अणुस्फोट म्हटल्यावर तुम्हाला काय आठवेल? चेर्नोबल अणु दुर्घटना, फुकुशिमाचा अणुस्फोट, हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब स्फोट, किंवा फारतर तुम्ही थ्री मिल आइसलँडबद्दल ऐकले असेल. या व्यतिरिक्तही जगात आणखी एका ठिकाणी अणु दुर्घटना झाली होती. जगातील या तिसऱ्या अणु दुर्घटनेबद्दल मात्र फारशी कुणालाही माहिती नाही. अशी कोणतीही घटना जगापासून लपवून ठेवणेच त्यात्या देशातील सत्ताधीशांना फायद्याचे ठरते. म्हणूनच या तिसऱ्या अणु दुर्घटनेची माहिती जगापासून फार काळ लपवून ठेवण्यात आली होती. या दुर्घटनेचे दुष्परिणाम आणि त्याला दडपून टाकण्याची पद्धती इतकी भयावह होती की, फुकुशिमा आणि चेर्नोबलच्या घटनाही यासमोर फिक्या ठरतील.
जगातील ही तिसरी अणु दुर्घटना सोव्हिएत रशियामध्ये १९५७ साली म्हणजे चेर्नोबिल आणि फुकुशिमोच्याही खूप दशके आधी घडली होती. सोव्हिएतच्या कालखंडात आणि तेही दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्ध शिगेला पोहोचण्याच्या काळातील ही घटना म्हणूनच फारशी प्रसिद्ध झाली नाही किंवा तिला प्रकाशझोतात येऊ दिले नाही असेही म्हणता येईल. बाहेरच्या जगाला तर याची खबरबात लागली नाहीच ते सोडा, पण जे लोक या अणु दुर्घटनेला बळी पडले, ज्यांच्यावर याचा परिणाम झाला त्यांनाही कळले नाही की, त्यांच्यासोबत नेमके काय घडले आहे. सोव्हिएतने याबाबत इतकी काटेकोर गुप्तता पाळली होती. यामागचे कारणही तसेच होते.





