१३ डिसेंबर २००१ रोजी काही अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. थेट संसदेवर केलेला हा हल्ला भारतीय जनजीवन हादरवून सोडणारा होता. या हल्ल्यावर आधारित काही सिनेमे आणि सिरीजही येऊन गेल्या आहेत. आता या हल्ल्यामागे पाकिस्तान होता हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. या हल्ल्याला उत्तर देणे गरजेचेच होते. तसे झाले देखील!! संसद हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन पराक्रम राबवले होते. याच गोष्टीची आज आपण माहिती घेणार आहोत.
२००१च्या संसद हल्ल्याचे प्रत्युत्तर-ऑपरेशन पराक्रम!! कसे आणि काय घडले होते हे ही जाणून घ्या!!


कारगिल युद्ध होऊन ३ वर्षंही झाले नाहीत आणि पाकिस्तानने भारतावर हा मोठा हल्ला केला. १३ डिसेंबरला हल्ला झाला आणि भारतात हालचाली सुरू झाल्या. यातून समोर आले ते म्हणजे ऑपरेशन पराक्रम. हे ऑपरेशन म्हणजे काही सिक्रेट मिशन नव्हते. भारताचे सैन्य थेट सीमेवर मोठ्या जोशाने उभे करण्यात आले होते. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदा समोरासमोर दोन्ही देशांचे सैन्य उभे ठाकले होते.

३ जानेवारी २००२ भारताने आपले सैन्य सीमेवर उभे केले. १० महिन्यांसाठी सर्व अधिकारी आणि सैनिकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. भारताची बाजू जड होती. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानी कुरबुरींचा अंदाजा इतर देशांना आला होता. भारताने आपले ५ लाखांचे, तर पाकिस्तानने ३ लाखांचे सैन्य सीमेवर तैनात केले. फक्त सैन्यच नाही, तर बॅलेस्टिक मिसाईल आणि इतर आर्टिलरी पण तैनात करण्यात आली होती.

आता पाकिस्तान मात्र तिकडे घाबरला होता. कारण युद्ध झाले तर त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली असती. जनरल परवेझ मुशर्रफने एक पाऊल मागे घेत यापुढे पाकिस्तान कुठल्याही दहशतवादी हालचालींना समर्थन देणार नाही असे वक्तव्य केले. यामुळे तणाव जरी कमी झाला तरी भारताने आपले सैन्य अजूनही मागे घेतले नव्हते.
पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या ताकदीचा अंदाज आलेला असल्याने त्यांनी नेहमीच्या आपल्या अणुबॉम्बच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. पण पाकिस्तान पोकळ हवेतल्या गोष्टींशिवाय काही करू शकत नव्हता. कारण भारतीय सैन्य थेट एलओसीवर पूर्ण ताकदीनिशी उभे होते. हे ऑपरेशन म्हणजे पाकिस्तानला भारत काय करू शकतो हे स्पष्टपणे ठणकावून सांगण्याचाच एक भाग होता.

या काळात समोरासमोरून काही छोट्या घटना वगळता एकमेकांसोबत मोठी चकमक घडली नाही. मात्र या ऑपरेशनने पाकिस्तानला आपल्या अतिरेकी कारवाया आवरून घेण्यास भाग पाडले. पाकिस्तान जरी सुधरणाऱ्यांमधला नसला तरी २००१ नंतर २००८ ला झालेल्या २६/११ च्या हल्ल्यापर्यंत पाकिस्तान मोठा हल्ला करण्यास धजावले नाही याला ऑपरेशन पराक्रम कारणीभूत होते असेही सांगितले जाते.

मात्र ऑपरेशन पराक्रमची दुसरी बाजू जी सांगितली जाते ती म्हणजे यामुळे भारतावर मोठा आर्थिक ताण पडला. या ऑपरेशन दरम्यान भारताचे ७९८ सैनिक शहिद झाले होते. कारगिलमध्ये ५२७ सैनिक शहिद झाल्याने ही संख्या कारगिल युद्धाहून मोठी होती. पाकिस्तानला भीती घालण्यासाठी ही मोजलेली रकम मोठी असल्याचे माजी नौसेना प्रमुख सुशीलकुमार यांनी म्हटले होते.
ऑपरेशन पराक्रममुळे भारताला नुकसान झाले, तर पाकिस्तानला आपली दहशतवाद्याना पाठीशी घालण्याची रणनीती काही प्रमाणात का होईना बदलावी लागली होती. शेवटी भारताने स्वतःहून हल्ला केला नाही आणि पाकिस्तानला जरब बसल्याने १६ ऑक्टोबर २००२ ला हे ऑपरेशन स्थगित करण्यात आले.
उदय पाटील