आपण यापूर्वीच बघितलं की ब्रिटनच्या हुजूर (conservative) पक्षाच्या नेतेपदासाठीची निवडणूक हा सध्या राणीच्या राज्यात चर्चेचा विषय आहे आणि यावेळी रिंगणात चक्क एक भारतीय मूळ असलेला उमेदवार उभा आहे. ऋषी सुनक हे त्या उमेदवाराचं नाव.
ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असले तरी त्यांचा जन्म ब्रिटनमधलाच आहे. त्यांचे आईवडील आफ्रिकेतून १९६० च्या दशकात ब्रिटनमध्ये आले. वडील डॉक्टर तर आईचं फार्मसीचं दुकान अशा कुटुंबात ते वाढले. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी PPE म्हणजे Politics , Philosophy , and Economics चा अभ्यास केला. हा 'अभ्यासक्रम' म्हणजे ब्रिटिश राजकारण्यांची जणू मूसच आहे असं म्हणायला हरकत नाही.
या पीपीई पदवीधारकांना आपण सोयीसाठी पीप म्हणू या. या पीप मंडळींचं प्रस्थ ब्रिटिश राजकारणात केवढं आहे ते जाणून घेण्याकरता गार्डियन या वृत्तपत्राने ब्रिटिश राजकारणातल्या एका महत्त्वाच्या दिवसाचं वर्णन कसं केलय बघू या. १३ एप्रिल २०१५ ला मजूर पक्षाच्या नेत्याने - पीप एड मिलीबँड यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बीबीसी चे वार्ताहर पीप निक रॉबिन्सन, अर्थसंपादक पीप रॉबर्ट प्रेस्टन, आणि एका अर्थसंस्थेचे संचालक पीप पॉल जॉन्सन यांनी तो तपासला, त्यावर चर्चा केली, पंतप्रधान पीप डेविड कॅमेरॉन यांनी त्यावर घणाघाती टीका केली, आणि मजूर पक्षाचे पीप एड बॉल्स यांनी त्याचा जोरदार पाठपुरावा केला. एकूण काय, ही पीप मंडळी म्हणजे बडं प्रस्थ आहे.
नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक हुजूर पक्षाची निवडणूक जिंकतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जिंकलेच तर आपले पूर्वीचे राज्यकर्ते ब्रिटिश त्यांना सुखाने नांदू देतील का?


सुदैवाने ऋषी सुनक हेही त्या 'आतल्या गोटातले' आहेत. पुढे त्यांनी एका मोठ्या घरातलया मुलीशी लग्न केलं. इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती म्हणजे त्यांचे सासरे. ते भारतात प्रसिद्ध आहेत, सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. अर्थातच ऋषी सुनक श्रीमंत आहेत.
ऋषी सुनक ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता किती आहे? ढोबळपणे या निवडणुकीचं स्वरूप असं असतं. हुजूर पक्षाच्या घटनेप्रमाणे पहिल्या काही फेऱ्यात फक्त पक्षाचे लोकप्रतिनिधी मतदान करतात. प्रत्येक उमेदवाराला प्रथम २० प्रतिनिधींचा पाठिंबा अर्ज करण्यासाठीच लागतो. यानंतर पहिल्या फेरीचं मतदान होतं. मग ३० प्रतिनिधींचा पाठिंबा लागतो, ज्यांना याहून कमी मतं मिळतात ते स्पर्धेतून बाद होतात. जवळपास दर दिवशी ही प्रक्रिया थोडी पुढे जाते. या चाळणीतून शेवटी फक्त २ उमेदवार उरतात. मग मतदानाची शेवटची फेरी होते. यात पक्षाचे सर्व नोंदणीकृत सदस्य, म्हणजे आजघडीला दोन लाखाच्या सुमारास असलेले सदस्य मतदान करतात. या फेरीत ज्याला जास्त मतं मिळतील तो उमेदवार पक्षाचा नेता होतो. सध्या लोकसभेमध्ये हुजूर पक्षाचं बहुमत आहे, पंतप्रधान बोरिस जॉन्सन हुजूर पक्षाचा आहे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नेतेपदाची निवडणूक होते आहे हेही आपण यापूर्वीच बघितलं. निवडणूक संपली रे संपली की नवा नेता ब्रिटनचा पंतप्रधान होईल.

आता परिस्थिती अशी आहे की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा ऋषी सुनक यांना पाठिंबा आहे, जवळपास ३२० लोकप्रतिनिधीं पैकी १०० च्या वर सुनक यांच्या गोटात आहेत. याशिवाय आत्ता जे काही इतर नेत्यांच्या गोटात आहेत त्यातले काही त्यांचा उमेदवार जर स्पर्धेतून बाद झाला तर सुनकना पाठिंबा देतील हेही पक्के आहे. मात्र हुजूर पक्षाचे बांधलेले मतदार म्हणजे बऱ्याच अंशी कर्मठ असलेली ब्रिटनमधील बुजुर्ग मंडळी. ते ऋषी सुनकला आपली पसंती देतील का? शेवटच्या फेरीत सुनक आपटी खातील का?
Conservative Home नावाची संस्था वेळोवेळी हुजूर मतदारांचं मत आजमावण्याकरता चाचणी मतदान घेते. आत्तापर्यंत तरी अशा मतदानात सुनक यांची गाडी २०-२५ % मतांच्या पलीकडे गेलेली नाही. २-३ चॅनेल्सवरच्या वादांमध्ये सुनक यांनी चांगली कामगिरी केली असं लोकांचं मत आहे, पण ते अंतिम मतदानात दिसेल का हा प्रश्नच आहे. सुनील गावस्करला खोटा पायचीत देऊन खेळातलं आपलं काम साधायचं आणि तळाच्या चंद्रशेखरविरुद्धचं पायचीतचं अपील दोन-तीनदा फेटाळून आपण निष्पक्ष आहोत हेही त्याच दिवशी सिद्ध करायचं ही करामत डझनावारी देशांवर राज्य केलेल्या, मुत्सद्देगिरीत कोणालाही मागे काढू शकणाऱ्या ब्रिटिश मंडळींच्या नसानसात मुरलेली आहे, त्यामुळे शेवटचा निकाल लागल्याशिवाय सामना संपला असं म्हणणं धार्ष्ट्याचं आहे.
वरील प्रश्नांचं दुसरं उत्तर शोधण्यासाठी आपण या शतकात पूर्वी झालेल्या हुजूर पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकांचा मागोवा घेऊ या. २००० सालानंतर एकूण चार वेळा २००१, २००५, २०१६, २०१९ मध्ये - अशा निवडणूक घेण्यात आल्या. यापैकी तीन निवडणुकांमध्ये - 2001, 2005, 2016 मध्ये - स्थूलमानाने पूर्णपणे ब्रिटिश असलेले असेच उमेदवार होते. २०१९ मध्ये मात्र सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एक उमेदवार होते. ते एका तुर्की पत्रकार-मंत्र्यांचे खापरपणतु आहेत हा एक थोडासा बाहेरच्या देशाशी त्यांचा असलेला बादरायण संबंध. त्याचवेळी साजिद जाविद हे पाकिस्तानी आईवडील असलेले उमेदवारही रिंगणात होते. २०२२ मध्ये, म्हणजे सध्याच्या निवडणुकीत मात्र साजिद जाविद, नदीम झहावी , सुएला ब्रेव्हरमन, केमी बडेनोश असे इतर देशांशी जवळचं नातं असणारे अन्य उमेदवारही रिंगणात उतरले होते पण ते एव्हाना बाद झाले आहेत. अर्थात भारतावर (आणि जगात इतरत्रही) असंख्य दशके राज्य केल्यामुळे ४-५ पिढ्यांपूर्वी दुसऱ्या एखाद्याचे खापरपणजी किंवा खापरपणजोबा बाहेरच्या देशातले असतीलही कदाचित, पण तूर्तास आपण तो विषय बाजूला ठेवू या.

२००१ आणि २००५ साली निवडणुका चुरशीच्या झाल्या आणि अंतिम फेरीपर्यंत पोचल्या. इयान डंकन स्मिथ हे २००१ मध्ये तर डेविड कॅमेरॉन हे २००५ मध्ये सामान्य हुजूर सदस्य मतदारांच्या मतदानानंतर बहुमताने निवडून आले. तशीच काहीशी घडामोड २०१९ मध्ये झाली. त्यावेळी बोरिस जॉन्सन विजयी झाले. २०१६ मध्ये मात्र स्पर्धा अंतिम फेरीपर्यंत पोचलीच नाही. ब्रेक्सिट च्या मतदानाच्या धक्कादायक निकालानंतर झालेल्या या निवडणुकीत काही गमतीदार घटना घडल्या.
२०१६ मध्ये बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्सिट ला लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून बराच प्रचार केला होता, रथयात्रा - सॉरी, बसयात्रा काढली होती. ते सर्वप्रथम रिंगणात उडी घेतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी आपण उमेदवार नाही असंच जाहीर केलं. कदाचित याकरता काही पडद्यामागे मांडवली पण झाली असेल, पण ते आपल्याला कळणं कठीण आहे. मात्र त्यावेळी गृहमंत्री असलेल्या आणि तसं म्हटलं तर ब्रेक्सिट-विरोधी असलेल्या सौ. टेरीसा मे यांनी मात्र आपली उमेदवारी जाहीर केली. तसंच त्यावेळी तुलनेने अनोळखी आणि नवीन असलेल्या, पण ब्रेक्सिटला जोरदार पाठिंबा असलेल्या सौ. आंद्रेया लेडसम या बाईंनी आपली उमेदवारी जाहीर केली, आणि प्राथमिक फेऱ्यांमध्ये इतर लोकपरिचित नेत्यांना अस्मान दाखवत त्या सौ. मे यांच्याबरोबर अंतिम फेरीत जाऊन थडकल्या.

आता अंतिम फेरीची जोरदार लढत बघायला मिळणार, दोन स्त्री प्रतिस्पर्ध्यांमध्ये हिरीरीने होणारे वाद ऐकायला मिळणार अशा अपेक्षेत सगळे ब्रिटिश लोक होते. हीही निवडणूक जुलै महिन्याच्या सुरुवातीला झाली. त्याचवेळी अँडी मरे विम्बल्डन स्पर्धेत पराक्रम करत होता. १० जुलै २०१६ ला मरे पुरुषांची एकेरी विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकला. ११ जुलैला मंडळी हुजूर पक्षाच्या निवडणुकांकडे वळणार होती, पण त्या संध्याकाळी मंडळींच्या आनंदावर विरजण पडलं. सौ. आंद्रेया लेडसम यांनी लढत देण्याऐवजी त्या संध्याकाळी आपली माघार घोषित केली आणि सौ. टेरीसा मे ब्रिटनच्या दुसऱ्या स्त्री पंतप्रधान झाल्या.
आज १९ जुलै च्या दिवसअखेर आत रिंगणात तीनच उमेदवार उरले आहेत. ऋषी सुनक , लिझ ट्रस , आणि पेनी मॉर्डन्ट. पहिले दोन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पीपीई अभ्यासक्रमाच्या मुशीतून बाहेर पडलेले आहेत, म्हणजे आतल्या गोटातले आहेत, लिझ ट्रस या आत्ताच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होत्या. अलीकडच्या त्यांच्या भारतभेटीच्या वेळी कदाचित त्यांची छबी तुम्ही बघितली असेल. पेनी मॉर्डन्ट या उपमंत्री पदावर होत्या. या उमेदवारांबद्दल आणखी जाणून घ्यायचं कुतूहल असेल तर जरूर तसं सुचवा. माझ्या परीने मी माहिती द्यायचा प्रयत्न करेन.
मंडळी, हुजूर पक्षाच्या निवडणुकांची ही पूर्वपीठिका मी आता तुमच्यासमोर मंडळी आहे. आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी चे पीपीई पदवीधारक आणि नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक हुजूर पक्षाची निवडणूक जिंकतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जिंकलेच तर आपले पूर्वीचे राज्यकर्ते ब्रिटिश त्यांना सुखाने नांदू देतील का?