कतारमध्ये होणार्‍या २०२२ च्या फुटबॉल वर्ल्डकपला सुरक्षा देणार भारतीय सुरक्षा यंत्रणा!!

कतारमध्ये होणार्‍या २०२२ च्या फुटबॉल वर्ल्डकपला सुरक्षा देणार भारतीय सुरक्षा यंत्रणा!!

 

मंडळी, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशाची सुरक्षा सांभाळणं तसं खूपच कठीण काम. पण आपल्या देशाच्या सर्व सुरक्षा यंत्रणा हे कार्य अत्यंत सक्षमपणे पार पाडतात. २६/११ चा हल्ल्यासारखी कठीण परिस्थिती असो किंवा IPL, ISL सारख्या मोठमोठ्या स्पर्धांची सुरक्षा. प्रत्येकवेळी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी ही आव्हानं यशस्वीपणे पेलली आहेत. म्हणूनच फुटबॉलची सर्वोच्च संघटना असलेल्या FIFA ने २०२२ मध्ये होणार्‍या फुटबॉल वर्ल्डकपची सुरक्षा सांभाळण्यासाठी भारतीय अधिकार्‍यांची मागणी केलीये! आणि त्यासाठी भारत सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय.

कतारमधील एक वातानुकूलित फुटबॉल मैदान (स्त्रोत

२०२२ च्या फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद हे कतार देशाकडे आहे. यासाठी गृहमंत्रालयाने देशभरातून २० IPS अधिकार्‍यांची यादी बनवलीये ज्यांनी याआधीही अशा सुरक्षेच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. हे अधिकारी येत्या मार्चमध्ये कतारची राजधानी दोहा येथे होण्याऱ्या पहिल्या सिक्युरिटी सेमिनारला उपस्थित राहतील.

या २० अधिकार्‍यांमध्ये प्रामुख्याने २६/११ हल्ल्यात महत्वाची कामगीरी बजावलेल्या महाराष्ट्र आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे SP आणि DIG दर्जाचे अधिकारी, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातून IPL ची सुरक्षा सांभाळणारे अधिकारी, पश्चिम बंगालकडून ISL ची सुरक्षा सांभाळणारे अधिकारी, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मोहिमांचा अनुभव असलेल्या IB च्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना चांगल्या पध्दतीने इंग्रजी बोलता यावं, आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा इतर तत्सम लांंच्छनं नसावीत, अशी अटही गृहमंत्रालयाने लावलीये.

मंडळी, FIFA च्या वर्ल्डकपसारख्या जागतिक दर्जाच्या प्रचंड कार्यक्रमाची सुरक्षा भारतीय अधिकार्‍यांनी सांभाळणं ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट तर आहेच, पण त्याबरोबरच हा सुरक्षा कार्यक्रम म्हणजे आपल्या यंत्रणांसाठी एक मोठा अनुभव ठरेल यात शंका नाही.