस्त घालण्यासाठी खास तयार केलेले विमान असून ते देखरेख आणि अँटी सरफेस व अँटी सबमरीन वॉरफेअर साठी वापरले जाते.

आता अँटी सरफेस व अँटी सबमरीन वॉरफेअर म्हणजे काय?

आता अँटी सरफेस व अँटी सबमरीन वॉरफेअर म्हणजे काय?

तर अँटी सरफेस वॉरफेअर हा नौदलाच्या युद्धाचा एक प्रकार आहे. या प्रकारात सागरी पृष्ठभागावर असणाऱ्या शत्रूच्या जहाजांवर किंवा नौकांवर हल्ला केला जातो किंवा त्यांची क्षमता कमी केली जाते. त्याचप्रमाणे अँटी सबमरीन वॉरफेअरमध्ये शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी, त्यांचा मागोवा घेण्यासाठी, त्यांना थोपवण्यासाठी, आणि / किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी पृष्ठभागावरील युद्धनौका, विमान, पाणबुड्या किंवा अन्य साधनांचा वापर केला जातो.

अगालेगा बेटावर उतरू पाहणाऱ्या विमानांना सध्या अस्तित्वात असलेली ८०० मीटर लांबीची धावपट्टी वापरावी लागते. पण ही धावपट्टी सगळ्या प्रकारच्या विमानांसाठी पुरेशी नाही. ती केवळ मॉरिशिसच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रॉपेलरसाठी उपयुक्त आहे. नवी निर्मिती अवस्थेतील धावपट्टी कोणत्याही आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी उपयुक्त असेल.

पण मुळात हे सगळे करण्यामागे भारताची एक भूमिका आहे, असे तज्ज्ञ म्हणतात. ती कोणती?

हिंदी महासागर हे सध्या अनेक राष्ट्रांसाठी एक आकर्षक सत्ताकेंद्र बनले आहे आणि ही सर्व राष्ट्रे आपले राजकीय प्रभाव क्षेत्र विस्तारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंदी महासागराचा दक्षिण-पश्चिम प्रदेश भारतासाठी लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा आहे. चीनही हिंदी महासागरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. याआधी आफ्रिकेतील जिबूती(djibouti) येथे चीनने २०१७ मध्ये तळ स्थापन केला आहे. चीनला शह देण्याचाही भारताचा प्रयत्न आहे. त्यातूनच भारताने मॉरिशिस आणि मालदीव यांच्यासह काही देशांना कोस्टल रडार सिस्टीम्स पुरवल्या आहेत.

युद्ध आणि साम्राज्यविस्तार हा प्राचीन खेळ आहे. यात जितके महत्त्व सामर्थ्याला आहे तितकेच अचूक वेळ गाठण्यालाही. आपण त्या दिशेने काय पावले उचलतो आणि शह काटशह यांचा हा खेळ भविष्यात काय वळण घेतो हे पाहणे जास्त उत्कंठावर्धक ठरणार आहे.

स्मिता जोगळेकर