२० पेक्षा जास्त वर्षे तालिबानला रोखून धरल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी बोलावलं. त्यानंतर काय झाले हे गेल्या दोन आठवड्यांत संपूर्ण जगाने पाहिले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष पैशांनी भरलेल्या विमानात बसून देश सोडून पळाले, तालिबानी अतिरेकी थेट अध्यक्षांच्या खोलीत शिरले, अफगाणी लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरून ते देश सोडून पळाले. देश सोडून पळताना अफगाणी लोकांची झालेली अवस्था सुन्न करणारी होती.
तालिबान विचारसरणी आणि तालिबानी अतिरेकी यांची अफगाण नागरिकांमध्ये असलेली दहशत याला एक मोठा इतिहास आहे. आज आम्ही या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेविषयी सांगणार आहोत. या घटनेने संपूर्ण जगाला तालिबानी अतिरेकी काय करू शकतात हे दाखवून दिलं होतं.
शेकडो वर्षांपासून चीन ते अगदी युरोपच्या पूर्वेच्या टोकापर्यंत व्यापार चालायचा. हा व्यापार ज्या मार्गावरून चालायचा तो मार्ग म्हणजे रेशीम मार्ग किंवा सिल्क रूट. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वत रांगेच्या जवळून हा रेशीम मार्ग गेला आहे. याच मार्गावरचं एक ठिकाण म्हणजे बामियान. अनेक वर्षांपूर्वी रेशीम मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात असताना या मार्गांवरूनच बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यामुळे बौद्ध भिख्खूंनी या मार्गावर लहान लहान विहार स्थापन केले. बामियानचे विहार म्हणजे हिंदुकुश पर्वत कोरून तयार केलेल्या दोन प्रचंड बुद्ध मुर्त्या आणि सभोवताली पहाडातच स्थापलेले विहार. साधारणपणे लहान आकाराच्या बुद्धाची मूर्ती ही इसवीसनपूर्व ५७० सालात, तर मोठी मूर्ती इसवीसनपूर्व ६१८ साली कोरण्यात आली होती. या बुद्ध मूर्त्या हिंदुकुश पर्वतातच खोदलेल्या होत्या.


