पनिशमेंट म्हणजेच शिक्षा या शब्दाच्या भीतीनेच लहानपणी अनेकदा तुम्ही शाळेला बुट्टी मारली असेल. साधी छडी असो किंवा वर्गाबाहेर अंगठे धरून उभे राहाणं असो. शिक्षा कुणालाच आवडत नाही. एकदा शिक्षा मिळाल्यानंतर शिक्षा या शब्दाचा आणि आपला दुरान्वयेही संबंध येणार नाही याची आपण अतिशय खबरदारी घेतो.
गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठीही अशाच कठोरातील कठोर शिक्षा सुनावल्या जातात आणि त्या अवलंबल्या जातात. आजच्या काळात तुरुंगवास, जन्मठेप आणि फाशी असे काही मोजकेच प्रकार वापरले जात असले तरी मध्ययुगीन काळात आरोपींना आणि त्याद्वारे सामान्य जनतेतही कायद्याचे भय निर्माण करण्यासाठी अघोरी शिक्षा अंमलात आणल्या जात असत. आज आपण अशाच काही भयाण आणि क्रूर शिक्षा पाहणार आहोत. ज्याबद्दल नुसते वाचले तरी अंगावर काटा उभा राहील. राजेशाही आणि सरंजामशाहीच्या काळातील शिक्षेचे हे रूप म्हणजे साक्षात नरकयातनाच!
ग्रीक संस्कृतीपासून ते मध्यकालीन इंग्लंडपर्यंत शिक्षेच्या साधनात बरीच कल्पकता वापरलेली दिसते. अर्थात ही कल्पकता भयावह असली तरी एकमेकांना शिक्षा देण्याची मानवी खुमखुमी कुठल्या थराला जाऊ शकते हेही यावरून पाहता येईल. शिक्षेसाठी म्हणून बनवण्यात आलेली ही ११ उपकरणे पहिल्यानंतर माणूस आपल्या सारख्याच माणसाबद्दल इतका क्रूर कसा होऊ शकतो हा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
मध्ययुगीन शिक्षेचे ११ अमानुष प्रकार...


१. हेरेटिक फोर्क
नावावरूनच वाटते की हा एखाद्या प्रकारचा चाकू असावा. गळ्यात कॉलरच्या सहाय्याने अडकवता येणाऱ्या या साधनात एक उभी कांडी बसवलेली असे. याच्या दोन्ही बाजू अत्यंत टोकदार असत. ही मधली कांडी छातीच्या वरच्या भागापासून हनुवटीपर्यंत बसत असे आणि टोकदार असल्याने गुन्हेगाराला मान मागच्या बाजूला झुकवूनच ठेवावी लागे. जरा जरी मन सैल पडली तरी दोन्ही बाजूचे तीव्र टोक आत घुसून गंभीर इजा होत असे. या उपकरणामुळे मृत्यू ओढवत नसला तरी गुन्हेगार गंभीररित्या जखमी होत असे. स्पॅनिश हल्ल्यावेळी याचा वारेमाप वापर करण्यात आला.

२. थंबस्क्रू
मध्ययुगीन युरोपमध्ये हे एक अतिशय क्रूर उपकरण वापरले जात असे. नावाप्रमाणेच गुन्हेगाराच्या बोटात हा स्क्रू घुसवला जात असे. हे उपकरण अवजड धातूपासून बनवले जात होते. यात एकाच वेळी दोन ठिकाणी स्क्रू घुसवता येईल अशी रचना करण्यात आली होती.

३. स्कोल्ड्स ब्रिडल
एकमेकांच्यात लावालावी करणारे, चहाड्या करणारे लोक आजही आहेत आणि त्याकाळात म्हणजे १६व्या-१७ व्या शतकातही होते. अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी हे खास उपकरण तयार करण्यात आले होते. डोक्यावर हेल्मेटप्रमाणे बसवल्या जाणाऱ्या या उपकरणाला एक पट्टी बसवलेली असे. या पट्टीमुळे त्या व्यक्तीचे तोंड कायम बंद राहत असे. कधीकधी तर या पट्टीला लोखंडी सळी बसवलेली असे जी त्याच्या जिभेत घुसवली जाई. यामुळे त्या व्यक्तीला गंभीर इजा होत असे.

४. स्कॅव्हेंजर्स डॉटर
राजा आठवा हेन्रीच्या काळात या अघोरी उपकरणाचा शोध लागला. यामध्ये गळ्यात आणि हातापायात बेड्या घालून त्यांची हालचाल मंदावली जात असे. या सगळ्या बेड्या एकमेकांशी जोडलेल्या असत आणि त्यातील अंतरही अगदी कमी असे. त्यामुळे कैद्याला कसलीच हालचाल न करता पडून राहावे लागे. यामुळे थेट इजा काही होत नसली तरी अधिक काळ हालचाल न करता आल्याने त्यांचे स्नायू दुखावले जात.

५. लीड स्प्रिंकलर
नावावरूनच या उपकरणाची क्रूरता स्पष्ट होते. चर्चमध्ये ज्या प्रकारे प्रिस्ट एखाद्या भाविकावर पवित्र पाणी शिंपडतो त्याचप्रमाणे हे उपकरण बनवले गेले होते. फरक इतकाच की त्यात पवित्र पाणी असते आणि यात वितळलेले शिसे असे. हे शिसे कैद्याच्या शरीरावर कुठेही शिंपडले जात असे. हे गरम शिसे अंगावर पडल्याने शरीराचा दाह होत असे. ज्या भागावर शिसे पडेल तो भाग जाळून जात असे. कैद्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला अशाच यातना दिल्या जात.

६. द रॅक
कैद्यासाठी बनवण्यात आलेला हा एक पिंजराच होता. यात कैद्याचे हात पाय एका रॉडला बांधण्यात येत असत. कैद्याने जरा जरी हालचाल करण्याचा प्रयत्न केला तरी, हे रॉड जोरात उलट दिशेने फिरवण्यात येत ज्यामुळे कैद्याचे स्नायू तुटत. कधी कधी हाडेही मोडली जात. ही शिक्षा तशी साधी वाटत असली तरी यातून कैद्याला प्रचंड यातना दिल्या जात.

७. ज्युडास क्रॅडल
स्टूलप्रमाणेच यालाही चार पाय असत पण याचा पृष्ठभाग टोकदार असे. कैद्याला त्यावर बसवून ठेवून त्याचे हात पाय बांधले जात. अवघड जागी टोकदार भाग घुसल्याने त्याला गंभीर दुखापत होत असे.

८. ब्रेकिंग व्हील
गुन्हेगाराला किंवा कैद्याला मोठ्या गोल चाकाला बांधून डोंगरावरून खाली सोडण्याचे किस्से तुम्ही अनेक पुराणकथेत वाचले असतील किंवा तशा चित्रपटातून पहिले असतील. तसाच काहीसा हा देखील प्रकार होता. गुन्हेगाराला एका चाकावर उघडे करून बांधले जाई आणि वरून त्याला जोरदार फटके मारले जात. कधीकधी खाली आग लावून त्यावरून ते चाक गोल गोल फिरवले जाई. (तानाजी : द अनसंग वॉरियर, चित्रपटात उदयभान [सैफ आली खान] मगर भाजून खातानाचे दृश्य आठवा) तर कधी कधी गुन्हेगाराला त्या चाकात अडकवले जाई आणि वरून फटके मारले जात. अखेरचा फटका पोटावर आणि जननेंद्रियावर मारला जाई, ज्यामुळे गुन्हेगाराचा मृत्यू होत असे.

९. पिलोरी
१८ व्या शतकात या प्रकारच्या शिक्षा प्रचलित होती. एका मोठ्या खांबावर एक छोटीशी लाकडी चौकट बसवलेली असे. या चौकटीत एक फट पडलेली असे आणि या फटीत कैद्याची मान अडकवली जात असे. भरचौकात गुन्हेगाराला अशी शिक्षा दिल्याने त्याची मानहानी होत असे आणि शारीरिक इजा देखील. येताजाता लोक दगड फेकून मारत असत किंवा त्यांचे वाटेल त्या पद्धतीने हाल केले जात असत. यात कधीकधी त्या कैद्याचा मृत्यूही ओढवत असे.१

१०. द स्टेक
भर चौकात कैद्याला एका लाकडी खांबाशी बांधले जाई आणि त्याखाली होळी रचावी तसे लाकूड रचून ते पेटवले जाई. थोडक्यात जिवंत जाळण्याचाच प्रकार. कधीकधी कैद्याचा लवकर मृत्यू व्हावा म्हणून त्याच्या संपूर्ण शरीरावर गन पावडर ओतली जाई. जोन ऑफ आर्कला मध्ययुगीन फ्रान्समध्ये अशाच प्रकारे जिवंत जाळण्यात आले होते.

११. ब्रेझन बुल
आता पर्यंतच्या यादीतील ही सर्वात क्रूर शिक्षा म्हटले तरी कमीच ठरेल. पण मध्ययुगीन काळात शिक्षेचा हा अत्यंत निंदनीय आणि क्रूर प्रकार फारच प्रचलित होता. यामध्ये धातूपासून एक पोकळ बैल बनवला जात असे. आतून पोकळ असणाऱ्या या साच्यात गुन्हेगाराला बसवले जात असे. बैलाच्या या मूर्तीचे तोंड मात्र उघडे ठेवले जाई आणि कैद्याला आत बसवता यावे यासाठी खालच्या बाजूला एक झडप बसवली जाई. ही झडप उघडून कैद्याला आत ढकलले जाई. एकदा कैद्याला आत ढकलल्यानंतर धातूच्या त्या पुतळ्याखाली आग लावली जाई. खालच्या बाजूने आगीचे चटके बसतील तसे आतला कैदी जीवाच्या आकांताने ओरडत असे आणि त्याची मजा जमलेले सगळे बघे घेत असत. आतील कैदी पूर्ण शिजून मरेपर्यंत हा क्रूर खेळ खेळला जात असे.
इतिहासातील शिक्षेचे हे अमावानीय आणि क्रूर प्रकार ज्याला सुचले असतील त्याच्या कल्पकतेचा करावा तितका निषेध कमीच. गुन्हेगार असला तरी त्याला इतके हालहाल करून मारणे गरजेचे आहे का? तुम्हाला काय वाटते?
मेघश्री श्रेष्ठी