४०वर्षांपूर्वीची गुंतवणूक आता १४४८कोटींची झालीय, पण कंपनी दाद देत नाहीय. कोचीच्या गृहस्थांची कैफियत वाचा!!

लिस्टिकल
४०वर्षांपूर्वीची गुंतवणूक आता १४४८कोटींची झालीय, पण कंपनी दाद देत नाहीय. कोचीच्या गृहस्थांची कैफियत वाचा!!

दैव देतं पण कर्म नेतं हे आपण बरेचदा ऐकलं असेल. नुकताच एकाला नशिबाने दिलं, पण त्याचा आनंदच घेता आला नाही असा अनुभव आला आहे. केरळच्या कोची येथील बाबू जॉर्ज वळवी यांची ही कैफियत आहे. शेअर बाजारात १९७८ मध्ये केलेली त्यांनी एका कंपनीसाठी केलेल्या गुंतवणुकीचे आताचे मूल्य तब्बल १४४८ कोटी रुपये इतके आहे. पण त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. याबद्दल ती कंपनी काय म्हणते?

शेअर बाजार हा नशिबाचा खेळ म्हणतात ते खरंच आहे. बाबू जॉर्ज वळवी यांचे आताचे वय ७४ आहे. १९७८ मध्ये बाबू जॉर्ज वळवी आणि चार नातेवाईकांनी मेवाड ऑइल आणि जनरल मिल्स लिमिटेड या उदयपूरच्या कंपनीचे ३५०० शेअर्स खरेदी केले होते. तेव्हा ही कंपनी nonlisted होती. पण कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पी.पी. सिंघल यांच्याशी त्यांची मैत्री होती. मेवाड ऑइल आणि जनरल मिल्स लिमिटेड सूचीबद्ध कंपनी नसल्याने आणि कोणतेही लाभांश देत नसल्यामुळे बाबू जॉर्ज व कुटुंब हळूहळू गुंतवणूकीबद्दल विसरले.

२०१५ मध्ये ते त्याच्या जुन्या कागदपत्रांमधून जात असताना त्यांना या शेअर्सबद्दल आठवले व त्यांनी आता त्या शेअर्सचे काय भाव असतील याबद्दल जाणून घेतले. जेव्हा त्यांना सत्य कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्याला आढळले की मेवाड ऑइल आणि जनरल मिल्स लिमिटेडने त्याचे नाव बदलून पीआय इंडस्ट्रीज ठेवले आहे, जी एक listed म्हणजे सूचीबद्ध कंपनी होती आणि आर्थिकदृष्ट्या PI इंडस्ट्रीज खूप चांगले काम करत होती. त्यांनी मग आपले शेअर्सची किंमत डीमॅट खात्यात आणण्यासाठी एजन्सीशी संपर्क साधला .पण एजन्सीने कुटुंबाला थेट कंपनीशी संपर्क करण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी कंपनीला संपर्क केला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ते आता भागधारक नाहीत आणि त्यांचे शेअर्स १९८९ मध्ये इतरांना विकले गेले आहेत. हे ऐकल्यावर त्यांना धक्का बसला. आपल्याला फसवले गेले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाचा पूर्ण छडा लावायचा ठरवले.

त्यांनी पीआय इंडस्ट्रीजवर आरोप केला की डुप्लिकेट शेअर्सचा वापर करून त्यांचे शेअर्स बेकायदेशीरपणे विकले आहेत. ते त्यांना परत मिळाले पाहिजेत. २०१६मध्ये पीआय इंडस्ट्रीजने वळवीला वाटाघाटीसाठी दिल्लीला बोलावले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर कंपनीने वळवी यांच्या घरी भेटण्यासाठी आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दोन उच्च अधिकारी पाठवले. कागदपत्रे खरी असल्याचे त्यांनी मान्य केले. पण त्यानंतर काही झाले नाही. कंपनीने कोणताही संपर्क केला नाही. काही ठोस केले नाही. वळवी यांनी सांगितले की त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचे पीआय इंडस्ट्रीजमध्ये ४२.८ लाख शेअर्स असले पाहिजेत, ज्यांची सध्याच्या बाजार मूल्यांनुसार १४४८ कोटी रुपये इतकी किंमत आहे. त्यावेळी १३ जणांनी शेअर्स विकत घेतले होते. कोणीतरी कंपनीतलेच अधिकारी असावे ज्यांनी हे शेअर्स बेकायदेशररित्या विकले आहेत. आता हे प्रकरण सेबीकडे आहे.

आज ७४ वर्षीय वळवी मूळ कागदपत्रे असूनही शेअर्स त्यांचेच आहेत हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. कंपनी त्यांना सहकार्य करत नाही. नियामकाने मागितलेली संबंधित कागदपत्रेही कंपनी पुरवत नाही. वळवी कायद्याने लढाई देत आहेत.

असं असलं तरी सगळ्यांच्याच नशीबी अशी करुण कहाणी येत नाही. आजोबांनी २८ वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे नातू करोडपती झाल्याची गोष्टही इथेच घडली आहे. 

आजोबांनी २८ वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे नातू झाला करोडपती!!

या प्रकरणाचा आता काय निकाल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. यातून हे सिद्ध होते की कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घेताना नीट अभ्यास करून घेणे जास्त श्रेयस्कर!!

शीतल दरंदळे