अमेरिकन सरकारच्या मालकीची जनेट हि सगळ्यात रहस्यमय विमानसेवा आहे! कशा साठी केला जातो वापर?

लिस्टिकल
अमेरिकन सरकारच्या मालकीची जनेट हि सगळ्यात रहस्यमय विमानसेवा आहे! कशा साठी केला जातो वापर?

प्रत्येक देशाच्या सुरक्षाव्यवस्थेची कामे अत्यंत गोपनीयरित्या सुरू असतात. या सुरक्षा दलात सामील होणाऱ्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते त्यांच्या कामाचे संदेश पोहोचवण्यापर्यंतची अनेक कामे गुप्तरीत्याच पार पाडली जातात. गुप्तता पाळणे हा देखील सुरक्षेसाठीचा आवश्यक नियम असतो. अमेरिकेची एक जनेट नावाची विमान सेवा आहे. या विमानसेवेबाबतही अमेरिकेने बरीच गुप्तता पाळली आहे.

अमेरिकेच्या या विमान सेवेबद्दल खुद्द अमेरिकन नागरिकांनाही फार माहिती नसेल. मुळात या विमान सेवेचे नाव जनेट तरी आहे का याबद्दलही खात्री देता येणार नाही. आता इतक्या गोपनीय विमानसेवेचे हे अमेरिकन करतात तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. अमेरिकेची हि गुप्त विमान सेवा एका गुप्त ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे काम करते. लास व्हेगास माधील मकॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते अमेरिकेतील एरिया५१ या अत्यंत गुप्त ठिकाणी हे विमानसेवा ये जा करते. ही विमानसेवा अमेरिकेच्या हवाईदलाशी संबधित असल्याची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने या विमानातून कोण प्रवास करते याची कुणालाही माहिती नसते. यातील प्रवाशांनाही कडक सुरक्षा तपासणी पूर्ण करुन मगच आत प्रवेश दिला जातो. कदाचित हे एरिया-५१ या अमेरिकेतील एका गुप्त लष्करी तळावर काम करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची ने-आण करण्याचे काम हे विमान करत असावे असा काहींचा अंदाज आहे. हे एरिया- ५१ काय आहे, तिथे काय केले जाते, याबद्दलही कुणाला फारशी माहिती नाही.

नेवाडा वाळवंटातील एरिया-५१ नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश अनेक वर्षे अनेक प्रकारच्या रहस्यांनी वेढलेला होता. अशा प्रकारचा कुठला प्रदेश अस्तित्वात आहे किंवा नाही आणि त्याठिकाणी काय चालते याबाबत अमेरिकन सरकारने कसलाच खुलासा केला नव्हता. कोणी म्हणत होते हे अमेरिकेचे गुप्त लष्करी ठाणे आहे, तर कुणी म्हणत होते इथे अमेरिकेने उडत्या तबकड्यांतून आलेल्या परग्रहवासींना पकडून ठेवले असून त्यांच्यावर अभ्यास सुरू आहे. असे अनेक तर्क-वितर्क या ठिकाणाबद्दल लढवले जात असताना शेवटी २०१३ साली अमेरिकेन सरकारने याबाबतची गोपनीय कागदपत्रे उघड केली आणि हे ठिकाण म्हणजे अमेरिकेच्या लष्करी दलाचे प्रशिक्षण तळ असल्याचे जाहीर केले.

जितके गूढ एरिया-५१ बद्दल होते तितकेच गूढ या जनेट विमानसेवेबद्दलही आहे. १९७० पासुन ही विमान सेवा मकॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एरिया-५१ यादरम्यान येरझाऱ्या घालत आहे, पण कशासाठी हेच कुणाला माहीत नाही. या विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तर अशी कुठली विमानसेवा असल्याचेच नाकारले आहे. याचे जनेट हे नावही अधिकृत नाव नाहीये. तर हे नाव काही हौशी संशोधकांनीच दिले आहे, ज्यांना या विमानसेवेबद्दल खूपच उत्सुकता आहे आणि ते गेली कित्येक वर्षे या विमानसेवेवर लक्ष ठेवून आहेत.

ही विमानसेवा AECOM कंपनीमार्फत चालवली जाते असे या अभ्यासकांचे मत आहे. या विमान कंपनीकडे बोईंग-७३७ प्रकारची सहा विमाने आहेत. शिवाय आणखी एक बीचक्राफ्ट नावाचे विमानही आहे. ही विमाने शुभ्र पांढऱ्या रंगाची असून त्यावर तीन लाल रंगाच्या पट्ट्या ओढलेल्या आहेत. वेगास हवाई तळावरून ही विमाने हवेत उड्डाण घेताना दिसतात. अगदी दररोज यांच्या ठरलेल्या फेऱ्या असतातच. विमानातील पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांचीही कठोर सुरक्षा तपासणी केली जाते आणि मगच त्यांना आत प्रवेश दिला जातो. या विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत गोपनीयता पाळण्याची शपथ दिली जाते. त्यामुळे ते स्वतःहूनही आपल्या कामाबद्दल कुणाजवळ काही बोलत नाहीत.

एरिया ५१ मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जे काही काम किंवा कारवाई चालते त्याबद्दल चर्चा करणेच चूक आहे, त्यामुळे त्याठिकाणी जाणारी विमाने का जातात, कशी जातात, त्यातून कोण प्रवास करते याबद्दल बोलणेही चुकीचेच आहे, असे या विमानतळावरील अधिकाऱ्यांचे मत आहे. अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यातील अधिकारीही या विमानतून प्रवास असावेत असा काहींचा अंदाज आहे. या विमानसेवेबद्दल अजून कुणीच खोलात जाऊन अभ्यास केलेला नाही. या जनेट विमानसेवेची आणखी एक गंमत म्हणजे या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या अधिकाऱ्यांची नजर असते. त्यामुळे कदाचित नेवाडाच्या प्रदेशात अणूचाचणी केली जात असावी आणि या विमानाने प्रवास करणारे प्रवासी अणूचाचणीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असावेत असाही एक तर्क लढवला जात आहे. तर काहींच्या मते हे शास्त्रज्ञ अणुबॉम्ब निष्क्रिय कसा करता येईल याची चाचपणी करतात आणि त्यावर त्यांचे संशोधन सुरू आहे.

जॉर्ज आर्नु हे १९९० पासून एरिया-५१ आणि जनेट विमानसेवेच मागोवा घेत आहेत. त्यांच्या मते विमानतळावरील अधिकारी जनेटचे अस्तित्वच नाकारतात कारण त्यांना त्याबाबत गोपनीयता पाळण्याची शपथच दिली आहे. हे विमान आणि विमानातील प्रवासी यांच्याबाबत गोपनीयता पाळणे हे या अधिकाऱ्यांचे कामच आहे. मकॅरन विमानतळावरून या विमानाच्या दररोज तब्बल २० तरी फेऱ्या होतातच. हे विमान इथून प्रवासी घेऊन जाते आणि ते एरिया-५१ आणि टोपोनाह याठिकाणी त्यांना उतरवते. एरिया-५१ मध्ये जाताच हे विमान रेडीओ संदेशाद्वारा नियंत्रित केले जाते.

जनेट विमानसेवेबाबत अनेकांना प्रचंड कुतूहल आणि उस्तुकता आहे, पण याबाबत कोणाला काही कळणे अजिबात शक्य नाही. एरिया-५१ बाबत जसा सरकारने यथावकाश खुलासा केला तसाच कधी तरी भविष्यात जनेटबाबतही सरकार खुलासा करेल. या विमान सेवेमागील खरे सत्य तेव्हाच लोकांसमोर येईल. तोपर्यंत आपण फक्त अंदाज आणि तर्कच लढवू शकतो, बस्स!